रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रण

पावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये उझी माशीचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. नियंत्रणासाठी सुधारित पद्धतीच्या रेशीम कीटक संगोपनगृहाचा अवलंब आणि एकात्मिक नियंत्रण पद्धत फायदेशीर ठरते.
उझी माशीच्या नियंत्रणासाठी रेशीम कीटक संगोपनगृहामध्ये स्वच्छता ठेवावी.
उझी माशीच्या नियंत्रणासाठी रेशीम कीटक संगोपनगृहामध्ये स्वच्छता ठेवावी.

पावसाळा आणि हिवाळ्यात रेशीम कीटक संगोपन गृहामध्ये उझी माशीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी सुधारित पद्धतीच्या रेशीम कीटक संगोपनगृहाचा अवलंब  आणि एकात्मिक नियंत्रण पद्धत फायदेशीर ठरते. उझी माशीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. बदलता पाऊस, तापमान आणि आर्द्रतेनुसार उझी माशीची अंडी देण्याची क्षमता बदलते. पावसाळा आणि हिवाळ्यात उझी माशीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. उन्हाळ्यात ३२ ते ४२ अंश सेल्सिअस तापमानामुळे मार्च ते जून महिन्यात उझी माशीचा प्रादुर्भाव कमी आढळतो.  प्रजाती भारतीय उझीमाशी, जपानी उझी माशी, काळी उझी माशी, टसर उझी माशी  जीवनक्रम अंडी,अळी,कोष, प्रौढ माशी.  नुकसान कालावधी ऑगस्ट ते नोव्हेंबर   प्रादुर्भाव

 • प्रौढ उझी माशी घरमाशीपेक्षा मोठी असते. पाठीवर स्पष्ट दिसणाऱ्या चार रेषा असतात. 
 • पोटाच्या बाजूवर तीन पट्टे दिसतात. उडताना पंखाचा आवाज करतात.
 • मावा किडीने सोडलेला मधासारखा गोड पदार्थ व फुलांतील गोड भाग माशा खातात. नर व मादी यांच्या मिलनानंतर मादी एक एक अंडी ग्रंथीच्या साहाय्याने तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वाढीच्या अवस्थेतील  रेशीम कीटकाच्या पाठीवर चिकटवते. 
 • मादी नऊ दिवसाच्या काळात २०० ते ३०० अंडी घालते. 
 • २ ते ३ दिवसांच्या अंडी उबवण काळानंतर अळी बाहेर पडते. पाय नसलेल्या अळ्या हूकच्या साह्याने रेशीम अळीच्या त्वचेवर छिद्र करून आत प्रवेश करतात. त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग पडतो. शरीरातील पेशीतील स्निग्ध पदार्थ खाऊन उपजीविका करून वाढतात. 
 • रेशीम कीटकाच्या शरीरात तीन कात अवस्था पूर्ण होतात. वाढ झालेली उझी माशीची अळी  ६ ते ८ दिवसांचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडून जमिनीतील छिद्रात किंवा भेगामध्ये कोष अवस्थेत जातात. तसेच रेशीम कोष साठवणगृह, विणनगृह किंवा बीज गुणन केंद्रात स्थलांतरित होतात. १० ते १४ दिवसांची कोष अवस्था पूर्ण करून उझी माशी बाहेर पडते. 
 • नियंत्रणाचे उपाय   संगोपनगृहाचे व्यवस्थापन 

 • संगोपनगृहाच्या सर्व खिडक्यांना माशीच्या नियंत्रणासाठी सापळे लावावेत.
 • एक लिटर पाण्यात उझीनाशकाची एक गोळी टाकून द्रावण तयार करावे. पांढ­ऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये हे द्रावण ओतावे. हे द्रावण पिवळ्या रंगाचे असते. हा ट्रे खिडकीच्या आतील व बाहेरील बाजूस ठेवावा. 
 • संगोपन गृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपुंज निर्मिती केंद्र, धागानिर्मिती केंद्र अशा सर्व ठिकाणी अळ्या, कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत. या सर्व ठिकाणच्या जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात. 
 • गोळा केलेल्या अळ्या, कोष ०.५ टक्का डिटर्जंटच्या द्रावणात टाकून नष्ट करावेत. 
 • रेशीम कीटकाच्या तिस­ऱ्या अवस्थेपासून पुढे उझी माशीचे सापळे कोष विणन काळापर्यंत रॅकवर लावावेत. 
 • रेशीम कीटकांना उझी नाशक गोळी किंवा सापळ्यांचा त्रास होत नाही. 
 • जैविक पद्धतीने नियंत्रण

 • उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारे लिसोलायनेक्स थायमस हे परोपजीवी कीटक संगोपन गृहात रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सोडावेत. १०० अंडीपुंजासाठी परोपजीवी कीटकाचे दोन पाऊच लागतात.  
 • रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर लिसोलायनेक्स थायमस परोपजीवी कीटकांचे पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावेत. 
 •   कोष काढणीनंतर परोपजीवी कीटकांचे पाऊच खताच्या खड्ड्याजवळ ठेवावेत. 
 • परोपजीवी कीटकांची केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, मैसूर येथे आवश्यकतेनुसार मागणी नोंदवावी. मागणी करताना रेशीम कीटक अंडीपुंज संख्या आणि अंडी फुटण्याची तारीख त्यावर नमूद करावी. केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथून अगोदर पैसे भरून मागणी केली तर पोष्ट किंवा कुरियरच्या साह्याने परोपजीवी कीटकांचे पाऊच पाठवले जातात. 
 • उशी माशीच्या नियंत्रणासाठी फवारणी  केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने उशी माशीच्या नियंत्रणासाठी  उझी साइड, २ टक्के ब्लिचिंग पावडर द्रावण, उझी पावडर आणि  उझी नाश याची शिफारस केलेली आहे.

 • केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सल्ल्यानुसार रासायनिक उझीनाशकाची फवारणी आणि जैविक उपाय एकावेळी केले तर ७७ टक्के उझी माशीवर नियंत्रण मिळवता येते. 
 • उझी साइड, जैविक उपाय आणि उझी ट्रॅप या तिन्ही उपायांचा एकाच वेळी वापर केला तर ८४ टक्यांपर्यंत उझी माशीवर नियंत्रण मिळविता येते.  
 • संगोपनगृहाची स्वच्छता महत्त्वाची 

 • राज्यात ९९ टक्के कच्चे शेडनेट संगोपनगृह आहेत. शक्यतो पक्के सिमेंट क्राँक्रीटमध्ये बांधकाम करून शिफारशीप्रमाणे दरवाजे खिडक्या आणि हवा खेळती राहण्यासाठी तिरपी वायुविजन व्यवस्था करावी. खालच्या व वरच्या बाजूस झरोके ठेवावेत. 
 • सर्व खिडक्या व दरवाज्यांना नायलॉन वायर मेश जाळीचे संरक्षण करावे, म्हणजे उझी माशी कीटक संगोपनगृहात सरळ प्रवेश करणार नाही. संगोपनगृहात सरळ प्रवेश व्यवस्थेएेवजी बाहेर लहान खोली तयार करून त्यामध्ये प्रवेश करून नंतर दुसऱ्या दरवाज्यामधून आत प्रवेश व्यवस्था असावी. दरवाजे आपोआप बंद होण्याची व्यवस्था असावी. म्हणजे उझी माशीला मज्जाव होईल. 
 • तुती पाने साठवण करण्यासाठी वेगळी अंधारी खोली असावी. फांदी खाद्य देण्याअगोदर उझी माशी फांद्या किंवा पानांद्वारे सरळ संगोपनगृहात प्रवेश करते. यासाठी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. 
 • संगोपनगृहात उंदीर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
 • कोष विक्री केलेल्या बाजारातून पोते घरी आणू नये. कारण या सोबत उझी माशीच्या अळ्या, कोष आपल्या संगोपनगृहात येण्याची शक्यता असते. 
 • प्रादुर्भावग्रस्त गावात एक दीड महिना (एप्रिल व मे महिना) रेशीम कोषाचे पीक बंद ठेवावे. 
 • - डॉ. सी. बी. लटपटे,   ७५८८६१२६२२ (रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com