दुधाळ जनावरांना हिवाळ्यात होणारे आजार टाळा

हिवाळ्यात जनावरांना संतुलित आहार व सकस चारा द्यावा.
हिवाळ्यात जनावरांना संतुलित आहार व सकस चारा द्यावा.

दुधाळ व गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात आणि आहार नियोजनात काही त्रुटी राहिल्यास थंड वातावरणामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका संभवतो. यामध्ये संसर्गजन्य आणि उत्पादकतेशी निगडित आजारांचा समावेश होतो. या आजारांचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असते. अ) उत्पादकतेशी निगडित अाजार १) दुग्धज्वर (मिल्क फिवर)

  • हा आजार प्रामुख्याने उत्तम दुग्धउत्पादकता असलेल्या दुधाळ जनावरांत विल्यानंतर ४८- ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळतो.
  • शरीर व दुग्धउत्पादनासाठी आवश्यक कॅल्शियमचा पुरवठा आहारातून न झाल्यास दुग्धज्वर उद्भवतो. यामध्ये आजारी जनावर तीन टप्प्यात लक्षणे दाखवते.
  • पहिल्या टप्प्यात खाणे-पिणे मंदावणे, दुग्धउत्पादन कमी होणे याशिवाय इतर लक्षणे जास्त काळ दिसत नसल्याने पशुपालकाला माहिती होत नाही.
  • दुसऱ्या टप्प्यात आजारी जनावर अशक्त होऊन जमिनीवर पोटात मान घालून शांत बसून राहते, शरीराचे तापमान कमी होणे, श्वसनाचा वेग व नाडीचे ठोके वाढणे, शेण व लघवी बंद होणे, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर होणे, नाकपुड्या कोरड्या पडणे, रवंथ बंद होणे व पोट फुगणे अशी लक्षणे दिसतात.
  • आजाराचा तिसरा टप्पा तीव्र असून, यामध्ये जनावर अशक्तपणामुळे आडवी पडतात, शरीर एकदम थंड पडते, डोळ्याला हात लावला असता जनावर प्रतिसाद दाखवत नाही व तात्काळ उपचार न झाल्यास असे जनावर बेशुद्ध पडून काही वेळात दगावते.
  • उपचार पशुवैद्यकाच्या मदतीने आजारी जनावरास साधारणपणे ४५० मिली कॅल्शियमचे सलाईन दिल्यास जनावर तात्काळ प्रतिसाद देते व आजारातून बाहेर पडते. प्रतिबंध

  • दुग्धज्वर आजारास आळा घालण्यासाठी गाभण काळातील शेवटचे २ महिने व विल्यानंतरच्या काळात आहारात कॅल्शियम योग्य मात्रेत उपलब्ध करून द्यावे.
  • आजार टाळण्यासाठी उपलब्ध प्रतिबंधात्मक औषधे विन्याआगोदर व विल्यानंतर द्यावे.
  • २) कितनबाधा (किटोसीस)

  • हा आजार प्रामुख्याने जास्त दुग्धउत्पादन देणाऱ्या गायी-म्हशींमध्ये विल्यानंतर ४-८ आठवड्यापर्यंत आढळून येतो.
  • दुग्धउत्पादनाच्या प्रमाणात आहारात ऊर्जा पुरविणारे पिष्टमय पदार्थ खुराकामधून उपलब्ध न झाल्यास जनावरे या आजारास बळी पडतात.
  • - आहारात प्रथिनांचे जास्त प्रमाण, स्फुरद, कोबाल्ट व ब जीवनसत्त्वाची कमतरता व गाभण काळात अंगावर जास्त प्रमाणात चरबी असणे यामुळेही कितनबाधा होऊ शकते.
  • विताच्या सुरुवातीच्या काळात फुफ्फुसदाह, गोचीडताप, सरा, गर्भाशय दाह, पोटाच्या चौथ्या कप्प्याची जागा बदलणे, कासदाह, अपचन इत्यादी आजारांमुळेही कितनबाधा होऊ शकते.
  • या आजारात जनावरं रोडावत जाणे, दुग्ध उत्पादन घटणे, खुराक खाणे बंद करणे, परंतु गवत किंवा कडबा खाणे अशी लक्षणे आढळून येतात. उपचार न केल्यास गवत खाणेही बंद होते, जनावर खूप रोडावते, फक्त हाडांचा सांगाडा दिसतो, श्वास, लघवी व दुधास एक प्रकारचा गोडसर वास येतो.
  • क्वचित आढळून येणाऱ्या कितनबाधा आजाराच्या दुसऱ्या प्रकारात मज्जासंस्थेची लक्षणे, गोल गोल चकरा मारणे, चालताना डळमळणे, दृष्टी मंदावणे, थरथर कापणे, अखाद्य वस्तू चाटणे, खाणेपिणे बंद होणे व रवंथ बंद होणे आढळून येतात.
  • निदान या आजाराचे निदान जनावराचे दुग्धउत्पादन, आहारात पिष्ट्मय पदार्थांचे प्रमाण व आजाराची लक्षणे यावरून करता येते. रक्त व लघवीची तपासणी करून त्यात ग्लुकोज व किटोन बॉडी यांचे प्रमाण काढता येते. क्षेत्रीय स्तरावर बाधित जनावरांच्या लघवी नमुन्याची रोथ्राज चाचणी करून कितनबाधा आजाराचे निदान करता येते. हल्ली ही तपासणी करण्यासाठी चाचणी द्रावण मिश्रित पट्ट्या (स्ट्रिप्स) उपलब्ध आहेत. अशा पट्ट्या लघवीच्या नमुन्यात बुडवून रंगाचा होणारा बदल पाहूनही निदान करता येते. उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आजारी जनावरास ५० टक्के डेक्सट्रोज सलाईन, ब जीवनसत्व इंजेक्शन दिल्यास जनावर उपचारास चांगला प्रतिसाद देते. प्रतिबंध कितनबाधा टाळण्यासाठी विताच्या सुरवातीपासून गायीमध्ये ३ किलो दुधामागे १ किलो तर म्हशींमध्ये २.५ किलो दुधास १ किलो व उपजीविकेसाठी अतिरिक्त १-१.५ किलो याप्रमाणे संतुलित खुराक द्यावा. जनावरांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे जेणेकरून जनावरे इतर आजारांना बळी पडणार नाहीत. ३) पोट गच्च होणे / दुखणे

  • हा आजार हिवाळ्यातील अतिथंड तापमानात जास्त प्रमाणात सुमार चारा खाण्यामुळे, थंडीमुळे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यामुळे पोट व आतड्यांची हालचाल मंदावते व जनावरांचे पोट गच्च होते.
  • आहारात घेतलेले अन्नघटक योग्य वेळेत पोट व आतड्यामधून पुढे न सरकल्यामुळे पोट गच्च होते, खाणे-पिणे मंदावते, शेण पडणे घटते व अशा जनावरांच्या पोटात दुखते.
  • उपचार व प्रतिबंध हिवाळ्यात अतिथंड वातावरणापासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करणे. आहारात उत्तम खाद्य व सकस चारा देणे व अतिथंड पाणी पिण्यासाठी देणे टाळणे. ब) संसर्गजन्य आजार १) फुफ्फुसदाह (न्यूमोनिया)

  • दुग्धउत्पादनाचा ताण, वातावरणातील बदल तसेच दुधाळ जनावरांना जास्त वेळ थंड वातावरणात ठेवल्यास फुफ्फ्सदाह आजार होण्याची शक्यता असते.
  • हा आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य असून विविध जिवाणू श्वसन संस्थेत शिरकाव करून आजार निर्माण करू शकतात.
  • या आजारात नाकातून सुरुवातीला पातळ पाणी/ शेंबूड येतो पुढे जाऊन तो घट्ट पिवळसर किंवा हिरव्या रंगाचा होतो.
  • जनावराचे खाणे –पिणे मंदावते, रवंथ करणे बंद होते.
  • श्वसनाचा वेग वाढतो, जनावर बैचेन होते व दुग्धउत्पादन घटते.
  • काही जनावरांत खोकणे / ढासणे आढळून येते.
  • निदान

  • थंड वातावरण, लक्षणे व प्रयोगशाळा तपासण्या करून फुफ्फुसदाह आजाराचे निदान करता येते.
  • उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविक औषधे व तत्सम उपचार करून घेतल्यास जनावरातील फुफ्फुसदाह आजार बरा होतो. प्रतिबंध हिवाळ्यात दुधाळ जनावरांचे थंड वातावरणापासून सरंक्षण करणे, गोठ्यातील वातावरण ऊबदार ठेवणे, स्वच्छ हवा गोठ्यात खेळती रहावी याचे नियोजन करावे. २) लाळ्या-खुरकूत (एफ.एम.डी.)

  • हा विषाणूजन्य आजार दुधाळ जनावरांसाठी अत्यंत धोकादायक असून याचा प्रसार थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो.
  • प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या तोंडात जिभेवर, हिरड्या तसेच खुरांमध्ये फोड येतात व ते फुटल्यानंतर तिथे जखमा व व्रण निर्माण होतात.
  • आजारी जनावरांना भरपूर ताप (१०४-१०६ अंश फॅरनहाइट) येतो, तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते, चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, श्वसनाचा वेग वाढतो, दुग्धउत्पादन घटते.
  • या आजाराचा सहा महिन्यांखालील वासरांना संसर्ग झाल्यास मरतूक आढळून येते.
  • आजारातील जखमा भरून आल्यानंतर जनावरांमध्ये विविध व्यंग आढळून येतात जसे की डायबेटीस, धाप लागणे, शरीरावर केस जास्त प्रमाणात वाढणे, प्रजननक्षमता कमी होणे, कासदाह आजाराचा संसर्ग वाढणे इत्यादी व त्यातून पशुपालकाला मोठे आर्थिक नुकसान होते.
  • उपचार व प्रतिबंध

  • विषाणूजन्य आजार असल्याने त्यास उपचार नाही. तोंडातील व खुरांवरील जखमांचे २ टक्के पोटॅशियम परमॅंग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे, तोंडात बोरोग्लीसरीन लावावे व पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे.
  • लाळ्या-खुरकत आजाराची व्याप्ती व त्यापासून होणारे आर्थिक नुकसान पाहता ३ महिन्यांवरील सर्व वासरांचे व जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा (फेब्रुवारी-मार्च व सप्टेंबर-नोव्हेंबर) करून घेणे आवश्यक आहे.
  • संपर्क ः डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३ (चिकित्सालयीन औषधशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com