फायदेशीर देशी मागूर माशांचे संवर्धन करा

थाई मागूर आणि देशी मागूर यांमधील फरक ओळखून देशी मागूर माशाचे संवर्धन करावे.
थाई मागूर आणि देशी मागूर यांमधील फरक ओळखून देशी मागूर माशाचे संवर्धन करावे.

थाई मागूर हा मासा मांसभक्षक आहे. थाई मागूरची वाढ जास्त असल्यामुळे हा मासा संवर्धनासाठी जास्त प्रचलित आहे, तर देशी मागूरला चांगली मागणी असून मानवी शरीरासाठीही तो फायदेशीर आहे, त्यामुळे थाई मागूर आणि देशी मागूर यांमधील फरक ओळखून देशी मागूर माशाचे संवर्धन करावे. आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. मागूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट आहे. मुख्यतः देशी मागूर (Clarias batrachus) व हायब्रीड थाई मागूर (Clarias gariepenius) या दोन प्रकाराच्या माशांचे भारतात संवर्धन आणि विक्री केली जाते. परंतु विदेशी थाई मागूर मासा मानवी आरोग्यासाठी हानिकारक असून तो दिसायला देशी माशासारखाच दिसतो, त्यामुळे देशी आणि विदेशी थाई मागूर माशांतील फरक ओळखणे आवश्यक आहे. देशी मागूर (Clarias batrachus)

  • हा मासा त्याच्या उत्तम चवीसाठी, बाजारभावासाठी व तलावातील अधिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
  • या माशामध्ये खनिजतत्त्वे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण अधिक असते आणि मेदाचे प्रमाण फार कमी असते.
  • या माशाच्या औषधी गुणधर्मामुळे न्यूट्रिशिअस मासा म्हणून ओळखला जातो.
  • विदेशी थाई मागूर(Clarias gariepenius)

  • हा मासा वाघूर, मगर, मागुरी या नावांनीही ओळखला जातो.
  • हा मासा पूर्णतः मांसाहारी असून पाण्यातील नैसर्गिक परिसंस्था व जैवविविधतेसाठी अत्यंत घातक आहे. 
  • हायब्रीड मागूर माशाच्या खाद्यपद्धतीमुळे हा मासा नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असलेल्या इतर स्वदेशी माशांकरिता हानिकारक ठरत आहे. हा मासा अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला.
  • अनेक शास्त्रीय अभ्यासांतून असे निदर्शनास आलेले आहे, की विदेशी मागूर माशाचे सेवन हे शरीराकरिता हानिकारक आहे.
  • हा मासा कमी खर्चात मोठ्या प्रमाणात उत्पन्न देत असल्याने या माशांच्या संवर्धनासाठी अनधिकृतरीत्या वापरल्याचे दिसून येते.
  • मागूर माशाचे प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
  • विदेशी थाई मागूरवर बंदी का आहे १) नैसर्गिक परिसंस्थांना हानी हा मासा जलीय पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो, त्यामुळे मागूर मासा इतर मासे, तसेच जलीय परिसंस्थांमधील इतर घटकांना हानिकारक ठरतो, तसेच इतर प्रजाती लुप्त होण्यास कारणीभूत समजला जातो. थाई मागूर प्रामुख्याने इतर मासे, पाण्याजवळ येणारे लहान पक्षी, प्राण्याचे सडलेले मांस, पाण्याच्या तळाशी साचलेला जैविक कचरा इत्यादी न मिळाल्यास अजैविक कचरा इत्यादीसुद्धा खाद्य म्हणून स्वीकार करतो. २) मानवी आरोग्यासाठी हानिकारक हा मासा अनेकदा अजैविक कचरासुद्धा खाद्य म्हणून सेवन करतो. माशाच्या मांसात अनेकदा जड धातू जसे झिंक, कॅडमिअम आणि आर्सेनिक इत्यादीचे संक्रमणसुद्धा आढळून आलेले आहे. हे धातू मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. देशी मागूर आणि विदेशी थाई मागूरमधील फरक देशी मागूर आणि विदेशी थाई मागूर हे दोन्ही मासे दिसायला सारखे दिसतात व ग्राहकांना यामध्ये सहजरीत्या फरक शोधणे कठीण जाते. या दोन माशांतील प्रमुख फरक पुढीलप्रमाणे आहेत.  देशी मागूर

  • तांबूस काळ्या रंगाचा हा मासा आकाराने लहान असतो व संपूर्ण जीवनकाळात या माशाचे कमाल वजन हे फक्त १ किलोग्राम इतके वाढू शकते; पण बाजारात २५०-३०० ग्रॅम वजनापर्यंतच्या माशाला चांगली मागणी आहे.
  • या माशाच्या कवटीवर इंग्रजी यू (U) आकाराचे चिन्ह असते.
  • या माशाची वाढ ही थाई मागूरपेक्षा मंद असते.
  • हा मासा प्रतिकिलो ३५०-५०० रुपये दराने विकला जातो. 
  • विदेशी थाई मागूर

  • थाई मागूर जातीचा मासा हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकतो. तसेच, घाण पाण्यात अथवा कमी पाण्यात अगदी चिखलातही हा मासा वाढतो.
  • याचे कमाल वजन हे ३० किलोपर्यंतसुद्धा जाऊ शकते.
  • या माशाच्या कवटीवर इंग्रजी V आकाराचे चिन्ह असते.
  • मार्केटमध्ये टबमध्ये कमी पाण्यात जिवंत मासा म्हणून विकला जातो. या माशाची किंमत ९०-१३० रुपये प्रतिकिलोपर्यंत असते. विस्तृत तोंडामुळे हा मासा तुलनेने मोठी शिकार संपूर्ण गिळण्यास सक्षम आहे.
  • हा मासा साधारणपणे ३-४ फूट लांबीपर्यंत वाढतो, तसेच हा मासा हवेतून प्राणवायू घेऊन श्वसन करत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही या माशाची वाढ होते.
  • या माशांचे संवर्धन करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी या माशाला कोंबड्यांची घाण, खाण्यायोग्य नसलेले कोंबडीचे मांस, तसेच कत्तलखान्यातील कुजलेले शेळ्या, गाई, म्हशी यांचे मांस खाद्य म्हणून वापरले जाते, यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे आढळून येते.
  • संपर्क ः शुभम कोमरेवार, ९४०४२७१५२८ (मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com