मत्स्यबीज गुणवत्तेचे महत्त्व

चांगली अन्न रूपांतरण क्षमता, उच्च वाढ दर क्षमता, कुठल्याही पर्यावरणीय परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता मत्स्यबीजामध्ये असावी. चांगली वाढ, रोगप्रतिकार क्षमता हे दर्जेदार मत्स्यबीजाचे गुणधर्म आहेत.
मत्स्यबीज गुणवत्तेचे महत्त्व
मत्स्यबीज गुणवत्तेचे महत्त्व

अलीकडील काळात मत्स्य व्यवसायात झपाट्याने होणारी वाढ ही मोठ्या प्रमाणात मत्स्यबीज उपलब्धतेमुळे होत आहे. साधारणतः आपल्याकडे मत्स्यबीज हे नदी संकलन, बांध प्रजनन आणि हॅचरीच्या माध्यमातून मिळवले जाते. १९८० च्या दशकापासून मत्स्यबीज उत्पादनात सातत्याने वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे चायनीज प्रकारचे कार्प हॅचरी तंत्रज्ञान आणि प्रेरित प्रजनन करण्यासाठी विविध संप्रेरके (हार्मोन्स) वापरण्याचे तंत्रज्ञान. १) माशांच्या हायपोफायशनचे तंत्र विकसित झाल्यानंतर या स्रोत्रांतून मत्स्यबीज उत्पादनाला सुरवात झाली. कार्प माशांचे बीज-स्रोत म्हणून हे तंत्र आजही प्रचलीत आहे. सुरवातीला हे तंत्रज्ञान राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागापुरते मर्यादित होते. परंतु आता सरकारी विभागाशिवाय अनेक खासगी व्यावसायिकही मत्स्यबीज उत्पादन आणि वितरण करतात. २) आपल्याकडे मत्स्यबीज निर्मिती आणि विक्रीसाठी निश्चित अशी मानके नाहीत. मत्स्यबीज विक्री करणाऱ्यांसाठी मान्यता किंवा प्रमाणपत्रासाठी नियम आणि नियमन नसल्यामुळे आज माशांच्या जाती, पैदास आणि मत्स्यबीजांची शास्त्रीय माहिती तसेच शास्त्रीय व्यवस्थापनाची माहिती नसलेले किंवा अपुरी माहिती असलेले पण मत्स्यबीजांचे उत्पादन आणि विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत. ३) सध्या निकृष्ट दर्जाच्या मत्स्यबीज गुणवत्तेची फार मोठी समस्या आहे. आजकाल माशांच्या जाती, योग्य मत्स्यबीज आणि त्यांच्या गुणवत्तेची ओळख नसणे ही गंभीर समस्या आहे. ४) शेतकऱ्यांना मत्स्यपालनाची माहिती नसल्यामुळे माशांच्या जाती, मत्स्यबिजांची ओळख आणि गुणवत्ता यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. उदाहरणार्थ, थाई मांगुर या माशांच्या जातीवर भारतात निर्बंध असूनसुद्धा या माशांचे मत्स्यबीज आणि माशांची सुद्धा देशी मांगूर या नावाखाली विक्री केली जात आहे. बहुतांशवेळी मत्स्यबीजांमध्ये विविध प्रजातीच्या माशांच्या मत्स्यबीजांची भेसळ करून शेतकऱ्यांना दिले जात आहे. म्हणूनच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दर्जेदार मत्स्यबीजाची उपलब्धता असणे हा शाश्वत मत्स्य-संवर्धनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ५) महाराष्ट्रातील मत्स्य-व्यवसाय हा कोलकता (हावडा), मधील मत्स्यबीज पुरवठ्यावर पूर्णपणे अवलंबून होता. अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बाहेरील राज्यातील मत्स्यबीजांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. म्हणूनच मत्स्य उत्पादकांसाठी मत्स्यबीजाच्या प्रमाणाबरोबरच गुणवत्ता किती महत्त्वाची आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मत्स्यबीजाचे चांगले आणि वाईट गुणवत्तेतील फरक :

निरीक्षण चांगल्या प्रतीचे फ्राय खराब प्रतीचे फ्राय
शरीराचा आकार चांगले तयार झालेले शरीर अशक्त / दुबळ्या शरीराच्या तुलनेने डोके मोठे असते
शरीराचा रंग तेजस्वी , चकचकीत फिकट रंग
खवले खवले काढलेल्या ठिकाणी डाग नसतात कमकुवत खवले आणि खवले काढलेल्या ठिकाणी डाग असतात
हालचाल चपळ आणि सामान्य हालचाली असतात सुस्त हालचाली असतात
प्रतिक्रिया स्पर्श केल्यास ताबडतोब प्रतिक्रिया देतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात कमकुवत प्रतिसाद देतात
स्पर्श शरीराचा पोत निसरडा असतो खडबडीत शरीर असते

संपर्क ः मुकेश भेंडारकर, ९८६०६५८५१२ (राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन संस्था, माळेगाव, बारामती, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.