जनावरांच्या आहारात असावीत योग्य चिलेटेड खनिज मिश्रणे

वासरांची वाढ लवकर होण्यासाठी चिलेटेड खनिजांची मदत होते.
वासरांची वाढ लवकर होण्यासाठी चिलेटेड खनिजांची मदत होते.

गाई, म्हशींकडून जास्त दूध उत्पादन, रोगप्रतिकारकशक्ती वाढ, वेळेवर माजावर येणे, गाभण राहणे, वासरांची लवकर वाढ होण्यासाठी चिलेटेड खनिजांची मदत होते. पशुपालकांनी योग्य व खात्रीशीर चिलेटेड खनिज मिश्रणाचा योग्य वापर पशुआहारात दररोज करावा. चांगल्या प्रतीच्या रेतमात्रा वापरून नवीन जातिवंत कालवड गोठ्यात तयार करून त्यायोगे जास्तीत जास्त दूध उत्पादन घेण्याकडे पशुपालकांचा कल आहे. चांगल्या व्यवस्थापनाबरोबरच दर्जेदार पशुखाद्य किंवा आंबोण, हिरवा व कोरडा चारा, याबरोबरच चांगल्या प्रतीची पशुखाद्य पुरके उपयुक्त ठरतात. गाई, म्हशी वेळेवर माजावर येणे आणि गाभण जाणे, वासराची योग्य वाढ, विताना वार न अडकणे, खुरांची काळजी, कासदाहाला प्रतिकार, खाद्य व चाऱ्याच्या योग्य पचनामध्ये पुरके उपयुक्त ठरतात. या पुरकांमध्ये चिलेटेड खनिज मिश्रणांचा समावेश झाला. बाजारात अनेक प्रकारची खनिज मिश्रणे चिलेटेड आणि साध्या प्रकारात काही जीवनसत्त्वे व इतर पूरक घटकांसोबत उपलब्ध आहेत. पशुपालक गाई, म्हशी, कालवडींना पशुआहारासोबत पूरक म्हणून खनिज मिश्रण देतात. परंतू काही पशुपालक दर काही महिन्यांनी खनिज मिश्रणे बदलतात. खनिज मिश्रणांचा वापर, प्रमाण तसेच त्यातील घटकांविषयी जागरूकता नाही. त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसत नाही. यामुळे चांगले खनिज मिश्रण कुठले? चिलेटेड द्यावे की नॉन-चिलेटेड? कधी द्यावे?, किती प्रमाणात द्यावे?, ते देऊन नक्की काय फायदा होतो, चिलेटेड म्हणजे नेमके काय? सर्व खनिजे चिलेटेड असतात का? गाभण जनावरांना ते चालते का? हे प्रश्न पशुपालकांमध्ये असतात. खनिज मिश्रणांचा वापर ः दुधावाटे फॅट, प्रथिने, शर्करा याचबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, झिंक, कोबाल्ट, मॅंगेनीज, कॉपर, सेलेनिअम इ. मोठ्या प्रमाणात शरीराबाहेर गेल्यामुळे त्यांची कमतरता निर्माण होते. खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी खनिज मिश्रणांचा वापर सुरू झाला. त्यासाठी ऑक्साईडस सल्फेटस, फोस्फेट, लाईम स्टोन पावडर इत्यादी संयुगे वापरून खनिज मिश्रण बनवले गेले. परंतू त्यांचे एकमेकांच्या विरोधी असलेले धन व ऋण भार आणि इतर अणुबरोबर संयोग पावण्याची क्षमता तसेच शरीरातून लवकर होणारे उत्सर्जन, यामुळे त्यांचे गायी, म्हशींच्या कोठीपोटात व आतड्यात गेल्यानंतर तिथे त्यांचे शरीरामध्ये अतिशय कमी प्रमाणात शोषण होते, असे दिसून आले.

  • संकरित गाई तसेच जास्त दूध देणाऱ्या मुऱ्हा, मेहसाणा म्हशींना दुग्धोत्पादनानुसार पोषक तत्त्वांची जास्त गरज असते. चिलेटेड खनिजे नॉन चिलेटेड खनिजांपेक्षा शरीरात जास्त शोषली जातात. दुभत्या जनावरांना चिलेटेड खनिजे देण्याचा उद्देश म्हणजे त्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करणे. खनिजांची विविध चयापचय प्रक्रियेमध्ये शरीराला गरजेची असते. तसेच ते उत्प्रेरक म्हणून विविध विकर (एन्झाईमस) व संप्रेरके (हार्मोन्स) यांच्यासाठी काम करतात. हे संपूर्ण आरोग्य, पचन, शरीराची वाढ व उत्पादन यासाठी आवश्यक असते. नेहमीच्या पशुखाद्यामध्ये तसेच हिरवा, कोरडा चाऱ्यामध्येही खनिजे असतात, परंतु जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशींची शारीरिक गरज जास्त असल्याने त्यांना अतिरिक्त खाद्य, चारा याबरोबरच शरीराला जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकणाऱ्या खनिजांची गरज भासते. सूक्ष्म खनिजे ही शरीराची चांगली वाढ, हाडांची मजबुती, खुरे, त्वचा, केसांची गुणवत्ता यासाठी उपयुक्त आहेत. गर्भाशयाशी निगडित आजार तसेच कासदाह, खुरांचा आजार व रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी चिलेटेड खनिजांचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
  • सूक्ष्म खनिजांची शरीराला आवश्यक मात्रा आणि शरीराला विषारी मात्रा यामध्ये खूप कमी फरक असल्यामुळे काही खनिजे शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास त्याचे दुष्परिणाम संभवतात. त्यामुळे खनिज मिश्राणांतील घटक हे काळजीपूर्वक निवडून त्यांचे प्रमाण हे एकमेकांना पूरक असेल तरच त्याचा फायदा जास्त प्रमाणात मिळू शकतो.
  • खनिज मिश्रणाची किंमत कमी करण्यासाठी काही वेळा कमी प्रतीच्या संयुगांचा वापर केला जातो. त्यामुळे खनिजांची शुद्धता महत्त्वाची आहे. उदा. स्वस्त लाईम स्टोन पावडर (एल.एस.पी.) हा कॅल्शियमचा स्रोत म्हणून वापरला जातो, परंतु त्यासोबत जर फ्लोरिन व इतर जड धातू जनावरांच्या पोटात गेले तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.
  • चिलेटेड खनिजे म्हणजे काय?

  • एका खनिजाला दुसऱ्या प्रथिनाने किंवा अमिनो आम्लाने धरून ठेवले जाते. यामुळे शरीरात अत्याधिक आवश्यक असलेली प्रथिने शोषली जातात. त्याबरोबरच खनिजेसुद्धा शरीरात शोषली जातात, तेथे विघटन होते. शरीरात खनिजे व प्रथिने किंवा अमिनो आम्ल आपापले काम करते.
  • खनिजांची कोठी पोटातील स्थिरता ही त्यांच्या प्रथिनासोबतच्या बंधावर अवलंबून असते. त्याद्वारे १० ते २० टक्के प्रमाणात खनिज हे अमिनो आम्ल किंवा प्रथिनांशी जोडले जाते.
  • खनिजाला चिलेट करणे म्हणजे एका अर्थाने त्यांचे सेंद्रिय रेणू मध्ये रुपांतर. यामध्ये दोन भाग सेंद्रिय पदार्थ (प्रथिने किंवा अमिनो आम्ल) व एक भाग खनिज यांचा बंध असतो. एका सहसंयोजक बंधाने ते एकत्र जोडलेले असतात.
  • चांगल्या प्रतीच्या चिलेटेड खनिजांवर कुठलाही धन किंवा ऋण भार नसतो, ज्यायोगे त्यांना कोठीपोटामध्ये तटस्थ राहता येते. आतड्यामधून त्यांचे शरीरात शोषण केले जाते. जनावरांच्या शरीराला अत्यावश्यक असणारी मिथीओनीन, लायसीन ई अमिनो आम्ले शरीरात लवकर शोषली जातात.
  • सर्व खनिजे चिलेटेड असतात का?

  • जनावरांच्या शरीराला दोन प्रकारच्या खनिजांची गरज असते.
  • मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे (मॅक्रो खनिजे) : कॅल्शियम, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम इ.
  • सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे (मायक्रो खनिजे) : झिंक (जस्त), कोबाल्ट, मॅंगेनीज, कॉपर (तांबे), आयर्न (लोह), आयोडीन, सेलेनिअम इ.
  • सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे झिंक, मँगेनीज, कॉपर, कोबाल्ट, सेलेनियमचे चिलेशन होऊ शकते, कारण त्यांच्या अमिनो आम्ल संयुगातून बनलेल्या रेणूचे वजन हे ८०० डाल्टनपेक्षा कमी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शरीरात शोषले जातात. मॅक्रो प्रकारच्या खनिजांचे चिलेशन होऊ शकत नाही, त्यामुळे चुकीच्या व्याख्येतून पशुपालकांची फसवणूक होऊ शकते.
  • चिलेटेड खनिजांचे प्रकार :

  • मायक्रो खनिज व प्रथिने, अमिनो आम्ल किंवा अमिनो आम्लाचे एकत्र संयुग करून चिलेटेड खनिज तयार करावयाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये अमिनो अॅसिड कॉप्लेक्स, सोया हायड्रोलायसेटस, ग्लायसीनेटस, मिथीओनेटस, एम एच ए, एच एम टी बी ए, ई. व इतर उत्पादन प्रक्रिया प्रकार येतात. ही एक क्लिष्ट प्रक्रिया असून यात १० ते २० टक्के मायक्रो खनिज व बाकी चिलेटिंग एजंट असे संयुग असते.
  • केवळ खनिजे आणि प्रथिने एकत्र मिश्रण करून त्यांचे संयुग तयार होत नाही. त्यामुळे योग्य प्रकारच्या व शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या चिलेटेड खनिजांचा वापर पशुपालक गाई, म्हशींच्या पशुआहारात योग्य प्रमाणात करू शकतात.
  • चिलेटेड खनिजांना जैविक खनिजे असे म्हटले जाते. काही वेळा जैविक व अजैविक (चिलेटेड नसलेली) खनिजे एकत्र करूनही त्यांना चिलेटेड असे नाव देऊन पशुपालकांची फसवणूक होऊ शकते. कारण त्यांचे प्रयोगशाळेत पृथक्करण करून खरी चिलेटेड खनिजे ओळखण्याचे तंत्रज्ञान भारतात सर्वत्र आणि कमी किमतीत उपलब्ध नाही. म्हणून पशुपालकांनी चिलेटेड खनिज मिश्रण खरेदी करताना सावधानता बाळगावी.
  • संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९ (लेखक पशुपोषण आणि व्यवस्थापनतज्ज्ञ आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com