
अजित देसाई
सिन्नर, जि. नाशिक : कहांडळवाडी (ता. सिन्नर) येथील शेतीचे गणित पावसाळ्यातील निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. त्यामुळे पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून इथल्या दत्तात्रेय चांगदेव नाठे (Dattatray Nathe) या तरुणाने खेकडा पालनामध्ये गुंतवणूक केली आहे. वडिलोपार्जित पाच गुंठे शेतात त्यांनी दहा टन क्षमतेचा प्रयोग यशस्वी केला असून, सध्या त्यांच्या खेकड्याला जागेवर चारशे रुपयांचा भाव मिळत आहे.
श्री. नाठे आणि पत्नी मंगल यांनी २००९ मध्ये पुण्यात पॅथॉलॉजिकल लॅब सुरू केली. हा व्यवसाय सांभाळ असताना त्यांनी खेकड्यांच्या पालनाचा प्रयोग श्री. नाठेंनी केला आहे. गावाकडील चार एकर शेती सुरुवातीपासून बेभरवशाचे उत्पन्न देणारी होती. सालदाराकडून शेतीत मिळणारे तोकडे उत्पन्न उदरनिर्वाहाचे साधन होऊ शकत नसल्याने नाठे यांनी खेकडा पालनाचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला. त्यासाठी त्यांना पुण्यात हा व्यवसाय करणाऱ्या मित्रांचे प्रोत्साहन मिळाले.
त्यासाठी त्यांनी वावी-तळेगाव रस्त्यालगत असलेल्या कहांडळवाडी गावातील शेतात पाच गुंठ्यांत दहा फूट खोलीचा सिमेंट काँक्रीटचा भूमिगत हौद बांधला. त्यात विहीर खोदताना निघालेला दगड-मातीचा मलबा, शेतातील मुरूम-माती भरून घेतली. खेकडापालनासाठी हौदामध्ये पाण्यापेक्षा चिखल महत्त्वाचा असल्याने ही व्यवस्था करण्यात आली. हौदाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर चारही बाजूंनी लोखंडी तारांचे संरक्षक कुंपण करण्यात आले. पक्ष्यांनी प्रवेश करू नये यासाठी संपूर्ण पाच गुंठे क्षेत्राला जाळीचे आच्छादन करण्यात आले.
महिनाभरापासून प्रत्यक्ष उत्पादन काढणीला सुरुवात झाली. सायंकाळच्या वेळी टोपलीमध्ये सुकट अथवा मांसाहारी पदार्थांचा एखादा तुकडा टाकून खेकडे पकडण्यासाठी सापळा लावला जातो. टोपलीमध्ये खेकडे अन्न खाण्याच्या आमिषाने येऊन बसतात. सकाळी टोपल्याबाहेर काढून विक्रीयोग्य खेकडे बाजूला काढले जातात. इतर पिले पुन्हा हौदात सोडण्यात येतात. साधारणपणे २०० ते २५० ग्रॅम वजनाच्या खेकड्याची विक्री केली जाते. शिर्डी येथील एका हॉटेलमधून दिवसाआड ५० किलोची मागणी नाठे यांनी मिळवली आहे. शिवाय जागेवर दररोज चार ते पाच किलो खेकडे विकले जातात.
रत्नागिरीतून मागविले बीज
गावरान वाण असलेल्या काळ्या पाठीचा खेकडा श्री. नाठे यांनी पैदाशीसाठी निवडला. रत्नागिरी धरणामधून निवड पद्धतीने एक टन बीज ६०० रुपये किलो दराने खरेदी केले. त्यात निम्मे नर व निम्म्या गरोदर माद्या असे प्रमाण होते. हे सर्व बीज टप्प्याटप्प्याने हौदात सोडण्यात आले.
गुंतवणुकीच्या परताव्याची हमी बारमाही
शाश्वत उत्पन्न देणाऱ्या खेकडा पालन प्रकल्पासाठी ‘नाबार्ड’तर्फे अनुदान दिले जाते. श्री. नाठे यांना दहा टन क्षमतेच्या प्रकल्पाला साडेसात लाख रुपये खर्च आला. त्यापैकी तीन लाख रुपये त्यांना अनुदान मिळाले. येत्या सहा महिन्यांत उरलेली गुंतवणूक निश्चितपणे परत मिळेल, असा विश्वास श्री. नाठे यांना वाटतो आहे. खेकडा पालनासाठी कमी मनुष्यबळ लागते. प्रकल्प राखण्यासाठी एक मनुष्य पुरेसा होतो. मृत मासे, मांसाचे निरुपयोगी तुकडे, मृत कोंबड्या हे खेकड्यांसाठी अन्न म्हणून चालते.
संपर्क : दत्तात्रेय नाठे, मो. ९०९६०७९४४४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.