शेतकरी नियोजन ः रेशीमशेती

शेतामध्येच २५ बाय ५० फूट आकाराच्या २ रेशीम कीटक संगोपनगृहांची उभारणी केली. मागील काही वर्षात सततच्या दुष्काळामुळे सोयाबीन आणि कपाशी या पिकांपासून समाधानकारक उत्पादन मिळाले नाही. परंतु, रेशीम कोषापासून चांगले उत्पन्न मिळू लागल्यामुळे आत्मविश्‍वास वाढला आहे.
शेतकरी नियोजन ः रेशीमशेती
शेतकरी नियोजन ः रेशीमशेती

शेतकरी ः सोपान शिंदे गाव ः पांगरा शिंदे, ता.वसमत, जि.हिंगोली एकूण क्षेत्र ः १ हेक्टर ५३ आर तुती लागवड ः एक एकर आमच्या एकत्रित कुटुंबांच्या शेतीत दरवर्षी सोयाबीन व कापूस प्रत्येकी एक एकर, अर्धा एकर हळद, मूग, उडीद प्रत्येकी दहा गुंठे ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. एक एकरावर पेरू लागवड असून त्यात झेंडूचे आंतरपीक घेतले आहे. माझ्याकडे ४ देशी गायी, २ बैल, १० शेळ्या आणि १०० गावरान कोंबड्या आहेत. त्यांच्यापासून वर्षाला साधारण ६ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतामध्ये करतो. पारंपारिक पीक पद्धतीसोबतच शाश्‍वत उत्पन्नासाठी रेशीम शेती करतो. तुतीसह अन्य पिकांना गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खताचा वापर केला जातो.  मी प्रथम २०१४ मध्ये दीड एकर क्षेत्रावर तुतीच्या व्ही-१ या वाणाची लागवड केली होती. पहिल्या वर्षी रेशीम कोषाचे ४ क्विंटल उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये मनरेगा अंतर्गत गटशेतीतून १ एकर क्षेत्रावर पुन्हा तुती लागवड केली.  सुरवातीला २०१४ साली लागवड केलेली तुती जुनी झाल्यामुळे ती काढून टाकली. सध्या फक्त एक एकरावर तुती लागवड आहे. अवर्षणाच्या परिस्थितीमध्ये टॅंकरद्वारे पाणी विकत घेऊन तुती पीक जगवले आहे.  रेशीमशेती सुरू केल्यापासून २०१८ पर्यंत एका वर्षामध्ये ४ बॅच घेत होतो. मात्र, तुती क्षेत्र कमी केल्यामुळे मागील २ वर्षांपासून एकाच संगोपनगृहामध्ये २ बॅच रेशीम कोष उत्पादन घेत आहे. प्रत्येक बॅचला १०० अंडीपुंजांपासून सुमारे ७० ते ८० किलो रेशीम कोष उत्पादन मिळते. संगोपनगृहाची उभारणी ः मनरेगा आणि सीडीपी अंतर्गत संगोपनगृहासाठी अनुदान मिळाले. त्यातून शेतामध्येच २५ बाय ५० फूट आकाराच्या २ रेशीम कीटक संगोपनगृहांची उभारणी केली. मागील काही वर्षात सततच्या दुष्काळामुळे सोयाबीन आणि कपाशी या पिकांपासून समाधानकारक उत्पादन मिळाले नाही. परंतु, रेशीम कोषापासून चांगले उत्पन्न मिळू लागल्यामुळे आत्मविश्‍वास वाढला आहे. तुती रोपवाटिका ः

 •  साधारणपणे २०१५-१६ पासून तुती रोपवाटिका सुरू केली. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी मध्ये तुतीचे बेणे वापरून रोपे निर्मिती केली जाते.
 •  गावपरिसरासह अन्य जिल्ह्यातील शेतकरी जून-जुलै महिन्यात तुती रोपांच्या खरेदीसाठी येतात. रोपांची प्रतिनग ३ रुपये याप्रमाणे विक्री होते. रोप विक्रीमधून दरवर्षी सरासरी १ ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
 •  कोष उत्पादन वाढीसाठी दर्जेदार तुती पानांची आवश्यकता असते. त्यासाठी २०१७ मध्ये रेशीम किटकांचे संगोपन करताना तुतीच्या पानांवर गहू आणि सोयाबीन पावडर शिंपडून कृत्रिम प्रथिने देण्याचा प्रयोग केला. त्यामुळे जुन्या तुती पानांचे पोषणमूल्य वाढण्यास मदत झाली. तसेच गुटी कलमाने तुती रोपे तयार करण्याचा प्रयोग मी केला होता, त्यामुळे रोपे तयार करण्याचा कालावधी आणि खर्चही कमी होतो.
 •  माझी पत्नी सत्यभामा, भाऊ कुंडलिक आणि त्याची पत्नी प्रतिभा असे कुटुंबातील सर्वजण रेशीमशेतीसह अन्य शेतीची कामे करतो. शाश्‍वत उत्पन्न मिळत असल्यामुळे कोष, तुती रोपे निर्मितीत सातत्य ठेवले आहे.
 • मागील २० दिवसांतील कामकाज ः

 •  भेंडगाव (ता.वसमत) येथील चॉकी सेंटरमधून ३ ऑगस्ट रोजी १० दिवसांच्या अळ्या खरेदी केल्या. १०० अंडीपुंजांच्या बॅचच्या कोषाची काढणी साधारण २३ ऑगस्टला केली. त्यातून ९७ किलो कोष उत्पादन मिळाले. उत्पादित कोष पुर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष मार्केटमध्ये विक्री केली. रेशीम कोषाला प्रतिकिलो ३९५ रुपये इतका दर मिळाला.
 •  त्यानंतर २५ आणि २६ ऑगस्टला संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण केले.
 •  २८ ऑगस्ट रोजी तुतीची छाटणी आणि आंतरमशागत करून तण व्यवस्थापन केले.
 •  छाटणीनंतर २० दिवसांनी १७ सप्टेंबर रोजी सिंगल सुपर फॉस्फेट १५० किलो, युरिया ५० किलो, पोटॅश ३० किलो, निंबोळी पेंड ३० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ५० किलो याप्रमाणात दिले.
 •  यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे तुती पिकास पाणी देण्याची गरज भासली नाही.
 •  पावसाळ्यामध्ये हवामान तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करून पावसाचा अंदाज घेतो.
 •  रेशीम शेती फायदेशीर होण्याकरिता तुतीच्या पानांची काढणी, निर्जंतुकीकरण पावडर तसेच चुन्याच्या पावडरची धुरळणी, संगोपनगृहामध्ये हवा खेळती ठेवणे, स्पेसिंग व्यवस्थापन (अळ्यांची दाटी होऊ न देणे), संगोपनगृह जास्तीत जास्त कोरडे ठेवणे या बाबींचे काटेकोर नियोजन केले जाते. ग्रासरी सारख्या रोगांमुळे होणारे नुकसान कमी राहते.
 • पुढील ३० दिवसांचे नियोजन ः

 •  पुढील महिन्यामध्ये १०० अंडीपुंजाची नवीन बॅच घेणार आहे. त्यासाठी भेंडगाव (ता. वसमत) येथून चॉकी (बाल कीटक) आणणार आहोत. तत्पूर्वी रेशीम कीटक संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण केले जाईल.
 •  अळ्यांना सकाळी आणि संध्याकाळी देण्यासाठी प्रति बॅच सुमारे ३ टन तुती पाने लागतात. तुतीची दर्जेदार पाने मिळवण्यासाठी शेतामध्ये व्यवस्थित नियोजन करत आहे.
 •  दोन एकर क्षेत्रावर नव्याने तुती लागवडीचे नियोजन करत आहे.
 • - सोपान शिंदे ः९७६४१९८२१७, ८७८८७४४०८२ (शब्दांकन ः माणिक रासवे)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com