शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने वृद्धिंगत होत आहे. यामध्ये विविध संवर्धन पद्धती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना उपलब्ध जागेचा वापर चांगल्याप्रकारे करून स्वयंरोजगाराचे एक कायमस्वरूपी साधन या माध्यमातून उभे करणे शक्य आहे.
शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये संधी...
Indoor unit for fish farming

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने वृद्धिंगत होत आहे. यामध्ये विविध संवर्धन पद्धती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना उपलब्ध जागेचा वापर चांगल्याप्रकारे करून स्वयंरोजगाराचे एक कायमस्वरूपी साधन या माध्यमातून उभे करणे शक्य आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या तणावाला कमी करण्याचा पर्याय म्हणून लोकांच्यामध्ये शोभिवंत मत्स्यपालनाचे आकर्षण वाढत आहे. विकसनशील देशांमधील ग्रामीण भागातील लोकांकरिता स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामध्ये उपलब्ध असून परकीय चलन निर्मितीचा एक प्रमुख स्रोत आहे. शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती  इनडोअर युनिट 

 • कमी आकाराच्या जागेमध्ये शक्य. घरातील एखादी खोली किंवा पडवीमध्ये मत्स्यसंवर्धन करता येते.
 • मत्स्यबीज उत्पादन व संवर्धनाकरिता विविध आकारांच्या काचेच्या टाक्या ठेवून मत्स्यसंवर्धन केले जाते.
 • जास्त किंमत मिळवून देणाऱ्या मत्स्य प्रजातीचे बीजोत्पादन आणि संवर्धनाकरिता या प्रकारचे युनिट योग्य आहे. उदा. निऑनटेटा, डिस्क्स, फ्लॉवरहॉर्न, ब्लॅक घोस्ट इ.
 • यार्ड स्केल युनिट 

 • या प्रकारचे युनिट घरामागील पडवी किंवा समोरील अंगण या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असल्यास करता येणे शक्य आहे. याकरिता १००० ते २००० चौरस फूट जागा योग्य असून, यामध्ये प्लॅस्टिक पूल आणि एफआरपी टॅंक ठेवून मत्स्य संवर्धन करता येते.
 • मत्स्यबीजाचे विक्रीयोग्य आकारापर्यंत संवर्धन करण्याकरिता या प्रकारचे युनिट योग्य असून जास्त संख्येमध्ये पिले देणाऱ्या माशांच्या संगोपनाकरिता योग्य आहे.
 • बाजारपेठेमध्ये मध्यम किंमत मिळणारे शोभिवंत मासे जसे की, एंजल, गोल्डफिश, बार्ब, गुरामी, टेळा इत्यादींच्या संवर्धनाकरिता हे युनिट उपयोगी आहे.
 • सिमेंट पॉन्ड युनिट 

 • सिमेंटचे विविध आकाराचे पॉन्ड बांधून मत्स्यबीज संगोपन करण्यात येते.
 • यार्ड स्केल युनिटपेक्षा थोडी मोठी जागा उपलब्ध असल्यास अशा प्रकारचे युनिट बांधून मत्स्यसंवर्धन करणे योग्य ठरते.
 • सुमारे ५००० चौरस फुटापर्यंत जागेमध्ये याप्रकारे एक चांगले युनिट बांधता येऊ शकते.
 • सिमेंट पॉन्ड युनिट बांधण्याकरिता सुरुवातीचा खर्च थोडा जास्त असतो. परंतु याद्वारे सर्वप्रकारच्या माशांचे संवर्धन विक्री योग्य आकारापर्यंत करता येऊ शकते व त्यामुळे मिळणारे उत्पन्न देखील जास्त आहे.
 • प्लॅस्टिक अस्तरीकरण तलाव युनिट 

 • बारमाही पाण्याचा स्रोत आणि ५ ते १० गुंठे आकाराची मोकळी पडीक जमीन उपलब्ध असल्यास कमी गुंतवणूक करून मत्स्यसंवर्धन करण्याकरिता याप्रकारचे युनिट आदर्शवत आहे.
 • हे युनिट करण्याकरिता जागेचा आकार आणि क्षेत्रफळाप्रमाणे ५ ते १० मीटर लांब, १.५ ते २ मीटर रुंद आणि १.२ मीटर खोल असे तलाव तयार करून त्यामध्ये २५० ते ३५० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यात येते.
 •  तलावांच्या एकाबाजूने पाइपलाइनद्वारे पाणी घेण्यासाठी व्यवस्था करावी. विरुद्ध बाजूने अतिरिक्त पाणी वाहून जाण्याकरिता पाइप बसवावा. यामुळे तलावांमध्ये १०० ते १२० सेंमी एवढी पाणी पातळी राखता येते. पाणी बदलणे देखील सहज शक्य होते.
 • माशांना नैसर्गिक शत्रूपासून संरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण युनिटला शेडनेट वापरून आच्छादित करावे.
 • पिले देणारे मासे (गप्पी, स्वोर्डटेल, मोली, प्लॅटी) तसेच कोईकार्प, गोल्डफिश, गुरामी, बार्ब अशा प्रकारच्या माशांच्या संवर्धनाकरिता हे युनिट जास्त योग्य ठरते.
 • अत्यंत माफक खर्चात, कमी जागेत, कमीत कमी साधनसामग्री वापरून व अत्यंत सोपे तंत्रज्ञान वापरून माशांचे संवर्धन करणे शक्य आहे.
 • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्यविद्याशाखेचा मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी शोभिवंत माशांच्या संवर्धनाकडे वळले आहेत. शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामधील पर्याय 

 • शोभिवंत माशांची पिले योग्य आकारापर्यंत वाढवून विक्री करणे.
 • विविध शोभिवंत माशांचे नियंत्रित वातावरणामध्ये प्रजननाद्वारे बीजनिर्मिती करून मत्स्यसंवर्धकांना पुरविणे.
 • प्रजननक्षम नर व मादी मासे तयार करून विक्री करणे.
 • शोभिवंत मासे व इतर आवश्यक साहित्य विकी (किरकोळ/ घाऊक) करणे.
 • शोभिवंत मत्स्यपालन व प्रजननाकरिता लागणारे जिवंत खाद्य निर्मिती करून विक्री करणे.
 • शोभिवंत पाणवनस्पती संवर्धन व विक्री.
 • कार्यालय, हॉटेल तसेच छंदप्रिय ग्राहकांना ‘मत्स्यालय व्यवस्थापन सेवा’ पुरविणे.
 • संपर्क : डॉ.नितीन सावंत, ९४२२९६३५३३ विनय सहस्रबुद्धे, ९४२२४५३१८१ डॉ. मनोज घुगूसकर, ९४०४९९२४५५ (गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.