Poultry Farming
Poultry Farming

कुक्कुटपालन सुरु करताना या गोष्टी गरजेच्या

कोणताही नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल आणि विशेषतः कुक्कुटपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायद्याचा करायचा असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते या बद्दल जाणून घेऊया.

कोणताही नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल आणि विशेषतः कुक्कुटपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायद्याचा करायचा असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते आज आपण पाहूया. -    तांत्रिक शिक्षण आणि अनुभव -    भांडवल -    चांगल्या प्रतीच्या पिल्लांची उपयुक्तता -    त्वरित पशुवैद्यकीय सेवा आणि लस उपलब्धता -    संतुलित खाद्य -    विक्रीची सोय आणि बाजारपेठेची उपलब्धता

तांत्रिक शिक्षण – हा व्यवसाय करण्यासाठी उच्च तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असते का? तर नाही. पण पक्ष्यांना होणारे रोग, त्यावर कोणते उपाय करावेत प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय, लक्षणांवरून रोगाचे निदान कसं कराव? या तांत्रिक गोष्टींची माहिती असणे गरजेची आहे. यासोबतच केवळ तांत्रिक बाबीचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरु केला तरी त्याला जोपर्यंत अनुभवाची जोड मिळत नाही, तोपर्यंत हा व्यवसाय फायदेशीर होत नाही. हेही पाहा- कुक्कुट पालन का करावे?  

भांडवल- कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल मात्र आवश्यक आहे. बिना भांडवलाचा कोणताच व्यवसाय होऊ शकत नाही. भांडवली खर्चामध्ये दोन प्रकारचे खर्च असतात एकदाच केला जाणारा जसं की पोल्ट्री शेडचं बांधकाम, खाद्य आणि पाण्याच्या भांड्याची खरेदी. दुसरा म्हणजे सतत होणारा खर्च जसं की खाद्य खरेदी, औषधांचा खर्च इत्यादी. चांगल्या प्रतीच्या पिल्लांची

उपलब्धता – कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करताना एक दिवसांची पिल्ले आणून ती वाढवून त्यांच्यापासून अंडी आणि मांसाचे उत्पादन घेतले जाते. अनोळखी व्यक्तीकडून किंवा आठवडी बाजारात विकायला बसलेल्या व्यक्तीकडून एक दिवसाची पिल्ले व्यवसाय करण्यासाठी कधीही घेऊ नये. एका दिवसाची पिल्ले विकत घेताना ती नामांकित हॅचरीमधून आणल्यास त्यांना मरेक्स रोगाची प्रतिबंधक लस टोचलेली असते.

पशुवैद्यकीय सेवा आणि लसीची उपलब्धता – ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत अशा बहुतेक गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्याकडे लसींची मागणी नोंदवून आणि विहित शुल्क भरून रानीखेत आणि देवी रोगाविरुद्ध लसी मिळू शकतात.

संतुलित खाद्य- पशुपालन व्यवसायात ६० ते ७५ टक्के खर्च हा त्यांच्या खाद्यावरती होत असतो. खाद्यातून कोंबड्यांना आवश्यक असणारे सर्व पोषक घटक मिळायला हवेत. अशा खाद्यास आपण संतुलित खाद्य म्हणतो.

विक्रीची सोय आणि बाजारपेठेची उपलब्धता –  कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी उत्पादिताच्या बाजारपेठेची सोय केलेली असावी. कुक्कुटपालन व्यवसायामधून उत्पादन केलेली अंडी आणि मांसल पक्षी यांच्या विक्रीची सोय केलेली असावी.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार प्रत्येक व्यक्तीमागे वर्षाला १८० अंडी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे दरडोई अंड्याची उपलब्धता ही ८६ अंडी इतकीच आहे. त्यामुळे अंडी उत्पादनामध्ये मोठी वाढ करून त्याच्या विक्रीद्वारे उत्पन्न मिळवण्यास मोठी संधी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com