दूध एफआरपीप्रश्नी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय
milkAGROWON

दूध एफआरपीप्रश्नी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय

दूध एफआरपीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली जाईल

मुंबई : दूध एफआरपीबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच दूध(milk) उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली.

दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे, या साठी स्थापन केलेल्या मंत्री समितीने शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे समजून घेऊनच या बाबत आपला अहवाल तयार करावा, असे निवेदन देण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधी मंडळाने पवार यांची देवगिरी येथे भेट घेतली.
दूध खरेदीदराच्या अस्थिरतेमुळे राज्यात दूध उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर व नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील दुधाचे दर पडले. त्यामुळे दूध उत्पादकांना वारंवार संकटाचा सामना करावा लागतो आहे. दूध क्षेत्रातील ही अनिश्चितता संपवण्यासाठी व दुधाला हमीभाव मिळावा, यासाठी दुधाला एफआरपीचे संरक्षण लागू करावे, दूध तसेच दुग्धपदार्थांच्या निर्मिती व विक्रीमध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबाला रास्त वाटा मिळावा, यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सातत्याने संघर्ष करत आहे.
राज्य सरकारने दुधाला एफआरपी लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. मंत्रिगटाने या बाबत सकारात्मक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे समितीचे म्हणणे आहे. मिल्को मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवावी, दुधातील भेसळ बंद करण्याबाबत ठोस पावले टाकावीत, खासगी कंपन्यांच्या लुटमारीच्या विरोधामध्ये कायदा करावा, आदी मागण्यांचे निवेदन समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी पवार यांना दिले. या वेळी दूध प्रश्नांचे अभ्यासक सतीश देशमुख, शेतकरी खंडूबाबा वाकचौरे उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com