जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण प्रशिक्षित तज्ज्ञ, अनुभवी पशुवैद्यकांकडूनच करावा. तसेच पैदास कार्यक्रमाच्या नोंदी वेळच्यावेळी ठेवाव्यात.
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान
Artificial insemination makes it possible to breed animals in the barn itself.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण प्रशिक्षित तज्ज्ञ, अनुभवी पशुवैद्यकांकडूनच करावा. तसेच पैदास कार्यक्रमाच्या नोंदी वेळच्यावेळी ठेवाव्यात. गोठ्यामध्येच जातिवंत गायींची पैदास कमी कालावधीमध्ये करण्यासाठी सुरुवातीला जास्तीत जास्त उच्च उत्पादक कालवडी जन्माला आल्या पाहिजेत. त्यांच्यापासून तयार होणाऱ्या गाई त्यापुढील अधिक उत्तम पिढी तयार करण्यासाठी वापरता येतील. सामान्यपणे कृत्रिम रेतन करून जातिवंत गायींची पैदास करण्यासाठी अधिक कालावधी लागतो. कमी कालवधीत जातीवंत गायींची पैदास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. जातिवंत पैदाशीसाठी आधुनिक तंत्रज्ञान  लिंग निर्धारित वीर्यमात्रा  (सेक्स सोर्टेड सीमेन) तंत्रज्ञान 

 • फक्त कालावडीच जन्माला येण्यासाठी आता लिंग निर्धारित वीर्यमात्रा (सेक्स सोर्टेड सीमेन) उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वळूच्या वीर्यातील X आणि Y गुणसूत्रे असलेले शुक्राणू वेगळे करता येतात. मादी वासरू जन्माला येण्यासाठी स्त्री बीजांडासोबत X गुणसूत्रे असलेल्या शुक्राणूचे मिलन होणे गरजेचे असते. फक्त X गुणसूत्रांचे शुक्राणू कृत्रिम रेतन करण्यासाठी वापरले असता ९० टक्के मादी वासरेच जन्माला येतात. सेक्स सोर्टेड सीमेन वापरल्यास अधिक प्रमाणात कालवडी उपलब्ध होतील. तसेच नर वासरू जन्माला आले तर त्याच्या संगोपनावर होणारा अनावश्यक खर्च टाळता येईल. 
 • सेक्स सोर्टेड सीमेन तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. कारण, सध्या यांचे उत्पादन खूप कमी होत आहे आणि त्यांचा खर्चही जास्त आहे. गोठ्यातील अधिक दुग्धोत्पादन असणाऱ्या २० ते २५ टक्के गायींसाठी तसेच पाहिलारू कालवडी ज्यावेळी माजावर येतात, ज्यांचे वजन आणि वय योग्य आहे  त्यांच्यामध्येच या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
 • भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान

 •   सामान्यपणे उच्च उत्पादक गाईच्या संपूर्ण आयुष्यात येणाऱ्या ८ ते १० वेतांमध्ये ८ ते १० वासरेच जन्माला येतात. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापरून उच्च उत्पादक गायींपासून एकाच वेळेस अनेक भ्रूण प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होऊ शकतात. 
 •   विविध ओजसरस वापरून एकाच वेळी उच्च उत्पादक गाईच्या बीजांड कोषातून अनेक स्त्रीबीज निर्मिती केली जाते. आणि निश्चित वेळी उत्कृष्ट वळूच्या वीर्यमात्रांचे कृत्रिम रेतन करून त्यांचे गर्भाशयात फलन केले जाते. स्त्रीबीजांचे व शुक्राणूंचे मिलन झाल्यानंतर त्यापासून भ्रूण निर्मिती होते. असे भ्रूण ५ व्या दिवशी दाता गाईच्या गर्भाशयातून जमा केले जातात. जमा केलेले भ्रूण लगेच गाईंमध्ये प्रत्यारोपण केले जाते किंवा गोठवून साठवले जातात. 
 • भ्रूण निर्मिती करताना उत्कृष्ट वळूचे सेक्स सोर्टेड सीमेन वापरल्यास त्यापासून फक्त कालवडी मिळवणे शक्य आहे. 
 • कमी उत्पादक संकरित गाई तसेच गावठी गायींपासून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाने उच्च उत्पादक व शुद्ध प्रजातीच्या कालवडी जन्माला घालणे शक्य आहे. 
 •   या तंत्रज्ञानात कमी दूध उत्पादक गाईचे गर्भाशय फक्त गर्भ वाढवण्यासाठी वापरले जाते. परंतु जन्माला येणाऱ्या कालवडीची आनुवंशिकता ही तो भ्रूण तयार करण्यासाठी वापरलेल्या गाईची व वळूची असते. 
 •  सध्या हे तंत्रज्ञान प्रक्षेत्रावर वापरले जात असले तरीही काही सहकारी, निमशासकीय तसेच खासगी संस्था मार्फत शेतकऱ्यांच्या गोठ्यात सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. 
 • हे तंत्रज्ञान अति खर्चिक आहे. एक गाय गाभण राहण्यासाठी सुमारे २५ ते ३५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे गोठ्यामध्ये एकाच पिढीत जातिवंत गायींची पैदास घडवून आणायची असेल तिथेच हे तंत्रज्ञान वापरावे. 
 • स्त्रीबीज संकलन तंत्रज्ञान

 • शारीरिक व्यंग, प्रजनन संस्थेत आलेल्या अडचणी, गर्भाशयातील संसर्ग इत्यादी कारणांनी अनेक उच्च उत्पादकता आणि आनुवंशिकता असलेल्या गायी गाभण राहू शकत नाहीत. परंतु, त्यांची आनुवंशिकता वापरायची झाल्यास, स्त्रीबीज संकलन तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. 
 • गायीच्या बीजांड कोशात अनेक स्त्रीबीज तयार होतात. हे स्रीबीज दर १५ दिवसांनी सोनोग्राफी गायडेड नीडल वापरून संकलन करणे शक्य आहे. असे स्त्रीबीज प्रयोगशाळेत फलित करून त्यापासून भ्रूण निर्मिती करता येते. 
 • अशाप्रकारे निर्मित भ्रूण इतर गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाने प्रत्यारोपित करता येतात. स्त्रीबीज संकलन तंत्रज्ञान वापरून गाभण गायीमध्ये सुद्धा स्त्रीबीज संकलन करता येते. सध्या हे तंत्रज्ञान मोजक्याच तज्ज्ञ व्यक्ती व संस्थांमार्फत उपलब्ध आहे. 
 • माज संकलन तंत्रज्ञान

 • एकाच वेळेस अनेक गायी माजावर आणण्याचे ‘माज संकलन तंत्रज्ञान’ देखील  उपलब्ध आहे. यामुळे विविध ओजसरस वापरून गोठ्यावर एकाच वेळी अनेक जनावरे माजावर आणता येतात. असे केल्यास कृत्रिम रेतनासाठी आवश्यक वीर्यमात्रा उपलब्ध करून ठेवणे, भ्रूण प्रत्यारोपण करणे सोपे होते. 
 • ज्या गायींचा माज ओळखता येत नाही किंवा कृत्रिम रेतनाची वेळ ठरविता येत नाही, अशा गायींमध्ये ठराविक वेळेस कृत्रिम रेतन करून गर्भधारणेची शक्यता वाढविता येते. एकाच वेळी अनेक गायी माजावर आल्यास त्या एकाच वेळी गाभण राहतील. आणि एकाच वेळी कालवडी जन्मास येतील. एकाच वेळी कालवडी जन्माला आल्यास संगोपन व व्यवस्थापन करणे सोपे होते. 
 • पैदास कार्यक्रमातील नोंदीचे महत्त्व

 • गोठा किंवा प्रक्षेत्रावरील पैदास कार्यक्रमाचे यश हे वेळोवेळी केलेल्या नोंदीवर अवलंबून असते. त्यामुळे वेळच्यावेळी नोंदी ठेवणे गरजेचे आहे. 
 • वेळोवेळी पैदास कार्यक्रमाचा आढावा घेता येतो. त्यानुसार वेळीच प्रजनन कार्यक्रमात बदल करता येतो. 
 • एकाच वंशावळीतील वळूंचा वापर सातत्याने झाल्यास जन्माला येणाऱ्या पिढीत आनुवंशिक दोष निर्माण होऊ शकतात. त्यासाठी भिन्न वंशावळीतील वळूंचा वापर पुढील पिढीत करणे आवश्यक असते. 
 • नोंदी ठेवल्यास गाईच्या पुढील माजाची तारीख, गर्भ तपासणी करायची तारीख, गाईच्या विण्याची तारीख इ. बाबी सहज लक्षात ठेवता येतात. त्यामुळे व्यवस्थापन करणे सोपे होते. 
 • कृत्रिम रेतनासाठी वापरलेल्या वळूची नोंद ठेवल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या कालवडींचे दूध उत्पादन, शारीरिक गुणधर्म, वैशिष्ट्ये इत्यादी बाबींचा अभ्यास करता येतो. तसेच भविष्यात कोणते शारीरिक गुणवैशिष्ट्ये असलेले वळू पैदाशीसाठी वापरायचा ते ठरविणे सोपे जाते. 
 • आज पशुपालकांत प्रजनन व्यवस्थापनाबाबत जागृकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गायी किंवा कालवडी विकताना त्या कोणत्या वळूच्या आहेत, कालवडी कोणत्या वळूकडून गाभण आहेत, या सर्व नोंदी खरेदीदारास देणे आवश्यक झाले आहे. 
 • गायींच्या प्रकारानुसार पैदाशीसाठी वापरावयाचे आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान 

  गाईंचा प्रकार वापरावयाचे तंत्रज्ञान शेरा
  उच्च उत्पादक गाई उच्च आनुवंशिकता व उत्पादकता असलेल्या वळूचे सेक्स सोर्टेड सीमेन कमी आजारी पडणारी, स्तनदाह (मस्टायटीस) न होणारी, वेळेत माजावर येणारी आणि सहज गाभण राहणारी गाय निवडावी.
   कमी उत्पादक गाई व गावठी गाई भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान महागडे असून सर्वत्र उपलब्ध नाही.
   मध्यम उत्पादक गाई कृत्रिम रेतन उच्च आनुवंशिकता व दुग्धोत्पादन असलेल्या वळूच्या वीर्य मात्रा वापराव्यात.
    पाहिलारू कालवडी उच्च आनुवंशिकता व उत्पादकता असलेल्या वळूचे सेक्स सोर्टेड सीमेन  संकरित कालवडीचे वजन किमान २५० ते ३०० किलो आणि वय किमान १२ ते १४ महिने असावे.  
  गाभण राहू शकत नसलेल्या उच्च उत्पादक गाई स्त्रीबीज संकलन तंत्रज्ञान ​ शारीरिक व्यंग, प्रजनन संस्थेत आलेल्या अडचणी, गर्भाशयातील संसर्ग यामुळे गाभण राहत नसलेल्या गाई.

  -डॉ सचिन रहाणे,  ९९७५१७५२०५ (डॉ सचिन रहाणे हे डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी आहेत. डॉ. अजित माळी हे  क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.