कोंबड्यांना वेळेवर लसीकरण महत्त्वाचे...

कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे. लसीकरणाच्या अगोदर बॅच नंबर, लसीचे नाव, कंपनी, वापरण्याची अंतिम मुदत व मात्रा यांच्या नोंदी ठेवाव्यात.
Vaccination of chickens at the right time promotes good health.
Vaccination of chickens at the right time promotes good health.

कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे. लसीकरणाच्या अगोदर बॅच नंबर, लसीचे नाव, कंपनी, वापरण्याची अंतिम मुदत व मात्रा यांच्या नोंदी ठेवाव्यात. पोषक वातावरण मिळाल्यानंतर कोंबड्यांमध्ये विषाणू आणि जिवाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव सुरू होतो. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने कोंबड्यांमध्ये न्यूमोनिया, रक्ती हगवण, अफलाटॉक्सिन, टायफाइड, पुलोरम, पॅराटायफाइड, कॉलरा, सीआरडी, मानमोडी, इन्फेक्शियस ब्राँकायटिस, देवी हे आजार दिसतात. कुक्कुटपालनात संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरणास महत्त्व आहे. आजाराचा प्रसार कसा होतो, हे माहिती असणे गरजेचे आहे. आजारांचा प्रसार 

 • शेडमधील आजारी कोंबड्यांच्या विष्ठा, नैसर्गिक स्रावातून रोगकारक जंतू खाद्य, पाणी दूषित करतात. असे दूषित पाणी कोंबड्यांनी प्यायल्यास किंवा खाद्य खाल्ल्यास आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो.
 • शेड अस्वच्छ असल्यास प्रसार वेगाने होतो.
 • प्रत्येक कोंबडीला शेडमध्ये योग्य जागा न मिळाल्यास त्यांना शुद्ध हवेचा पुरवठा होत नाही. त्यामुळे कोंबड्या गुदमरून मृत्युमुखी पडू शकतात.
 • शेडमधील लिटर ओले झाल्यास रोगकारक जंतूंची वाढ झपाट्याने होते. उदा. रक्ती हगवण.
 •  आजारी कोंबड्या निरोगी कोंबड्यांमधून वेगळ्या न केल्यास रोगाचा प्रसार त्वरित होतो.
 • रोगाचा प्रसार झालेल्या शेडमधील भांडी, उपकरणे, काम करणारे कामगार, यांच्या अंगावरील कपडे, त्यांच्या वाहनांमुळे प्रसार जलद गतीने होते.
 • आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी 

 • शेड नेहमी स्वच्छ ठेवावी.
 • शेडमधील हवा खेळती राहावी यासाठी तुम्ही एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा.
 •  निकृष्ट प्रतीचे खाद्य वापरू नये, यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
 • शेडमधील लिटर ओले राहणार नाही याची काळजी घ्यावी.
 • स्वस्थ कोंबड्यांना आजारी कोंबड्यांपासून वेगळे ठेवावे.
 • कोंबड्यांना वेळोवेळी पिण्याच्या पाण्यामध्ये जीवनसत्त्व व खनिज दिल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहते.
 • कोंबडी विक्रीनंतर शेड स्वच्छ करावी. वापरण्यात आलेली उपकरणे, खाद्य व पाण्याची भांडी इत्यादी बाहेर काढून स्वच्छ धुऊन उन्हात ठेवून मगच वापरावीत.
 • लिटर कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकावे.
 • अंडी देणा­ऱ्या कोंबड्यांना महिन्यातून एकदा जंतनाशक पिण्याच्या पाण्याद्वारे द्यावे.
 • कोंबड्यांना इतर पक्षी, प्राणी व जनावरांपासून दूर ठेवावे.
 • मेलेल्या कोंबड्या, त्यांचे मलमूत्र, खाली पडलेली पिसे सर्व लांब नेऊन जाळून टाकावे. किंवा जमिनीत सहा फूट खोलवर पुरावे.
 • तज्ज्ञांमार्फत वेळोवेळी वैद्यकीय परीक्षण करावे.
 • कोंबड्यांना शिफारशीनुसार लसीकरण करावे.
 • लसीकरण 

 • विषाणू, जिवाणूपासून कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे. या बाबतीत तज्ज्ञांकडून लसीकरणासाठी योग्य वेळी द्यावयाची मात्रा, लस वाहतूक इत्यादींबाबत माहिती करून घ्यावी.
 • लसीकरणाच्या अगोदर बॅच नंबर, लसीचे नाव, कंपनी, वापरण्याची अंतिम मुदत व मात्रा यांच्या नोंदी ठेवाव्यात.
 • लस तयार करण्यासाठी उपयोगात आणण्याचे द्रव्य फ्रिजमध्ये ठेवावे.
 • लसीची मात्रा व त्याचे मिश्रण कंपनीच्या निर्देशानुसार तयार करावे.
 • कोंबड्यांना लसीकरणाचा अतिरिक्त ताण पडू नये म्हणून लसीकरण साधारणत: सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे.
 • आजारी कोंबड्यांमध्ये शक्यतो लसीकरण टाळावे.
 • लसीकरणाचा ताण कमी करण्यासाठी लसीकरण करण्यापूर्वी व नंतर तीन दिवस मल्टी जीवनसत्त्वाचे मिश्रण पिण्याच्या पाण्याद्वारे द्यावे.
 • लसीकरण करण्याच्या वेळी पिण्याच्या पाण्यात जीवनसत्त्वे वापरू नयेत.
 • पिण्याच्या पाण्याद्वारे लस द्यावयाची असेल तर अशा पाण्यामध्ये क्लोरीन किंवा प्रतिजैविके वापरू नयेत.
 • लसीची वाहतूक कंपनीपासून वापरण्याच्या जागेपर्यंत थर्मासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून करावी. योग्य प्रकारे वाहतूक नसेल तर लसीचा फायदा होणार नाही.
 • पाण्यातून लस देताना 

 • काही वेळा पिण्याच्या पाण्यामधून काही प्रतिबंधकात्मक लसीकरण केले जाते. अशा वेळेस लस ही पाण्यामध्ये समप्रमाणात विरघळली पाहिजे.
 • प्रत्येक कोंबडीला अपेक्षित लस मात्रा मिळाली पाहिजे. तरच प्रतिकारशक्ती तयार होईल.
 •  लसीकरणाअगोदर कोंबड्यांना भरपूर तहान लागली पाहिजे. यासाठी कमीत कमी १ ते २ तास पाण्याची भांडी रिकामी ठेवावीत.
 • पाण्यात समप्रमाणात लस मिसळावी. यासाठी प्रथम स्कीम मिल्क पावडर पाण्यात मिसळून पातळ करावी. जी लस द्यावयाची आहे, त्यावरील सूचनेप्रमाणे पाणी मिसळून हेच पाणी कोंबड्यांना पिण्यासाठी ठेवावे.
 • लसमिश्रित पाणी संपल्याशिवाय दुसरे पाणी कोंबड्यांना देऊ नका.
 • लसमिश्रित पाणी थंड राहावे म्हणून त्यामध्ये बर्फाचे खडे टाकावेत.
 • ब्रॉयलर कोंबड्यांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक   

  लस वय मात्रा पध्दत
  मरेक्स पहिला दिवस एक थेंब मानेच्या कातडीखाली
  लासोटा ५-७ दिवस एक थेंब डोळ्यांत/नाकात
   गंबोरो (आय.बी.डी.) १४-१८ दिवस एक थेंब पाण्यात/डोळ्यांत
   आय.बी.डी. व्हॅक्सीन २१-२८ दिवस एक थेंब डोळ्यांत/पाण्यात
  लासोटा ३०-३५ दिवस एक थेंब पाण्यात

  टीप :  तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोंबड्यांना लसीकरण करावे. संपर्क : श्रीकांत शिंदे, ९६५७२४२२४४ डॉ. जी. के. लोंढे, ९४२१४४९४९७ (पशुसवंर्धन व दुग्धशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com