जनावरांना चाऱ्यातून सायनाइडची विषबाधा

अयोग्य पद्धतीने चारा दिल्यामुळे जनावरांना अजाणतेपणे विषबाधा होते. त्यांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन विषबाधेस कारणीभूत ठरणारे घटक ओळखून जनावरांवर योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे.
जनावरांना चाऱ्यातून सायनाइडची विषबाधा
The fodder should be properly dried and fed to the animals.

अयोग्य पद्धतीने चारा दिल्यामुळे जनावरांना अजाणतेपणे विषबाधा होते. त्यांचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन विषबाधेस कारणीभूत ठरणारे घटक ओळखून जनावरांवर योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. जनावरांमध्ये उपजतच विषारी वनस्पती ओळखण्याची जाण असते. त्या कारणाने ते अशा वनस्पती खात नाहीत. परंतु जर जनावर भुकेलेले असेल, दुष्काळी भागात चरण्यासाठी मोकळे सोडले असेल तर अति भुकेमुळे काही वेळा जनावरे विषारी वनस्पती खातात.

 • अनेक वनस्पतींमध्ये हायड्रोसायनिक आम्ल असते. जे सायनाइड विषबाधेस कारणीभूत असते. हे वनस्पती चावताना किंवा तुकडे करताना वनस्पतींमध्ये झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे तयार होते. या आम्लाची तीव्रता अत्यंत जास्त असते. हे जनावरांच्या शरीरात गेल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात.
 • हायड्रोजन सायनाइडला कोणताही रंग नसतो. वनस्पतीमध्ये ते वायू स्वरूपात असते. ते फक्त कडवट बदामासारख्या वासामुळेच ओळखता येते. पाण्यात विरघळल्या स्वरूपात असताना हायड्रोजन सायनाइड विषबाधेला हायड्रोसायनाइड आम्लाची विषबाधा असे म्हणतात.
 • हायड्रोजन सायनाइड हे सेंद्रिय स्वरूपात वनस्पतींमध्ये नेहमीच उपलब्ध असते. ते वनस्पतीमध्ये नियमित चयापचय सुरू असताना नायट्रेट आणि अमायनो आम्ल यापासून मिळते. म्हणूनच नायट्रेटचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीमधील वनस्पतींमध्ये सायनाइडचे प्रमाणदेखील जास्त असते.
 • सेंद्रिय स्वरूपातील हायड्रोजन सायनािड जे पानांमध्ये बाहेरील भागात उपलब्ध असते, त्याची पानामध्ये आतील भागात उपलब्ध असलेल्या उत्प्रेकामुळे (तुकडे करताना, चावताना) रासायनिक प्रक्रिया घेऊन हायड्रोसायनिक आम्ल निर्माण होते. याच पद्धतीने कोठीपोटातील वातावरण व उत्प्रेरके हे देखील ही रासायनिक प्रक्रिया होण्यास मदत होते. म्हणूनच मनुष्यप्राण्यापेक्षा रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये या विषबाधेचे प्रमाण जास्त आढळून येते.
 • सायनाइडचे जास्त प्रमाण हे ज्वारी, सुदान गवत, इंडियन गवत, मका, बाभूळ, ऊस वाढे, जवसाच्या पानात असते. पानांमध्ये असलेले सायनाइडचे प्रमाण इतर भागांमध्ये असलेल्या सायनाइडच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. वाढीव झाडे तसेच नवीन वाढलेली रोपे यामध्ये देखील सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते.
 • दुष्काळामुळे खुरटलेली किंवा दुष्काळानंतर झपाट्याने वाढलेल्या झाडांमध्ये हायड्रोजन सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते.
 • हायड्रोजन सायनाइड सकाळी खूप जास्त, तसेच दुपार व सायंकाळनंतर कमी असते. म्हणून सकाळच्या वेळी चारा कापणी किंवा जनावर चरण्यास सोडणे टाळावे.
 • चारा वाळविणे, मुरघास बनविल्यामुळे हायड्रोजन सायनाइडचे प्रमाण अत्यंत कमी होते. दोन किंवा जास्त महिन्यांकरिता साठविलेल्या चाऱ्यामुळे हायड्रोजन सायनाइड पूर्णपणे उडून जाते. हा चारा जनावरांसाठी योग्य असतो.
 • कोठीपोट रिकामे असताना सायनाइड असलेल्या वनस्पती जनावरांनी खाल्ल्यास विषबाधा कमी होते. जर कोठीपोट भरलेले असेल, तर आधीच उपलब्ध असलेल्या इतर वनस्पतींमध्ये असणाऱ्या उत्प्रेरकांमुळे हायड्रोजन सायनाइड जास्त प्रमाणात तयार होऊन विषबाधा जास्त आढळून येते.
 •  जनावर भुकेलेले असते तेव्हा ते चारा जलद गतीने खाते, त्यामुळे हायड्रोजन सायनाइड वायू जास्त प्रमाणात सोडला जातो.
 •  दुसऱ्या ठिकाणावरून स्थलांतरित केली गेलेली जनावरे ही मूळ ठिकाणच्या जनावरांपेक्षा विषबाधेसाठी जास्त संवेदनशील असतात. कारण अशा जनावरांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या विषारी वनस्पतींची जाण नसते. मूळ ठिकाणची जनावरे थोड्या फार प्रमाणात त्याला सामोरी गेलेली असल्यामुळे त्यांच्या शरीराला त्याची सवय झालेली असते.
 • विषबाधेची लक्षणे 

 •  विषारी वनस्पती जनावरांच्या चाऱ्यामध्ये आल्यास जनावरांच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागतो. याची लक्षणे म्हणजे वजन कमी होते, गर्भ पडतो, नवीन जन्मलेल्या जनावरांच्या अवयवांवर परिणाम होतो. दोन वितांमधील अंतर कमी होते, सूर्यप्रकाशात जनावरे असताना सर्वांगाला दाह सुटतो.
 •  सायनाइड हे विष अत्यंत अल्प प्रमाणात गेले असले, तरी कमी वेळात देखील जास्त हानिकारक असते.
 • जनावर अस्वस्थ होते, श्‍वासोच्छ्‌वासास त्रास होतो, श्‍वासोच्छ्‌वास जलदगतीने होतो, जनावर चालताना अडखळते, हृदयाचे ठोके वाढतात, लाळ गळते, डोळ्यांतून पाणी येते, डोळ्यांची बुब्बुळे विस्फारली जातात, अधून-मधून मलमूत्र उत्सर्जन होते, डोळे प्रथम लाल व नंतर रक्तपुरवठा नसल्यासारखी होतात.
 • विषबाधेचे निदान 

 •  श्‍वासाला कडवट बदामाचा वास.
 • कोठीपाटातील पदार्थांमध्ये हायड्रोसायनिक आम्लाचे प्रमाण तपासणे.
 •  विषबाधेच्या लक्षणांवरून.
 • उपचार

 • तातडीने पशुवैद्यकाशी संपर्क साधून उपचार करावेत.
 •  मोठ्या जनावरांना वीस लिटर थंड पाण्यामधून चार लिटर व्हिनेगार दिल्याने रासायनिक प्रक्रिया मंदावून हायड्रोसायनिक आम्लाचे उत्पादन कमी होते. जनावर वाचविण्यास मदत होते.
 • प्रतिबंधात्मक उपाय 

 • दुष्काळामुळे खुरटलेली किंवा दुष्काळानंतर झपाट्याने वाढलेल्या झुडपांमध्ये हायड्रोजन सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते. त्यामुळे अशा शेतात जनावराला चरण्यास मोकळे सोडू नये.
 • पहिली कापणी करून दुसऱ्यांदा वाढलेल्या झुडपांमध्ये देखील हायड्रोजन सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त असते.
 •  नवीन वाढलेली रोपे व वाढीस लागलेली झाडे यामध्ये सायनाइडचे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात असल्याने अशी झुडपे देखील जनावरास खाण्यास देऊ नयेत.
 • कोणतेही झुडूप १८ ते २४ इंचाच्या वर वाढले असल्यासच जनावरास खाण्यास द्यावे.
 • नवीन चारा असल्यास जनावरांना पहिल्यांदा चरण्यास सोडायचे असल्यास ते दुपारच्या वेळी सोडावे. हायड्रोजन सायनाइडची शंका असल्यास कोणताही चारा कमी प्रमाणात खाऊ घालावा. चारा खाल्ल्यानंतर दोन तासांपर्यंत लक्ष ठेवावे. सायनाइडची शंका असल्यास चाऱ्याची तपासणी करून घ्यावी.
 • चारा योग्य रीतीने वाळवून जनावरांना द्यावा.
 • जमिनीमध्ये नायट्रेटचे प्रमाण कमीत कमी राहील असे खत व्यवस्थापन करावे.
 • संपर्क ः डॉ. डी. पी. पाटील, ९३०९७६२८०१ (सहायक प्राध्यापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.