योग्य नियोजनातून सक्षम करा गोशाळा

राज्यातील विविध गोशाळांची ओळख विशिष्ट देशी गोवंशाच्या नावाने व्हावी. प्रत्येक गोशाळेला विशिष्ट जातीचा देशी गोवंश जोपासण्याची जवाबदारी देण्यात यावी. यातूनच गोशाळा स्वयंपूर्ण होतील.
गोशाळांनी जातीवंत गोवंश संवर्धनावर भर द्यावा.
गोशाळांनी जातीवंत गोवंश संवर्धनावर भर द्यावा.

राज्यातील विविध गोशाळांची ओळख विशिष्ट देशी गोवंशाच्या नावाने व्हावी. प्रत्येक गोशाळेला विशिष्ट जातीचा देशी गोवंश जोपासण्याची जवाबदारी देण्यात यावी. यातूनच गोशाळा स्वयंपूर्ण होतील. गोवंश हत्याबंदी पश्‍चात देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात गोशाळा तसेच पांजरपोळवरील ताण निरंतर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार दरबारी याची कुठल्याही प्रकारची नोंद नाही. सदर परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढणे, तसेच गोशाळा आणि एकंदरीतच देशी गोवंश जगवण्यासाठी कल्याणकारी योजना आखण्याची नितांत गरज आहे. एकीकडे भारत जगात दुग्ध उत्पादनात प्रथम मानांकित स्थानी आहे, ज्याकरिता उत्पादनक्षम गोवंश व तत्सम दुधाळ जनावरांची काळजी घेण्यात यावी किंवा जोपासना करण्यात यावी हे शेतकऱ्याला सांगण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु त्याच वेळी अनुत्पादित गोवंशाचा सांभाळ करण्यास गोशाळा सोडून कुणीच पुढे येण्यास इच्छुक नाही. गोशाळांच्या आर्थिक विकासासाठी सरकार, सामान्य नागरिक, प्रसारमाध्यमे आणि विद्यापीठ अशा घटकांनी पुढे येऊन सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे. समस्या निश्‍चित झाल्यासच, ती समजावून घेता येईल आणि त्यावर समर्पक तोडगासुद्धा काढता येईल. याकरिता गोशाळांसोबत सर्व घटकांनी स्वतःची भूमिका समजून घेणे श्रेयस्कर ठरेल. गोशाळांना भेडसावणाऱ्या समस्या 

  • महाराष्ट्रातील बऱ्याच गोशाळा नीती आयोग नोंदणी, १२ एच आणि ८० जी नोंदणी तसेच गोठा, गोचराकरिता स्वतःच्या जमिनीपासून वंचित आहेत.
  • आजारी, अनुत्पादित, तसेच कत्तलीपासून वाचविलेल्या, चोरी झालेल्या, तस्करी होत असलेल्या गोवंशांना अनियंत्रितरीत्या निकटच्या गोशाळेत सोडले जाते.
  • गोसेवा हे मुख्य उद्दिष्ट असल्याने गोशाळा स्वतःच्या आर्थिक परिस्थिती किंवा गोशाळेत उपलब्ध असलेल्या धारण क्षमतेचा विचार न करता कर्तव्य निष्ठेने दाखल होत असलेल्या गोवंशाचा स्वीकार करतात.
  • गोशाळेत गोवंशाच्या सांभाळ, जसे की गोसंगोपन, आहार, औषधी इत्यादी वरील खर्च करण्याकरिता गोशाळांना केवळ दान आणि देणग्या यावर अवलंबून राहावे लागते. सरकारी मदत नगण्य असते. केवळ चोरीचा गोवंश पकडल्यावर त्यांचे नियोजन करण्यासाठी गोशाळेची आठवण प्रशासनाला येते.
  •  गोशाळेत गोवंशाचा प्रवेश निश्‍चित आहे, परंतु गोवंश विकास आणि विक्रीसाठी कुठलाही पर्याय नाही. नाही म्हटले तरी काही अंशी शेतकामासाठी लागणाऱ्या बैलजोड्या काही शेतकरी माफक देणगी देऊन मिळवितात.
  •  बऱ्याच गोशाळा विविध गोआधारित उत्पादने जसे की खते, साबण, धूप कांडी, अगरबत्ती, गोमय व गोमूत्र यापासून निर्मित औषधे इत्यादी घटकांची विक्री करतात. परंतु याचा प्रचार व प्रसार मर्यादित आहे.
  • गोवंशाचा सांभाळ, प्रक्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे व सेवादात्यांचे वेतन, खाद्य व औषधी खर्च, आकस्मिक खर्च, मृत गोवंशाचा पुरण्याचा खर्च असे अनेक खर्च असतात; मात्र उत्पन्नाचे मुख्य स्रोत केवळ दान देणग्या हेच असतात.
  • सर्वसामान्य नागरिकांमध्ये गायी विषयी आस्था आहे, परंतु गोवंशाचा आर्थिक फायदा ज्ञात नसल्याने अनुत्पादित गोवंशाचा शेतकऱ्यांच्याकडेही स्वीकार होत नाही.
  • स्थिती सुधारण्याकरिता उपाययोजना  सरकारकडून अपेक्षा 

  • गोशाळांना राजाश्रय मिळणे ही काळाची गरज आहे. केवळ नैसर्गिक शेतीचा अवलंब करू आणि गोवंशाचा उपयोग शेतीसाठी करू असे म्हणून चालणार नाही. यातील विविध अंगांचा विचार करून त्यासंबंधी योजना आखणे गरजेचे आहे.
  • गोशाळांना चारा, औषधे, मनुष्यबळ वेतन, आकस्मिक खर्च तसेच औषधनिर्मिती व खतनिर्मितीसारखे प्रकल्प उभे करण्याकरिता अनुदान मिळणे गरजेचे आहे.
  • काही वर्षांपूर्वी डॉ. मार्कंडेय यांच्या नेतृत्वात स्थापन केलेल्या
  • समितीच्या अहवाल वाचून त्यात केलेल्या उपाययोजनांचा गोशाळांनी अंगीकार करण्याकरिता सरकारी मदत मिळणे आवश्यक आहे. तसेच सदर उपाययोजना संपूर्ण राज्यात लागू करणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल.
  •  सरकारच्या माध्यमातून स्थानिक तसेच इतर राज्यातील देशी गोवंशाचा रक्षण, वंशावळ सुधार, शुद्ध वंशावळीतील गोवंशाच्या उत्पादनात सुधार इत्यादीचा प्रचार, प्रसार आणि त्यावरील योजनानिर्मिती व क्रियान्वयन करणे महत्त्वाचे ठरेल.
  • राज्यातील विविध गोशाळांची ओळख विशिष्ट देशी गोवंशाच्या नावाने व्हावी. प्रत्येक गोशाळेला विशिष्ट जातीचा देशी गोवंश जोपासण्याची जवाबदारी देण्यात यावी.
  •  गोशाळा स्वयंपूर्ण करण्यासाठी योजना बनविणे, क्रियान्वित करणे श्रेयस्कर ठरेल.
  •  गोशाळांना आवश्यकतेनुसार गोठा आणि चरण्यासाठी कुरणांची उपलब्ध करून देण्यात यावी.
  • जनसामान्यात गोसंगोपनाचे व्यावहारिक आणि आरोग्यविषयक फायदे यांचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक ठरेल.
  • गोशाळांसाठी उपक्रमांची गरज 

  •  गोशाळांचे विभागनिहाय संघटन गरजेचे आहे.
  •  वेळोवेळी गोशाळा आर्थिक, तांत्रिक प्रबंधन, गो-उत्पादन निर्मिती, बाजार व्यवस्थापन, इत्यादी संदर्भात गोशाळा विश्‍वस्तांसाठी शैक्षणिक शिबिर आणि चर्चासत्रे आयोजन करावे.
  •  कमीत कमी त्रैमासिक बैठका घेऊन प्रत्येक गोशाळेच्या स्थानिक समस्यांची नोंद घेऊन त्यावर उपाय सुचवावेत.
  • गोशाळा व्यवस्थापकांकडून गो-विज्ञानाला तितकेसे महत्त्व दिलेले दिसून येत नाही. विज्ञानाची कास धरूनच गोवंश सुधारणा शक्य आहे.
  • गोशाळेतील उपलब्ध गोवंशाचे वर्गीकरण 

    अ) आजारी व वृद्ध गोवंश ः सेवा कार्याकरिता संगोपन (२५ टक्के) ब) स्थानिक गोवंश जातीचा उपयोग करून वंशावळ सुधारणा (२५ टक्के). क) शुद्ध वंशावळ असलेल्या गोवंशाचा उपयोग दुधाचे मूल्यवर्धन करण्यासाठी वापरावे (२५ टक्के). ड) वंशावळ सुधारणा करून जातिवंत कालवडी, गायी तयार करून निकटच्या भागातील बेरोजगार तरुणांना पशुपालनासाठी द्यावे. (२५ टक्के).

  • देशी गोसंगोपनाचे आर्थिक व आरोग्यविषयक फायदे लोकांना समजावून देणे.
  • गोशाळानिर्मित विविध उत्पादने जसे की खते, जिवामृत इत्यादी उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • विविध गो-उत्पादनांचा सामान्य जनतेच्या दैनंदिन वापरात समावेश करण्याकरिता प्रसार माध्यमांनी त्यांचे फायदे जनतेपर्यंत पोहोचवणे.
  • देशी गोवंश सुधारण्यासाठी सुरू असलेले संशोधन आणि त्याचे फायदे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत.
  • पशू महाविद्यालय, विद्यापीठाचे कार्य 

  • पंचगव्य, गोमूत्र, गोमय उत्पादित औषधांपैकी जे उपयुक्त ठरू शकतील अशा औषधांचा जनावरांच्या उपचारामध्ये समावेशाबाबत संशोधन करणे तसेच उपयुक्त औषधांच्या वापराला चालना देणे.
  • गोशाळांना स्वयंपूर्ण बनविण्याकरिता तेथील व्यवस्थापन, आहार, औषध, वायुवीजन, चारानिर्मिती, गोसंगोपनामध्ये योग्य बदल घडवून आणणे. गोशाळा व्यवस्थापकांना नियमित मार्गदर्शन करणे.
  • गोशाळेतील आजारी जनावरांना उपचार सुविधा देणे, नियमीत पशुरोग उपचार शिबिर आयोजित करणे.
  • गोशाळा स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने देशी गोवंश संवर्धन आराखडा बनविणे. स्थानिक वातावरणात तग धरून राहण्याची क्षमता असणारी देशी गोवंशाची जात गोशाळेला सुचविणे. तेथील गोवंशाचे दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी उपाय सुचविणे.
  • देशी गोवंशाचे महत्त्व विषद करणारे तांत्रिक साहित्यनिर्मिती आणि प्रसार.
  •  विद्यापीठातील घटक महाविद्यालयामध्ये नुकत्याच स्थापन झालेल्या कामधेनू सेल मार्फत विविध देशी गोवंश प्रचार व प्रसार कार्यक्रम राबविण्यावर भर द्यावा.
  • संपर्क : डॉ. कुलदीप देशपांडे, ८००७८६०६७२ (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला) डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ (सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com