जनावरांतील पोटाचे आजार कसे ओळखाल?

जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१० तासांचा वेळ द्यावा. पशुआहारात क्षार मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर करावा. टंचाईच्या काळात शेतातील दुय्यम पदार्थांचा आहारात वापर करताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
provide balanced diet to Milch animals
provide balanced diet to Milch animals

जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१० तासांचा वेळ द्यावा. पशुआहारात क्षार मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर करावा. टंचाईच्या काळात शेतातील दुय्यम पदार्थांचा आहारात वापर करताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जनावरांना गरजेनुसार स्वच्छ, ताजे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करावे. जनावरांचे आरोग्य मुख्यतः पोटाचे आरोग्य आणि कार्यक्षमता यावर अवलंबून असते. जनावरांनी खाल्लेला चारा, खुराक पोटात विविध क्रिया होऊन पचवला जातो. त्यातील पोषणतत्त्वे जनावरांच्या शरीरपोषण, आरोग्य आणि उत्पादनासाठी उपयोगी पडतात. पोटाच्या आरोग्यात बिघाड झाल्यास चारा, खुराकाचे पचन नीट होत नाही. परिणामी जनावराचे शरीरपोषण नीट होत नाही. दूध उत्पादनात घट येते. त्यासाठी पोटाचे विकार वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे ओळखा पोटाचे आजार 

 • जनावराच्या शेणाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. एकदम पातळ किंवा घट्ट शेण पोटाच्या तक्रारी दर्शवतात. शेण एकदम पाण्यासारखे आहे का? शेणामध्ये चाऱ्याचे, धान्याचे कण आहेत का? शेण जास्त प्रमाणात की कमी प्रमाणात टाकले जाते? जनावर दिवसातून किती वेळा शेण टाकते? शेण टाकताना जनावरास त्रास होतो का? शेणात चिकट स्त्राव आहे का? या सर्व बाबींवरून जनावरात पोटाचे विकार झाल्याचे स्पष्ट होते.
 • जनावराच्या हालचालींचे निरीक्षण करावे. जनावर सतत ऊठ-बस करते का? जमिनीवर पडून पोटावर लाथा मारते का? या बाबींचे निरीक्षण करावे.
 • पोटात वेदना होत असतील तर जनावर कण्हत, विव्हळत असते.
 • जनावराचे पोट फुगलेले किंवा एकदम आत गेले असल्यास, पोटफुगी किंवा चारा न खाणे या गोष्टींचे निदान करता येते.
 • काही वेळा जनावराच्या पोटामध्ये गॅस होतो. अशावेळी जनावराच्या डाव्या बाजूच्या त्रिकोणाकृती भकाळीवरून पोटावर हळूवार बोटांनी मारल्यास डबडब असा आवाज येतो. पोट गच्च असेल तर आवाज येत नाही. तसेच गच्च पोटावर बोटांनी दाबल्यास बोटांचे व्रण उमटतात.
 • पोटाच्या डाव्या बाजूच्या भकाळीवरून हाताची मूठ बंद करून दाब दिल्यास ५ मिनिटांमध्ये ७ वेळा हात बाहेर ढकलला जातो. जर पोटाचे आरोग्य चांगले असेल तरच असे होते. मात्र, पोटामध्ये काही समस्या असेल तर ५ मिनिटांमध्ये ५ पेक्षा कमी वेळा हात बाहेर ढकलला जातो.
 • पोटाच्या तक्रारीमध्ये कधीकधी पोटातील गॅस गुदद्वारामधून बाहेर टाकला जातो.
 • पोट जास्त गच्च असेल तर जनावर सतत पाठ ताणत असते.
 • पोटाच्या तक्रारींमध्ये जनावराच्या पोटाजवळ गेल्यास गड-गड असा आवाज येतो.
 • जनावराच्या पोटात काही तक्रारी असल्यास चारा कमी खाणे, अपचनासारखी लक्षणे दिसून येतात.
 • पोटाच्या तक्रारी न होण्यासाठी उपाययोजना 

 • जनावरांना गरजेनुसार वाळलेला-हिरवा चारा, खुराक दिवसातून २ वेळा विभागून द्यावा.
 • एकावेळी जास्त खुराक देऊ नये. खुराक म्हणजे ज्वारी, मका, बाजरी, सरकी पेंड, सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल पेंड, गहू भुसा, भाताचा कोंडा, उडीद चुणी, क्षार मिश्रण व मीठ यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण असावे.
 • जनावराच्या आहारात अचानक बदल करू नये. बदल करायचा असल्यास हळूहळू करावा.
 • जनावरांना गरजेप्रमाणे हिरवा चारा, वाळला चारा आणि संतुलित खुराक एकत्र मिश्रण करूनच दूध काढतेवेळी द्यावे.
 • जनावरांच्या आहारात पिठाचा अंतर्भाव करू नये.
 • शिळे अन्न, समारंभातील शिल्लक अन्न, बुरशीजन्य चारा-खाद्य जास्त प्रमाणात देणे टाळावे.
 • खुराकामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त मका, ज्वारी, बाजरी भरड्याचा वापर टाळावा.
 • फक्त हिरवा किंवा वाळलेला चारा देणे टाळावे.
 • जनावराच्या पोटाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी प्रोबायोटिक्सचा अधूनमधून वापर करावा.
 • स्वस्त मिळणाऱ्या बाबींचा जनावरांच्या आहारात जास्त वापर करू नये. वापर करताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 • जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० तासांचा वेळ द्यावा.
 • पशुआहारात क्षार मिश्रणाचा योग्य प्रमाणात वापर करावा.
 • टंचाईच्या काळात शेतातील दुय्यम पदार्थांचा आहारात वापर करताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 • जनावरांना गरजेनुसार स्वच्छ, ताजे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करावे. पिण्यासाठी अस्वच्छ पाणी देणे टाळावे.
 • पोटाच्या समस्येचे निदान करून आहारात योग्य ते बदल करावेत.
 • आहारात युरिया व इतर घटकांचा वापर योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने करावा.
 • संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com