देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या लक्ष

देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि व्यवस्थापनाला महत्त्व आहे. व्यवस्थापन करताना गोठा, आहार, माजाचे व्यवस्थापन, कृत्रिम रेतन आणि सुलभ विण्याची क्रिया याकडे लक्ष द्यावे. तरच आपल्याला वर्षाला एक वेत ही संकल्पना प्रत्यक्षात साध्य करणे शक्य होणार आहे.
It is important to check the health of the cow at regular intervals.
It is important to check the health of the cow at regular intervals.

देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि व्यवस्थापनाला महत्त्व आहे. व्यवस्थापन करताना गोठा, आहार, माजाचे व्यवस्थापन, कृत्रिम रेतन आणि सुलभ विण्याची क्रिया याकडे लक्ष द्यावे. तरच आपल्याला वर्षाला एक वेत ही संकल्पना प्रत्यक्षात साध्य करणे शक्य होणार आहे.  देशी गाईंचा दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्याकरिता सुलभ प्रजनन व्यवस्थापनास महत्त्व आहे. वर्षाला एक वेत किंवा १६ महिन्याला एक वेत मिळविणे गरजेचे आहे. सुलभ प्रजनन म्हणजेच फायदेशीर दुग्ध व्यवसाय अशी खूणगाठ असल्याने गाय व्यायल्यानंतरच आपणास जास्तीत जास्त दूध मिळते आणि ६ ते ७ महिन्यांनंतर दूध मिळणे कमी होते. याकरिता गाय व्यायल्यानंतर २ ते ३ महिन्यांत माजावर येऊन गाभण राहणे क्रमप्राप्त आहे. देशी गाईंमधील वंध्यत्व हा सुलभ प्रजननातील प्रमुख अडथळा आहे. म्हणजेच देशी गाय माजावर न येणे आणि माजावर येत असेल तर वारंवार उलटणे होय.  देशी गाईंमधील वंध्यत्व 

 •  वंध्यत्व म्हणजे देशी गाईंने माजाची लक्षणे न दाखविणे किंवा मुका माज दाखविणे. तसेच माजावर आल्यानंतर कृत्रिम रेतन केल्यानंतर सुद्धा गाभण न राहणे, गाभण राहिल्यानंतर प्रसूतीच्या अगोदर गर्भ बाहेर टाकणे. 
 •  आपल्या देशात वयात आलेल्या देशी कालवडींमध्ये वंध्यत्व मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे आर्थिक नुकसान होते. त्याकरिता जनावरांचे योग्य व्यवस्थापन, आहार आणि निगा याबाबतची पूर्तता करावी.
 •  देशी गाईंमध्ये ऋतुकालचक्र २१ दिवसांचे असते. जेव्हा जनावरांमध्ये ऋतुकालचक्राचे नियमन आणि नियमित माज दाखविणे पूर्णपणे थांबते तेव्हा देशी गाईंमध्ये वंध्यत्व दिसून येते. 
 • वंध्यत्वाची कारणे आणि उपचार  आनुवांशिक वंध्यत्व 

 •  अनुवांशिक कारणामुळे होणारे वंध्यत्व हे कायमस्वरूपी प्रकारचे वंध्यत्व आहे. आनुवांशिक वंध्यत्वावर कोणताही उपचार नाही. ही जनावरे कधीही गाभण राहत नाहीत, त्यामुळे जनावरांना कळपातून काढणे हाच एकमेव पर्याय आहे.
 •  नर वासराबरोबर जुळी जन्मलेली कालवड ही ९९ टक्के वांझ असते, त्यामुळे सदर कालवड विकत घेताना काळजी घ्यावी. 
 • असमतोल आहार 

 •  जनावरांच्या शरीराची झीज ही दुग्ध उत्पादनामुळे आणि गर्भाशयात वाढणाऱ्या वासरामुळे होत असते. सदर प्रकारची झीज ही फक्त जनावरांना समतोल आहार देऊन भागविता येते. 
 •  हिरवा चारा म्हणजेच मका, मेथी घास, तसेच सुका चारा म्हणजे कडबा आणि खुराक योग्य प्रमाणात देणे महत्त्वाचे आहे. 
 •   पशुपालक जनावरांना कमी प्रतीचा चारा म्हणजेच ऊस वाढे आणि भाताचा पेंढा यांसारखे खाद्य देतात. यामुळे शरीराची होणारी झीज कमी न होता वाढते. जनावरांचा शरीर सूचकांक कमी होतो. यामुळे जनावरांना माज दाखविण्यासाठी आवश्यक असणारी संप्रेरके पुरेशा प्रमाणात सुटत नाहीत, गाय माजाची लक्षणे दाखवीत नाही.
 •   शरीर सूचकांक कमी असताना माज दाखविला तरी गाभण राहत नाहीत. यामुळे दोन वितातील अंतर वाढते आणि भाकडकाळ वाढतो. 
 •   वंध्यत्व कमी करण्यासाठी योग्य समतोल आहार, खनिज मिश्रणांची योग्य मात्रा दैनंदिन आहारात देणे आवश्यक आहे. 
 • कृमींचा प्रादुर्भाव 

 •  देशी गाईंच्या शरीरातील विविध प्रकारचे कृमी आतड्यातील पोषक द्रव्ये शोषून घेतात.
 •  बाह्य परिजीवी म्हणजेच विविध प्रकारच्या गोचिड शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. याचा देशी गाईंच्या एकूणच स्वतःच्या वाढीवर परिणाम होतो.
 •  शरीरतील कृमी नियंत्रणासाठी जंतनाशकाच्या मात्रा दर तीन महिन्यांच्या अंतराने पशुवैद्यकांच्या सल्ल्याने द्याव्यात. बाह्य परिजीवीसाठी शिफारशीत औषधे वापरावीत. जेणेकरून कोणत्याही प्रकारची विषबाधा जनावरांस होणार नाही. 
 • प्रसूतिपश्‍चात आजार 

 •  जननेंद्रियाच्या जखमा, मायांग बाहेर येणे, कष्टप्रदप्रसूती आणि गर्भाशयाचा दाह दिसून येतो. 
 •  देशी गाईंमधील सुलभ प्रसूतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण सुलभ प्रसूती म्हणजेच सुलभ प्रजनन. 
 •  प्रसूतीपूर्व एक महिना आणि प्रसूतीनंतर एक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कारण या काळातच जनावरे विविध प्रकारच्या आजारांना बळी पडतात, विविध प्रकारच्या वंध्यत्वास सामोरे जातात. 
 •  मायांग बाहेर येणे आणि गर्भाशयाचा दाह या प्रकारच्या विकारांमुळे देशी गाईंमधील वंध्यत्व तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी सुद्धा होऊ शकते. याकरिता योग्य तो उपचार पशुवैद्यकांकडून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 
 • सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेलोसिस)  

 •  आजार कधीही बरा होणारा नाही. या आजारामध्ये जनावरे गाभणपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भ बाहेर टाकतात.
 • आजार एका जनावरांपासून दुसऱ्या जनावराला होतो. हा आजार जनावरांपासून पशुपालकांनासुद्धा होऊ शकतो याकरिता लवकरात लवकर निदान पशुवैद्यकांकडून करून घेणे आवश्यक आहे.
 • आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांस कळपातून काढून टाकणे हा एकमेव उपचार सद्यःस्थितीत आहे, नाहीतर पूर्ण गोठा बाधित होऊन जातो. गर्भपात होऊन पशुपालकांचे नुकसान होते. 
 • गाय वारंवार उलटणे   

 • जनावरांमध्ये फलनक्रिया न होणे म्हणजेच स्त्री बीज व शुक्राणूचे फलन होत नाही. याप्रकारामध्ये कृत्रिम रेतनाची अयोग्य वेळ तसेच योग्य माज न ओळखणे ही प्रमुख कारणे आहेत. सदर प्रकारचे वंध्यत्व हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून यामध्ये अचूक निदान महत्त्वाचे असते. 
 • यामधील दुसरा प्रकार म्हणजेच फलनक्रिया होते, परंतु तयार झालेला गर्भ गर्भाशयाच्या पिशवीत टिकत नाही आणि जनावरे २१ दिवसांनी माजावर न येता ३० ते ४० दिवसांनी माजावर येते.
 • या वंध्यत्वाच्या प्रकारात पशुवैद्यकाचे निदान आणि सल्ला महत्त्वाचा असतो. तज्ज्ञ पशुवैद्यकाची मदत किंवा अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून सदर विकारावर मात करता येते. 
 • माजाची लक्षणे न दाखविणे 

 • प्रजननसंस्थेच्या विविध विकारांमुळे आणि काही जनावरांच्या खोडीमुळे माजाची लक्षणे ठळकपणे दिसत नाहीत. यामुळे जनावरांनी माज दाखविला आहे किंवा नाही हे समजत नाही आणि जरी दाखविला तरी पशुपालकांना ओळखता येत नाही. 
 • सर्वसाधारणपणे माजाची लक्षणे आणि प्रजननविषयक विविध लक्षणांची माहिती पशुपालकांना असणे आवश्यक आहे.  
 • जनावरे साधारणतः पहाटे माज दाखवितात. जनावरे सतत हंबरतात. 
 • अयोग्य वेळी कृत्रिम रेतन 

 • देशी गाईंचा माज ओळखणे जितके महत्त्वाचे आहे तेवढेच कृत्रिम रेतन करण्याची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. शक्यतो वळू सोडणे टाळावे. ज्यामुळे देशी गार्इमध्ये अनेक न बरे होणारे आजार संक्रमित होतात.
 •  देशी गाई साधारणतः सकाळी माजावर आल्यानंतर तिला संध्याकाळी कृत्रिम रेतन करावे तसेच दुपारी किंवा संध्याकाळी माजावर आल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन करावे.
 •  कृत्रिम रेतन माजावर आल्यानंतर लगेचच किंवा २४ तासांनंतर केल्यानंतर देशी गार्इ गाभण राहत नाहीत आणि वारंवार उलटणे असे प्रकार होतात. 
 • गर्भधारणा तपासणी 

 • देशी गाईंमध्ये गर्भधारणा तपासणी करण्याकरिता सर्वसामान्य पशुवैद्यकास साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तरच तो योग्य निदान देऊ शकतो. परंतु अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर केल्यास ३० दिवसांची गर्भधारणा तपासणी अचूक करता येते. 
 • अल्ट्रासोनोग्राफी यंत्राचा वापर करून गर्भधारणा तपासणीसाठी लागणारा वेळ हा पशुवैद्यकाला हाताने लागणाऱ्या वेळे एवढाच आहे. यंत्राच्या साह्याने गर्भतपासणीसाठी लागणारा कालावधी ३० ते ६० दिवसांनी कमी होतो. यामुळे पशुपालकांचा वेळ वाचतो. 
 • अचूक व लवकर निदान झाल्याने जनावरांतील वांझपणा आणि सतत उलटणे या विकारांवर योग्य उपचार झाल्याने देशी गार्इ कमी कालावधीमध्ये गाभण राहतात. एकूणच भाकडकाळ कमी होतो. 
 • अचूक निदान झालेने प्रजनन संस्थेच्या विकारांवरील औषधोपचारासाठी लागणारा खर्च कमी करून  उत्पन्न वाढविणे शक्य होणार आहे.
 • - डॉ. अजित माळी,  ९८५००७०४८१  (पशुप्रजननशास्त्र व प्रसूती विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,  शिरवळ जि. सातारा)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com