खूर समस्येवर योग्य पोषण हाच उपाय

आवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल पोषणद्रव्ये ही गायी, म्हशींतील खूर समस्या आणि लंगडेपणास कारणीभूत ठरतात. क्षार मिश्रणात मँगेनीज, कॉपर तसेच कोबाल्ट या क्षारांचा समावेश असावा. जनावरांच्या आहारात चारा आणि खुराक याचे प्रमाण शक्यतो ६०:४० असे ठेवावे.
cow
cow

आवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल पोषणद्रव्ये ही गायी, म्हशींतील खूर समस्या आणि लंगडेपणास कारणीभूत ठरतात. क्षार मिश्रणात मँगेनीज, कॉपर तसेच कोबाल्ट या क्षारांचा समावेश असावा. जनावरांच्या आहारात चारा आणि खुराक याचे प्रमाण शक्यतो ६०:४० असे ठेवावे.

जास्त दूध देणाऱ्या गायी-म्हशींचे अयोग्य पोषण हे लंगडेपणासाठी कारणीभूत असणारा महत्त्वाचा घटक आहे. आवश्यकतेपेक्षा कमी, जास्त किंवा असमतोल पोषणद्रव्ये ही खूर समस्या आणि लंगडेपणास कारणीभूत ठरतात.  खुराक, चारा व्यवस्थापन

  • जनावरांच्या पोटातील अधिक आम्लता हे खुरांच्या पटलांच्या सुजेसाठी जबाबदार घटक आहे.  अधिक दुग्धोत्पादन असणाऱ्या गायी-म्हशींच्या आहारात चाऱ्याच्या तुलनेत खुराकातून अधिक पोषणमूल्ये पुरविली जातात. खुराकामध्ये धान्याची (मका/ज्वारी/बाजरी/गहू इ.) मात्रा अधिक असते. त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये अधिक प्रमाणात आम्ल तयार होते, त्यांच्या पोटातील सामू कमी करते. म्हणून अशा जनावरांच्या आहारात चारा आणि खुराक याचे प्रमाण शक्यतो ६०:४० असे ठेवावे. असे शक्य नसल्यास त्यांच्या आहारात खाण्याच्या सोड्याचा उपयोग करावा.
  •  दूध देणाऱ्या जनावरांना विण्यापूर्वी २ ते ३ आठवड्यांपासून खुराक देण्यास सुरुवात करावी, म्हणजे विल्यानंतर त्यांना जास्तीच्या दुग्धोत्पादनाकरिता लागणारा खुराक पचविण्याची सवय होईल. पोटात तयार होणारे आम्ल उत्पादन नियंत्रणात राहून पोटाचा सामू सामान्य राहण्यास मदत होईल.
  • दुधाळ जनावरांच्या पोटातील आम्लता कमी राहणे आणि सामू नियंत्रणात राहण्याकरिता अधिक पोषणमूल्य असलेला हिरवा, सुका चारा द्यावा. 
  •  जास्त तंतूंचे खाद्य जसे वाळलेले गवत आणि मुरघास रवंथ करणे वाढवते, त्यामुळे लाळेचा प्रवाह वाढतो आणि पोटातील आम्लता कमी होते.
  •  चारा कुट्टीची लांबी १ ते १.५ इंच एवढी असावी.
  • क्षार

  • ट्रेस क्षार विशिष्टपणे झिंक, मँगेनीज, कोपर, कोबाल्ट हे जनावरांतील लंगडेपणा कमी करण्यासाठी पोषण आहाराचे महत्त्वाचे घटक आहेत. हे गायीची प्रतिकारशक्ती वाढवतात प्रजोत्पादन आणि उतींची वाढ करतात. पोटामधील किण्वन प्रक्रिया वाढवतात आणि पचनास मदत करतात. हाडांचा विकास करतात याचा गायींवरील शारीरिक ताण, लंगडेपणा, कासदाह यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
  •  खाद्यामधील ट्रेस घटक हे खुरांचे आरोग्य वाढवतात. लंगडेपणाची विकृती कमी करतात. संशोधनात असे आढळून आले आहे, की २०० मिलिग्रॅम/दिवस एवढे झिंक जर जनावरांना खाद्यासोबत दिले, तर लंगडेपणा प्रादुर्भाव कमी होतो. 
  • झिंक विशिष्टपणे खुरांचे कार्य सुधारण्याचे काम करते. त्याच्या जखमा भरून नेण्याच्या परिणामामुळे नवीन एपिथेलियल उतींची वाढ होते. झिंक किराटीनच्या परिपक्वतेसाठी शिंगांच्या उतींत एक महत्त्वाचे घटक आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये झिंक चे प्रमाण हे २०० मिलिग्रॅम प्रति दिवस असावे.
  •  दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या क्षार मिश्रणात मँगेनीज, कॉपर तसेच कोबाल्ट या क्षारांचा समावेश असणे आवश्यक आहे. मँगेनीज पायांच्या समस्या कमी करण्यात मदत करते; तसेच पायांच्या रचनेमध्ये आणि हाडांमध्ये कोलेजन तयार होण्यामध्ये मदत करते. तांबे धातू पायांची खुरे, उती आणि कनेक्टिव्ह उतींला मजबूत करण्याचे काम करते. कोबाल्ट पोटामध्ये जीवनसत्त्व ब १२ तयार करते. खाद्यामध्ये सोडिअम आणि पोटॅशिअम या क्षारांचे प्रमाण हे अनुक्रमे ०.५ आणि १.८ टक्का असावे.
  • जीवनसत्त्वे 

  • बायोटिन २० मिलिग्रॅम प्रति दिवस गायीला खाद्यासोबत दिले, तर लंगडेपणाचा प्रादुर्भाव ५० टक्क्यांनी कमी होतो. खुरांच्या जखमा लवकर कमी होतात. लंगडेपणाच्या गुणवत्तेत सुधारणा होते. 
  • गायींना जीवनसत्त्व बी १२ दिले, तर दूध उत्पादन वाढते. लंगडेपणा कमी होण्यास मदत होते. 
  • लंगड्या गाई, म्हशींचे व्यवस्थापन 

  •  लंगड्या गाई, म्हशी कळपातील इतर जनावरांसोबत खाण्यासाठी स्पर्धा करू शकत नाहीत, म्हणून त्यांना निरोगी गायींपासून वेगळे करावे. वेगळ्या गोठ्यात वाळू किंवा मातीचा बिछाना असलेल्या किंवा योग्य बिछाना दिलेल्या जागी ठेवावे. नियमित स्वछता ठेवावी.
  • खुरांची जंतुनाशकच्या साह्याने मलमपट्टी करावी, तसेच दिवसातून दोन किंवा तीन वेळा कडुलिंबाचे तेल लावावे. 
  • जनावरांमध्ये जी लक्षणे दिसतात, त्यानुसार पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करावेत. गोठ्याची तसेच बिछान्याची नियमित स्वच्छता ठेवावी. गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
  •  - डॉ. गिरीश पंचभाई, ९७३०६३०१२२  (पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com