उत्पादन धिंगरी अळिंबीचे

अळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने, खनिजे, लोह, तांबे, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम आणि ब, क जीवनसत्त्वाचे प्रमाण दुप्पट असते. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर अळिंबी उपयुक्त आहे.
mushroom bed
mushroom bed

अळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने, खनिजे, लोह, तांबे, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम आणि ब, क जीवनसत्त्वाचे प्रमाण दुप्पट असते. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर अळिंबी उपयुक्त आहे.

अळिंबी ही बुरशी गटातील आहे. प्राचीन काळात ग्रीक, रोमन आणि भारतीय साहित्यात अळिंबी उद्योगाचा उल्लेख आढळतो. आज जागतिक अळिंबी उत्पादन ८.४९५ दशलक्ष मे. टन आहे. त्यापैकी ५५ टक्के युरोप, २७ टक्के उत्तर अमेरिका व १४  टक्के पूर्व आशिया खंडात घेतले जाते.  अळिंबीची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत केली जाते. जर्मनीमध्ये अळिंबीचे सर्वात अधिक सेवन केले जाते. भारतामध्ये अळिंबीचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे. जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. लागवड करणे तसेच त्यासाठी चांगले स्पॉन (बी) तयार करणे हा शेतीस एक चांगला पूरक उद्योग ठरत आहे. महिला वर्गाच्या आर्थिक सबलीकरणाचे सामर्थ असल्याने या व्यवसायाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आहारातील उपयुक्तता आणि औषधी गुणधर्म 

  • शुद्ध शाकाहारी लोकांसाठी नावीन्यपूर्ण खाद्य.
  •  उपयुक्त बुरशी असल्यामुळे प्रथिनांचे स्वरूप व चवही वनस्पती व प्राणीजन्य प्रथिनांपेक्षा भिन्न असते. पचनास सात्त्विक व पौष्टिक असते.
  • प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिप्टोफॅन ही महत्त्वाची अमिनो अॅसिडस असतात. तृणधान्यामध्ये त्यांचा अभाव असल्याने आळिंबीचा वापर केल्यास हे आवश्यक अमिनो अॅसिडस शरीराला मिळतात. 
  •   भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने, खनिजे, लोह, तांबे, स्फुरद, पालाश व कॅल्शिअम इत्यादी आणि ब, क जीवनसत्त्वे यांचे प्रमाण दुप्पट असते.
  • फोलिक अॅसिड व ब-१२ ही जीवनसत्त्वे उपलब्ध होतात. 
  • पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमाणामध्ये असल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी व आरोग्यवर्धक.
  • हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर उपयुक्त.
  • धिंगरी अळिंबीचे उत्पादन 
  • कमी भांडवल लागते.शेतातील टाकाऊ वस्तूंवर उत्पादन घेता येते.
  • कमी वेळ व कमी मजुरांमार्फत व्यवसाय चालवता येत असल्यामुळे गृहिणींसाठी चांगला पूरक  व्यवसाय आहे.
  •  कुक्कुटपालनासाठी बांधण्यात आलेली मोकळी शेड तसेच हवा खेळती असलेल्या निवाऱ्याची जागा चालते.
  •  उत्पादन व प्रक्रिया पद्धत सोपी असल्याने उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते.
  •  आवश्यक बाबी 

  • जागा :   उत्पादनासाठी जागा ही बंदिस्त स्वरूपाची लागते. झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यामध्ये चांगले उत्पादन घेता येते.  
  •    पाणी :   ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अळिंबी उत्पादनासाठी पाणी स्वच्छ असावे.  
  •  कच्चा माल :      उत्पादन प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असते. कच्च्या मालातील सेल्युलोज हा घटक आळिंबीचे महत्त्वाचे अन्न आहे. सेल्युलोज ज्या घटकात अधिक,त्यावर अळिंबीचे उत्पादन अधिक येते.    घटक पदार्थ निवडताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे घटक ( कच्चा माल) कोरडा हवा. तसेच तो नवीन काढणीचा हवा व पावसात भिजलेला नसावा. कच्चा माल साठविताना बंदिस्त जागेचा वापर करावा.
  • गव्हाचा भुसा,कपाशीच्या काड्या, भाताचा पेंढा, गवत, सोयाबीनचा भुसा,कडबा, इत्यादी.    
  • प्लॅस्टिक  पॉली प्रॅापिलीनचे वापरावे. जाडी (गेज) ८०-१०० असावी.  प्लॅस्टिकचा आकार १८ बाय २२ इंच किवा २२ बाय २७ इंच असावा

    स्पॉन (बियाणे) 

  •    अळिंबीच्या बियाणांस स्पॉन असे म्हणतात.
  • गव्हाच्या दाण्यावर अळिंबीच्या बिजाणूंची वाढ केली जाते. प्लॅस्टिकच्या पिशवीत ५०० ग्रॅम, १ कि.ग्रॅ. या नुसार बियाणे उपलब्ध असते.
  • वातावरण

  • वातावरण हे अंधारमय हवे. वातावरणात आद्रता ७० ते ८० टक्के , तापमान १८ ते २८ अंश सेल्सिअस असावे. उत्तम उत्पादनासाठी खेळती हवा असणे ही एक महत्त्वाची बाब आहे.
  • यंत्रसामग्री 

  • आळिंबी उत्पादनाकरिता खूप मोठी अवजड व महाग यंत्र किंवा साहित्य लागत नाही.
  • ड्रम-  (कच्चा माल भिजवण्यासाठी )
  • हीटर  - (पाणी गरम करण्यासाठी )
  •  फॉगर्स, ह्युमिडी फायर - (वातावरण नियंत्रित)
  • ड्रायर - अळिंबी वाळविण्यासाठी 
  •  थर्मामीटर - तापमानाची नोंद ठेवण्यासाठी 
  •   हेअर हायग्रोमीटर - आद्रता दर्शवण्यासाठी 
  • रसायने - फॉरमॅलीन, बुरशीनाशक
  •   डाळीचे पीठ
  • प्रमुख प्रजाती     निसर्गामध्ये पावसाळ्यात अनेक प्रकारच्या व आकाराच्या अळिंबी आढळतात.अळिंबीच्या जगात १२ हजारांहून अधिक जाती असल्याची नोंद आहे. परंतु निसर्गात आढळणारी सर्वच अळिंबी खाण्यास योग्य नसते. खाण्यायोग्य किंवा विषारी अळिंबीतील फरक सहजपणे सांगता येत नाही. तज्ज्ञ किंवा संशोधन केंद्रातर्फे याविषयी खात्री करूनच लागवड करावी. खाण्यास योग्य जातींपैकी ५ ते ६ जाती व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यात येतात. भारतामध्ये बटण मशरूम, धिंगरी, भात पेंढ्यावरील अळिंबी (वोल्व्हिएला वोल्वासा) या जातींच्या अळिंबीची लागवड केली जाते.

    बटण अळिंबी  

  • बटण अळिंबीचे उत्पादन आपल्या भागामध्ये होत नाही. हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब राज्यात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
  •  बटण अळिंबीची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्धत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. 
  • कंपोस्टच्या वजनाच्या ५ टक्के ते १० टक्के या प्रमाणात स्पॉन पेरले जाते. १२ ते १५ दिवसांनी बुरशीची वाढ होते. दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो.  उत्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते. 
  • नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व  आद्रता ८० ते ८५ टक्के या स्थितीत अळिंबीचे उत्पादन ८ ते १० महिने घेता येते.
  • धिंगरी (शिंपला) अळिंबी 

  • धिंगरी अळिंबीचे उत्पादन संपूर्ण भारतामध्ये करतात. 
  •  या अळिंबीचे उत्पादन बटण अळिंबीपेक्षा अल्प खर्चीक व किफायतशीर आहे.
  • अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्पादन देणारी जात आहे. 
  • उत्पादनासाठी पाणी कमी लागते. २०० लिटर पाणी असतानासुद्धा उत्पादन घेऊ शकतो.
  • विषारी अळिंबीची ओळख  

  • निसर्गातील काही अळिंबी जाती या अति जहाल विषारी आहेत. अशा जातींचे अल्प प्रमाणात जरी सेवन करण्यात आले तरी विषबाधा होऊन प्रसंगी मृत्यू होण्याची शक्यता असते.
  •  दुर्दैवाने विषारी अळिंबी ओळखण्याकरिता खास असे कोणतेही वर्णन किंवा सोपी व सरळ पद्धत नाही.
  •  संशोधन केंद्रातर्फे याविषयी खात्री करून 
  • नंतरच त्याचा उपयोग निर्मिती आणि खाण्यासाठी करावा.
  • अॅमेनीटा, काप्रीनस या प्रजातींतील अळिंबी अति विषारी असते.  
  • विषारी अळिंबी ओळखण्याचे मुद्दे  

  • जुनाट लाकडावर वाढतात. तसेच त्या रंगाने चकचकीत असतात.
  • चव उग्र व न आवडण्यासारखी असते.
  • अळिंबीचा दांडा बिनविषारी अळिंबीपेक्षा तोडण्यास जड असतो.
  • बिजाणू तांबूस रंगाचे असतात.
  •  विषारी अळिंबी शिजवताना चमचा अथवा चांदीचे नाणे संपर्कात आल्यास काळे पडते.
  • अळिंबीच्या दांड्याच्या बुडाशी कपाच्या आकाराची गाठ असते.
  •  वरील मुद्द्यांचा आपण मार्गदर्शक म्हणून उपयोग करू शकतो. तसेच काही खाण्यास योग्य अळिंबीच्या बुडाशीही कपाच्या आकाराची गाठ असू शकते.
  • -विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०

    ( दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, जि.औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com