गाई, म्हशींसाठी संतुलित आहार

गाई, म्हशींच्या अवस्थेनुसार पाणी, खुराक मिश्रण, कोरडा चारा आणि हिरवा चारा याचे योग्य नियोजन करावे. गरजेनुसार संतुलित आहार व्यवस्थापन केल्यास दुधाळ जनावरे निरोगी व उत्पादनक्षम राहून दूध उद्योग फायदेशीर ठरू शकतो.
buffalo feeding
buffalo feeding

गाई, म्हशींच्या अवस्थेनुसार पाणी, खुराक मिश्रण, कोरडा चारा आणि हिरवा चारा याचे योग्य नियोजन करावे. गरजेनुसार संतुलित आहार व्यवस्थापन केल्यास दुधाळ जनावरे निरोगी व उत्पादनक्षम राहून दूध उद्योग फायदेशीर ठरू शकतो.

गाई, म्हशींना हिरवा व वाळलेला चारा प्रमाणात देणे गरजेचे असते, यासाठी त्यांचे प्रमाण ३:१ असावे. केवळ हिरवा चारा दिल्यास दूध उत्पादनात वाढ होते, पण दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते, तसेच केवळ कोरडा/सुका चारा दिल्याने दुधातील फॅटचे प्रमाण वाढते पण दूध उत्पादन कमी होते. जनावरांच्या आहारात हिरवा तसेच कोरड्या चाऱ्याचे प्रमाण बरोबर असावे लागते. 

  • जनावरांना देण्यात येणाऱ्या हिरव्या चाऱ्यापैकी अर्धा सकाळी दूध काढल्यानंतर, तर अर्धा सायंकाळी दूध काढल्यानंतर द्यावा. 
  • चारा देताना त्याचे कटर यंत्राच्या साहाय्याने बारीक तुकडे करून घ्यावे. त्यामुळे जनावरांना खाण्यास सोय होते. तसेच कोठीपोटात पचन चांगले होते. यामुळे चाऱ्याची बचत होते व चारा वाया जात नाही. 
  •  जनावरांनी साधारणतः दिवसातून १८ तास रवंथ करायला पाहिजे. वाळलेला चारा दूध काढण्याअगोदर दोन तासांपूर्वी द्यावा. 
  • उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्यामुळे कोरडा चारा देण्याची वेळ ही पहाटे ५ वाजता तर दुपारी ४ नंतर असायला हवी. आठपर्यंत त्यांना हिरवा किंवा वाळलेला चारा द्यावा.
  • तापमानातील उष्णता वाढल्यानंतर चारा खाण्यास दिल्याने जनावरांना उष्णतेचा त्रास होतो. 
  • जनावरांना हिरवा चारा गरजेपेक्षा अधिक प्रमाणात दिल्याने त्यांना पोटफुगी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून दोन्ही चाऱ्याचे व्यवस्थापन प्रमाणात असणे गरजेचे असते.
  • जनावरांच्या आरोग्यासाठी खाद्याच्या बरोबरीने पाण्याची गरज फार महत्त्वाची असते. शरीरात वजनाच्या ६०-७० टक्के पाणी असते. जनावरांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छ, ताजे, निर्जंतुक पाणी २४ तास गोठ्यामध्ये उपलब्ध पाहिजे. पाण्यामुळे शरीराचे तापमान व्यवस्थित राखले जाते. शरीरातील विविध घटकांचे योग्य संतुलन ठेवले जाते. पाणी लाळ निर्मिती तसेच पचनक्रियेमध्ये मदत करते. दूध उत्पादनात वाढ होते.
  • खुराक मिश्रण देण्याचे नियोजन 

  • दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्न घटक गाईंना लागणाऱ्या अन्न घटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते. 
  • म्हशींच्या शरीर पोषणासाठी १.५ ते २ किलो खुराक आणि प्रति २ लिटर दुग्धोत्पादनासाठी १ किलो खुराक या प्रमाणात देणे गरजेचे आहे. 
  •  जनावरास खुराक देण्यापूर्वी ८ ते १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे. यामुळे त्याचा रुचकरपणा वाढतो. त्याची पाचकतादेखील वाढते. 
  •  आहारातील खुराकाचे प्रमाण कमी केल्यास दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम दिसून येतो. याचे कारण म्हणजे जनावरांना आहारातून दिलेले अन्नघटक प्रथम शरीर पोषणासाठी वापरले जातात आणि नंतर दुग्धोत्पादनासाठी वापरले जातात. 
  • गाईची जास्तीत जास्त दूध देण्याची मर्यादा किंवा तिची दूध उत्पादन करण्याची क्षमता ही आनुवंशिकतेने येते. त्यामुळे जास्त दूध देण्याची क्षमता गाईच्या अंगी नसेल तर तिला कितीही चांगले खाऊ घातले तरी जास्त दूध देऊ शकणार नाही.
  • संतुलित खाद्य 

  • संतुलित आहारामध्ये खुराक महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा  यांचे प्रमाण अधिक असते. खुराक मिश्रणाचा १oo किलो तत्त्वावर नमुना बनवावा. यामध्ये विविध खाद्य घटक वापरले जातात. 
  • जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता खुराक बनवताना त्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्ये वापरली जातात. प्रथिनांचा स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल यापासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. याचबरोबरीने भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, तूरचुणी, उडीदचुणी, मूगचुणीचा समावेश करता येतो.
  •  खाद्य घटक -----------------------------------   प्रमाण (टक्के) भरडले धान्य उदा. मका, ज्वारी, बाजरी  ------      ३०       गहू, ज्वारी  कोंडा   ------------------------------      २० भरडलेल्या डाळी उदा. हरभरा, तूर, उडीद ------      १२ तेलविरहित पेंड उदा. सरकी, शेंगदाणा, सोयाबीन    २० तेलयुक्त पेंड उदा. सोयाबीन, सूर्यफूल ------------   १५ खनिज, क्षार मिश्रण    -------------------------------  २ मीठ    -------------------------------------------------  १ एकूण  ----------------------------------------------    १००  

     -  डॉ. श्‍वेता मोरखडे, ९७६४५५९०६१  - डॉ कुलदीप देशपांडे, ८७८८४४५८१२ (स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशूविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com