दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रे

गोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत वाढले असेल, तर माश्‍या, डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेऊन गोठा उंच ठिकाणी असावा. जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.
keep the cattle shed clean and dry.
keep the cattle shed clean and dry.

गोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत वाढले असेल, तर माश्‍या, डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेऊन गोठा उंच ठिकाणी असावा. जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. व्यवस्थापनातील त्रुटीमुळे जनावरांमध्ये अनेक आजार उद्‌भवतात. गोचीड, हवामानातील अचानक बदल, अपुरा आहार, अस्वच्छ गोठा, सभोवतालचे वातावरण इत्यादी घटक जनावरांमध्ये आजार उद्‌भवण्यास कारणीभूत ठरतात. या घटकांचे वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. आजाराच्या प्रतिबंधासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना ओळखून वेळीच उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. आजारासाठी कारणीभूत घटक आणि उपाययोजना ः आहार 

  • असंतुलित आहारामुळे जनावरांमध्ये पोषणतत्त्वांचे कमी जास्त प्रमाण दिसून येते. जनावरांची रोगप्रतिकारक्षमता खालावते. अशी जनावरे आजारांना सहज बळी पडतात.
  • जनावरांना त्याच्या शरीर वजनानुसार, उत्पादनानुसार, वाढीच्या दरानुसार पोषणतत्त्वांचा आहारातून पुरवठा करणे गरजेचे असते. आहारात एकदल, द्विदल चारा, गरजेनुसार पशुखाद्य, क्षार मिश्रण, मीठ इत्यादींचा समावेश करावा.
  • व्यवस्थित निवारा उपलब्ध नसणे 

  • काही ठिकाणी जनावरांचे शेड एकदम खुजे पत्र्याचे असते. गोठ्यामध्ये हवा पुरेशी हवा येत नसल्यामुळे उष्णतेचा त्रास वाढतो. जनावरांना बसण्यासाठी योग्य प्रमाणात जागा आणि चारा खाण्यासाठी व्यवस्थित गव्हाण उपलब्ध नसते. या सर्व बाबींमुळे गोठा कोंदट होतो. परिणामी, जनावरे चारा कमी खातात. गोठा कोरडा राहत नाही. याचा एकत्रित परिणाम जनावरावर होऊन ते आजारी पडते.
  • गोठा तयार करताना पशुवैद्यकाच्या सल्ला घ्यावा. गोठ्यामध्ये जनावरांच्या प्रकारानुसार शेडची उंची, बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी लागणारी जागा, गव्हाणीची जागा (लांबी, रुंदी, खोली), सभोवतालच्या भिंतींची उंची, चारा साठवणुकीची जागा, नाली इत्यादी बाबींचा विचार करावा.
  • गोठ्यातील अस्वच्छता 

  • गोठ्यातील अस्वच्छतेमुळे रोगकारक जिवाणूंची वाढ होते. गोचीड, पिसवा, डास, माश्‍या यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली जनावरे आजारास लगेच बळी पडतात. जनावरांमध्ये काससुजी, श्‍वसनाचे आजार, कातडी/खुरांचे आजार वाढतात. तसेच अस्वच्छ दूध निर्मिती होते.
  • गोचिडांची संख्या वाढल्यामुळे जनावरांत रक्तक्षय होतो. गोचीड तापासारखे आजार उद्‌भवतात. माश्‍या व डास यांच्या प्रादुर्भावामुळे जनावरे बैचेन राहतात. चारा कमी खातात, कातडीवर पुरळ येतात.
  • त्यासाठी गोठा नेहमी हवेशीर आणि कोरडा ठेवावा. गोठ्यात खड्डे नसावेत. गोठा कोरडा राहण्यासाठी गोठ्यामध्ये योग्य उतार व नाली असावी. माश्‍या, डास, कीटक यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निमतेल + करंजी तेल गोठ्यात दर ३ दिवसांनी ४ ते ५ वेळा फवारावे.
  • गोठ्याच्या सभोवतालचा परिसर 

  • गोठ्याच्या भोवतालच्या परिसरात पाणीसाठा, दलदल आणि जास्त गवत वाढले असेल तर माशा, डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • गोठा उंच ठिकाणी असावा. गोठ्याच्या सभोवतालच्या पाणीसाठ्यामुळे दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी मुरूम भरून योग्य प्रमाणात जमिनीस उतार काढून द्यावा. पाणी साठत असलेल्या ठिकाणी मुरूम भरून घ्यावे. साठलेल्या पाण्यावर नीम किंवा करंजी तेल टाकल्यामुळे डास, माश्‍यांच्या उत्पत्तीवर नियंत्रणास मिळवता येते.
  • वातावरणातील अचानक बदल

  • वातावरणातील अचानक बदलामुळे जनावरांच्या शरीरावर एक प्रकारचा ताण येतो. जनावरांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, ताप येतो किंवा शरीर थंड पडते. त्यामुळे जनावरे चारा कमी खातात.
  • वातावरण बदलावेळी जनावरांस पाण्यातून इलेक्‍ट्रोलाइट्‌स, इंजेक्‍शन द्यावीत. तसेच जीवनसत्व अ, ई, क, सेलेनियम, झिंक अशा घटकांचा जनावरांना पुरवठा करावा.
  • आहारातील अचानक बदल  जनावरांची पचन व्यवस्था चांगली राहण्यासाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात चारा, पशुखाद्य देणे गरजेचे असते. आहारातील अचानक बदलामुळे अपचन, पोटफुगी, हगवण, पोट गच्च होणे इत्यादी समस्या उद्‌भवतात. त्याकरिता जनावरांचा प्रकार, वजन आणि उत्पादनानुसार ठरलेल्या वेळीच योग्य प्रमाणात आहार द्यावा. आहाराची वेळ आणि प्रमाण यात बदल करू नये. आहारात एखाद्या घटकाचा जास्त पुरवठा करणे टाळावे. आहारात बदल करावयाचा असल्यास हळूहळू करावा. त्याकरिता १५ दिवसांचा कालावधी द्यावा. लसीकरण  जनावरांच्या प्रकारानुसार योग्य वयात, योग्य मात्रेत, योग्य पद्धतीने लसीकरण न केल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खालावते. जनावरे अशक्त होतात. गोठ्यातील आजारी जनावरांना तात्काळ लसीकरण न केल्यास इतर जनावरांना संसर्गजन्य आजाराची बाधा होऊ शकते. त्यासाठी सर्व जनावरांना योग्य वेळी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. जंतनिर्मूलन  जनावरांत जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास कुपोषण, रक्तक्षय होतो. जनावरांचे आरोग्य बिघडून जनावर अशक्त होतात. अशा जनावरांना अवयवांचे आजार उद्‍भवतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर इतर आजारांना सहज बळी पडते. त्याकरिता योग्य वेळी, गरजेनुसार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंताचे औषधे द्यावीत. शेण तपासणी करून जंतनिर्मूलन केल्यास परिणामकारक जंतनिर्मूलन करता येते. गव्हाणीची स्वच्छता 

  • गव्हाणीतील शिल्लक चाऱ्यावर सतत नवीन चारा किंवा खाद्य टाकले जाते. ओलसर चाऱ्यामुळे गव्हाणीतील चारा, खाद्य गव्हाणीस चिकटून बसते. त्यामुळे बुरशी व इतर जीवजंतूंची वाढ होते. यामुळे आजार उद्‍भवण्याची शक्यता असते. गव्हाणीला वास येतो. त्यामुळे जनावरे चारा खात नाहीत.
  • गव्हाणीची दररोज स्वच्छता करून नवीन चारा द्यावा. गव्हाणी ओलसर असतील तर कोरड्या करून घ्याव्यात. जनावरांच्या प्रकारानुसार गव्हाणीचा आकार आणि उंची ठरवावी.
  • बाधित आणि निरोगी जनावरे एकत्र बांधणे बाधित आणि निरोगी जनावरे एकत्र बांधल्यामुळे जंत, संसर्गजन्य आजारांचा फैलाव जलद व मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी गोठ्यातील आजारी जनावरांना वेगळे करून उपचार करावेत. व्यवस्थापनासाठी वेगळे मजूर ठेवावेत. जनावर पूर्ण आजारमुक्त झाल्यावर इतर जनावरांत मिसळू द्यावे.  जनावरे चरायला सोडणे टाळावे 

  • जनावरांना बाहेर चरायला सोडल्यामुळे दूषित चारा, पाणी त्याचबरोबर बाधित जनावरांच्या संपर्कामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असतो. त्यासाठी जनावरांना विनाकारण बाहेर सोडू नये. गोठ्यात चाऱ्याची सोय करावी.
  • व्यायामासाठी मुक्त संचार गोठा पद्धतीचा वापरावी. गोठ्यात जनावरे ठेवल्यामुळे त्यांना गरजेप्रमाणे चारा मिळतो. त्यांची उत्पादकता वाढते.
  • बाधित जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन निरोगी जनावरांच्या गोठ्यात जाणे टाळावे. यामुळे रोगप्रसाराची शक्यता असते. चप्पल, कपडे, हात इत्यादींमार्फत जीवजंतूंचा प्रसार होण्याची शक्यता असते.
  • पाण्याची भांडी, हौद यांची अस्वच्छता, भांड्यातील पाण्यामध्ये पक्ष्यांची विष्ठा पडून पाणी दूषित होते. यामुळे जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. दूषित पाण्याद्वारे लहान जनावरांत सालमोनेला, ई-कोलायचा प्रादुर्भाव होऊन सतत हगवण होते. त्यामुळे पाण्याची भांडी/ हौद निवाऱ्याखाली ठेवावीत. पाण्याचे हौद वेळोवेळी स्वच्छ धुवावेत. हौदाला आतून चुना लावून घ्यावा. पाणी निर्जंतुकीकरणासाठीच्या औषधींचा वापर करावा.
  • संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com