शोभिवंत माशांचे बीजनिर्मिती तंत्र

शोभिवंत माशांमध्ये प्रजननाच्या विविध पद्धती आहेत. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शोभिवंत माशांचे बीजोत्पादन घेता येते. याबाबतची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
शोभिवंत माशांचे बीजनिर्मिती तंत्र
शोभिवंत माशांचे बीजनिर्मिती तंत्र

जगभर शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय वाढत आहे. तांत्रिक प्रगतीमुळे नियंत्रित वातावरणामध्ये माशांचे प्रजनन आणि बीजनिर्मिती करता येते. शोभिवंत माशांमध्ये प्रजननाच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये पिले देणारे मासे आणि अंडी देणारे मासे असे दोन प्रमुख वर्ग आहेत. पिले देणारे मासे : १) हे मासे विविध आकर्षक रंगाचे, लहान आकाराचे आहेत. यामध्ये गप्पी, प्लॅटी, स्वोर्डटेल, मोली यांचा समावेश होतो. २) नर मासे हे मादी माशांपेक्षा आकर्षक असल्याने नर-मादीमधील फरक सहज ओळखता येतो. ३) नर माशांच्या गुदपराचे रूपांतर ‘गोनोपोडियम’मध्ये झालेले असते. याद्वारे मादी माशांच्या पोटामधील अंडी फलित केली जातात. ४) प्रजननासाठी तयार झालेल्या मादीच्या पोटाजवळ काळसर ठिपका दिसून येतो त्याला ‘ग्रॅव्हिड स्पॉट’ असे म्हणतात. ५) या प्रकारच्या माशांचे प्रजननाकरिता १ नर : ३ ते ५ माद्या अशा प्रमाणात मासे सोडावेत. एकदा मिलन झाल्यानंतर मादी माशांच्या पोटातील अंडी टप्प्याटप्प्याने विकसित होऊन सुमारे ४ ते ५ वेळा पिले बाहेर येतात. माशांचा आकार आणि प्रकारानुसार एकावेळेस सुमारे १० ते २०० पिले जन्म घेतात. ६) नवजात पिलांच्या संरक्षणासाठी लपायला जागा उपलब्ध करून देणे गरजेचे असते, अन्यथा टाकीमधील इतर स्वजातीय मासे नवजात पिलांचे भक्षण करतात. हा आसरा निर्माण करण्यासाठी पाण वनस्पती किंवा प्लॅस्टिक पिशव्यांच्या पट्ट्याच्या झुपका यांचा वापर करावा. ७) पिंजऱ्यामध्ये नर-मादी मासे ठेवून देखील या प्रकारच्या माशांची बीजनिर्मिती केली जाते. यामध्ये पिले ही पिंजऱ्याबाहेर असल्याने इतर नर, मादी माशांपासून सुरक्षित राहतात. बाहेर आलेल्या पिलांना सुरुवातीला सुमारे १५ ते २० दिवस जिवंत खाद्य देणे आवश्यक असते. याकरिता इन्फोझोरिया, आर्टिमिया किंवा रोटिफर खाद्य म्हणून द्यावे. त्यानंतर कृत्रिम खाद्याचा वापर करता येतो. अंडी देणारे मासे : प्रजननावेळी मादी मासे अंडी सोडत असून त्यांचे फलन बाहेरील वातावरणात होते. अंडी देण्याच्या विविध पद्धतीवरून या माशांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार मत्स्यबीजनिर्मितीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अ) अंडी इतस्ततः सोडणारे मासे :

  •  या प्रकारामध्ये विविध प्रकारचे बार्ब मासे व डॅनिओ मासे यांचा समावेश होतो. माशांची अंडी चिकट नसून मादी मासे पाण्यामध्ये कोणत्याही विशिष्ट आकृतिबंधाशिवाय अंडी सोडतात. त्याचवेळी नर मासे शुक्राणू सोडतात. अंडी टाकीच्या तळाशी जात असताना शुक्राणूच्या संपर्कात येऊन फलित होतात. त्यानंतर सुमारे ४८ ते ७२ तासांमध्ये अंड्यांमधून पिले बाहेर येऊन टाकीला चिकटतात.
  •  जन्मजात पिलांमध्ये सुरुवातीच्या पोषणाकरिता योक सॅक असते. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये पिले मुक्तपणे पोहायला लागतात. त्या वेळी त्यांना सुरुवातीला इन्फुझोरिया, रोटिफर व आर्टिमिया असे खाद्य द्यावे लागते. त्यानंतर हळूहळू कृत्रिम खाद्याची सवय लागून पुढील संवर्धन करण्यात येते.
  •  मत्स्यबीजनिर्मिती दरम्यान फलित अंडी आणि नवजात पिले यांचे इतर माशांपासून संरक्षण होण्याकरिता टाकीमध्ये पाणवनस्पती किंवा छोट्या दगडांचा थर ठेवावा किंवा जाळीच्या पिंजऱ्यामध्ये नर मादी मासे ठेवावेत.
  •  प्रजननावेळी १ मादी : २ नर किंवा २ मादी : ३ नर अशा प्रमाणात
  • मासे ठेवण्यात येतात.
  • ब) अंडी चिकटवणारे मासे :

  •  यामध्ये एंजल फिश, डिस्कस, ऑस्कर इ. मासे आढळतात.
  •  या माशांची अंडी चिकट असून यामध्ये अंडी चिकटवण्याच्या विविध पद्धती आढळतात.
  •  पहिल्या प्रकारामध्ये मादी मासे इतरस्त्र: अंडी सोडतात. प्रजनन टाकीमधील उपलब्ध पृष्ठभागावर ही अंडी इतरत्र चिकटतात. गोल्ड फिश, कोई कार्प या माशांमध्ये या प्रकारचे प्रजनन आढळते.
  •  प्रजननाकरिता नर:मादी गुणोत्तर २:१ किंवा ३:२ या प्रमाणात ठेवण्यात येते.
  •  प्रजनन टाकीमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या पट्ट्यांचा झुपका किंवा पीव्हीसी पाइपचे तुकडे यांचा उपयोग अंडी चिकटवण्यासाठीचा पृष्ठभाग म्हणून केला जातो.
  •  दुसऱ्या प्रकारामध्ये मादी मासे एका विशिष्ट आकृतिबंधामध्ये पृष्ठभागावर अंडी चिकटवतात आणि नर मासे ती फलित करतात.
  •  या प्रकारामध्ये एका विशिष्ट कालावधीपर्यंत पिलांची काळजी घेण्याची सवय आढळते. प्रजननाकरिता नर व मादी माशांची जोडी असते. स्वतःची जोडी बनविण्याची सवय या माशांमध्ये आढळते.
  •  चिकटवलेली अंडी सुमारे ४८ ते ९६ तासांमध्ये पूर्ण विकसित होऊन त्यातून पिले बाहेर येतात. नवजात पिलांचे पोषण पुढील तीन ते चार दिवस योक सॅकद्वारे होते. त्यानंतर त्यांना योग्य प्रकारचे प्राणी प्लवंग खाद्य पुढील १५ ते २० दिवसांकरिता दिले जातात. पुढील संवर्धनाकरिता विविध प्रकारचे कृत्रिम खाद्य देण्यात येते.
  • क) घरट्यांमध्ये अंडी चिकटवणारे मासे :

  •  या प्रकारामध्ये नर मासे विशिष्ट प्रकारच्या बुडबुड्यांचे घरटे पाण्याच्या पृष्ठभागावर तयार करतात. एकदा घरटे बांधून पूर्ण झाले की मादी मासे अंडी सोडतात. ती टाकीच्या तळाशी स्थिरावतात. नराने सोडलेल्या शुक्राणूमार्फत अंडी फलित होतात. त्यानंतर तळाशी पडलेली अंडी नर मासा तोंडाद्वारे बुडबुड्यांच्या घरट्यांमध्ये चिकटवतो. पुढील ७२ ते ९६ तासांमध्ये अंड्यातून पिले बाहेर येतात. सुरुवातीला ३ ते ४ दिवस पिले घरट्यामध्ये चिकटून राहतात. तेथेच त्यांचे नैसर्गिकरीत्या योक सॅकद्वारे पोषण होते.
  •  पिले मुक्तपणे पोहायला लागल्यावर त्यांना सुरुवातीला आठ दिवस इन्फुझोरिया देणे आवश्यक असते. त्यानंतर पुढील १० ते १५ दिवस रोटिफर, आर्टिमिया देण्यात येते. पुढील संवर्धनाकरिता कृत्रिम खाद्य दिले जाते. यांचे प्रजननदेखील जोडीमध्ये होते.
  • ड) तोंडामध्ये अंडी धरणारे मासे :

  •  मॉर्फ्स, गोल्डन सिक्लीड अशा विविध प्रकारच्या सिक्लिड माशांचा या प्रकारामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.
  •  या प्रकारच्या बहुतांशी माशांमध्ये पॉलिगॅमस प्रवृत्ती असून, प्रजननाकरिता १ नरः ४ ते ५ माद्या असे प्रमाण आढळते.
  •  प्रजननादरम्यान मादी पाण्यामध्ये अंडी सोडते. ती तळाशी स्थिरावल्यानंतर तोंडामध्ये वेचून घेते. त्यानंतर मादी मासे नर माशांच्या गुदपराशी असलेल्या एग स्पॉटकडे आकर्षित होते. तेथे तोंडामधील अंड्यांवर नराद्वारे शुक्राणू सोडले जाऊन अंडी फलित होतात.
  •  मादी फलित अंडी तोंडामध्ये ठेवतात. तेथेच पिले बाहेर येतात. पुढील २० ते २५ दिवसांसाठी पिले मादीच्या तोंडामध्ये राहतात. त्यानंतर बाहेरील वातावरणात मुक्तपणे संचार करू लागतात.
  •  या माशांना सुरुवातीला आर्टिमिया ५ ते ७ दिवसांसाठी देऊन सोबत योग्य आकाराचे कृत्रिम खाद्य दिले तरी चालू शकते.
  • संपर्क ः विनय सहस्रबुद्धे, ९४२२४५३१८१ डॉ. नितीन सावंत, ९४२२९६३५३३ (मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, जि. सिंधुदुर्ग)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com