देशी कोंबड्यांची अंडी उबवणुकीचे तंत्र

पिलेनिर्मितीसाठी फलित अंडी उत्पादन करून खुडूक कोंबडीखाली बसवून पिलेनिर्मिती करता येते. गावरान कोंबड्या आणि काही प्रमाणात सुधारित कोंबड्यांच्या जातीमध्ये खुडूकपणा हा गुणधर्म असतो. फलित अंडेनिर्मितीसाठी कोंबड्यांच्या कळपामध्ये नराचा समावेश असणे आवश्यक आहे.
देशी कोंबड्यांची अंडी उबवणुकीचे तंत्र
Egg hatchingAgrowon

डॉ. विजयसिंह लोणकर

कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे एकदिवसीय पिले. परसबागेमध्ये कुक्कुटपालन करण्यासाठी एक दिवसाच्या पिलेनिर्मितीसाठी स्वतःच्या कळपामध्ये उपलब्ध असलेल्या खुडूक कोंबडीचा वापर करावा. पिलेनिर्मितीसाठी फलित अंडी उत्पादन करून खुडूक कोंबडीखाली बसवून पिलेनिर्मिती करता येते. देशी किंवा गावरान कोंबड्यांमध्ये आणि काही प्रमाणात सुधारित कोंबड्यांच्या जातीमध्ये खुडूकपणा हा गुणधर्म असतो. परंतु लेगहॉर्नसारख्या संकरित पक्ष्यांमध्ये उपलब्ध नसतो. म्हणून ग्रामीण भागांमध्ये गावरान किंवा देशी पक्षी संगोपनसुद्धा महत्त्वाचे असते.

फलित अंडी उत्पादन:

१) कोंबडी वयात आल्यानंतर अंडी घालणे हा तिचा नैसर्गिक गुणधर्म आहे. देशी किंवा गावरान कोंबड्या वयाच्या २१ ते २२ व्या आठवड्यापासून, सुधारित जातीच्या कोंबड्या वयाच्या १९ ते २० आठवड्यांपासून आणि संकरित जातीच्या कोंबड्या वयाच्या १६ ते १७ आठवड्यांपासून अंडी घालण्यास सुरुवात करतात.

२) कोंबडीने घातलेल्या अंड्यामध्ये भ्रूण तयार होण्यासाठी ते फलित असणे अत्यावश्यक आहे. फलित अंडेनिर्मितीसाठी कोंबड्यांच्या कळपामध्ये नराचा समावेश असणे आवश्यक आहे. फलित अंडी तयार होण्यासाठी नर-मादीचा संकर होतो.

३) योग्य फलित अंडीनिर्मितीसाठी कळपामध्ये साधारणतः १० ते १२ मादींना एक नर वापरावा. देशी कोंबड्यांच्या कळपामध्ये संकरासाठी सुधारित जातीचा नर ठेवावा. शक्यतो देशी नर काढून टाकावेत.

४) कोंबड्यांच्या कळपात निरोगी नर सोडल्यानंतर तीन ते चार दिवसांनी कोंबड्यांनी दिलेली अंडी सुपीक म्हणजेच फलित मिळण्यास सुरुवात होते.

कोंबडीतील खुडूकपणाचा उपयोग :

१) गावरान किंवा देशी कोंबडी वर्षाकाठी ७० ते १०० अंडी देते. देशी कोंबडी अंडी देण्याच्या एका फेरीमध्ये (१७ ते १८ दिवस) १२ ते १३ अंडी घालते. दोन फेरीमध्ये २२ ते २३ दिवसांची विश्रांती घेते (अंडी न देण्याचा कालावधी). वर्षाकाठी देशी कोंबडी अंडी घालण्याच्या ७ ते ८ फेऱ्या पूर्ण करते. या काळात आपल्याला ८५ ते १०० अंडी मिळतात.

२) कोंबडी ही नैसर्गिकरीत्या अंधाऱ्या जागेमध्ये कोठ्यासारखी जागा तयार करून त्यामध्ये अंडी घालते. कोंबडी ज्या वेळेस अंडी घालते, ती आपण गोळा करतो. नैसर्गिकरीत्या कोंबडी घरट्यामध्ये अंडी घालतात ही अंडी गोळा न केल्यास घरट्यामध्ये तशीच पडून राहतात.

३) कोंबडीने घरट्यात साधारणतः १२ ते १५ अंडी घातल्यास आणि आपण ती गोळा न केल्यास नैसर्गिकरीत्या कोंबडी अंड्यावर बसून राहण्यास सुरुवात करते. हळूहळू अंड्यावर बसून राहिल्याने कोंबडीच्या शरीरामध्ये संप्रेरकीय तसेच मज्जातंतूमध्ये (न्यूरो-एंडोक्राइन) बदल होण्यास सुरुवात होते. कोंबडीच्या पोटावरील कातडी अंडी कवचाच्या संपर्कात आल्यामुळे एक प्रकारचा संकेत मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीला जाऊन पोहोचतो. यातून प्रोलॅक्टीन नामक संप्रेरक निर्माण होऊन त्याची मात्रा कोंबडीच्या रक्तामध्ये वाढू लागते. याच प्रोलॅक्टीन संप्रेरकामुळे कोंबडी खुडूक होण्यास सुरुवात होते आणि अंडी उबविण्यासाठी सुरुवात करते. कोंबडी अंड्यावर २१ दिवस बसून राहते. म्हणून याच प्रोलॅक्टीन नावाच्या संप्रेरकामुळे कोंबडीमध्ये मातृत्वता येते म्हणजेच आई होण्याची क्षमता निर्माण होते. त्यालाच कोंबडीचा खुडूकपणा म्हणतात.

४) या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये कोंबडी अंड्यावर बसून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे कोंबडी आपल्या शरीरातील उष्णता कातडीमार्फत अंड्याला पुरवते. कोंबडी २१ दिवस अंडी उबविते. कोंबडी आपल्या पायाने अंडी घोळते. ज्या वेळेस ती पाणी पिणे, खाद्य खाण्यासाठी अंड्यावरून उठते (साधारण दहा ते पंधरा मिनिटे) त्या वेळेस अंड्याचे वायुविजन होते. पावसाळ्यात खुडूक कोंबडीखाली अंडी बसवल्यास आर्द्रता नियंत्रित राहण्यास मदत होते. या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये कोंबडीचे वजन घटते. ती सतत अंड्यावर बसून राहते. फलित अंड्याला उष्णता (ऊब), वायुविजन, अंडी हलवणे आणि आर्द्रता या सर्व बाबी मिळाल्यामुळे अंड्यामध्ये यशस्वीरीत्या भ्रूणनिर्मिती होऊन २१ दिवसांनी पिल्लू बाहेर येते. त्या पिलांची काळजीसुद्धा कोंबडी साधारणतः दोन महिने घेते. अशाप्रकारे कोंबडीमध्ये खुडूकपणा आल्यामुळे, ती माता होते. या मातृत्वाच्या कालावधीमध्ये ती पिले निर्मिती,त्यांची काळजी यासाठी साधारणतः तीन महिन्यांचा कालावधी अंडी उत्पादित न करता घालवते.

५) जस-जशी पिले मोठी होतात तस-तसे कोंबडी पिलांची काळजी घेण्याचे प्रमाण कमी करते. पिले स्वतंत्ररीत्या कोंबडीपासून वेगळी राहण्यास सुरुवात करतात. त्या मातेच्या शरीरामधील मातृत्वासाठी (खुडूकपणा) लागणारे प्रोलॅक्टीन संप्रेरक कमी होते आणि अंडी घालण्यासाठी लागणारी संप्रेरके तिच्या रक्तामध्ये वाढण्यास सुरुवात होते. खुडूक झालेली कोंबडी पुन्हा अंडी देण्यास सुरुवात करते.

खुडूक कोंबडीची निवड आणि लक्षणे:

१) प्रोलॅक्टीन संप्रेरकामुळे कोंबडीमध्ये खुडूकपणा येतो. कोंबडी आपले पंख पसरते, सातत्याने घरट्यात बसून राहते. तिला दुसरीकडे नेले तर ती परत घरट्यात येते. ती पूर्वीप्रमाणे शांत नसते. घरट्यातून अंडी काढण्याचा प्रयत्न केल्यास आक्रमक होऊन चोचीने टोच्या मारते. अशा वेळेस स्वतःचे व अंड्याचे संरक्षण करण्यासाठी ती पिसे पिंजरते व विशिष्ट प्रकारचा कुर-कुर आवाज करते.

२) खुडूक कोंबडीच्या घरट्यातील अंडी काढून घेतल्यानंतरही ती घरट्यात अंडी असल्याचा भास करून घरट्यात सातत्याने बसून राहते. आपण अंडी तशीच घरट्यात ठेवल्यास ती त्यांची उबवण करून नैसर्गिकरीत्या पिले निर्मिती करते. परंतु त्यामधील सर्वच अंडी फलित असतील असे नाही, त्यामुळे आपणास कमी पिले मिळण्याची शक्यता असते. म्हणून आपण खुडूक कोंबडीचा वापर करून व फलित अंड्यांची निवड करून उबवण करू शकतो.

खुडूक कोंबडीचा वापर करून अंडी उबवणूक :

१) कळपामध्ये नराचा वापर केल्यास फलित अंडी मिळतात. अशी फलित अंडी रोजच्या रोज गोळा करून ती ठरावीक तापमानास साठवण करून ठेवावीत. साधारणतः १२ ते १५ अंडी गोळा झाल्यावर कोंबडीमध्ये खुडूकपणाची लक्षणे पाहून निवड करावी.

२) खुडूक कोंबडी वयस्कर असावी. आकाराने मोठी असावी जेणेकरून ती १२ ते १५ अंडी आरामात उबवणीसाठी सामावून घेईल. अंगावर भरपूर पिसे असावीत. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे बाह्यपरोपजीवी नसावेत (उदा. उवा, पिसवा इ).

३) शक्यतो संकरित किंवा सुधारित जातीच्या कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीची निवड करावी. या कोंबड्यांमध्ये खुडूकपणा चांगल्या प्रकारे दिसतो. कोंबडीचे अंडी देण्याचे घरटे अंधाऱ्या ठिकाणी असावे. त्या ठिकाणी कोणताही अडथळा येऊ नये. कोंबडीने घरट्यात घातलेली अंडी उचलू नयेत. सतत अंड्याच्या संपर्कामुळे ती खुडूक बनते.

४) गरज असते तेव्हा खुडूक कोंबडी उपलब्ध नसल्यास कोंबडीमध्ये खुडूकपणा निर्माण करता येतो. साधारणतः तीन ते चार अंडी घरट्यात ठेवावीत. सायंकाळी घरट्यात वयस्कर लठ्ठ कोंबडी ठेवावी. जोपर्यंत ती कोंबडी खुडूक बनत नाही, तोपर्यंत दररोज हे काम करावे. तीन ते चार दिवसांनी घरट्यातील जुनी अंडी काढून नवीन फलित अंडी ठेवावीत.

५) घरट्यातील खुडूक कोंबडीसाठी जवळ खाद्य आणि पाण्याचे भांडे ठेवावे. खुडूक कोंबडीने उबविण्याकरिता घरट्यात १२ ते १५ फलित अंडी ठेवावीत. अंड्यांची संख्या खुडूक कोंबडीच्या आकारावर अवलंबून असते.

अंड्यांची निवडः

१) उबविण्यासाठी अंड्यांची निवड करणे आवश्यक असते. त्यामुळे पिले तयार होण्याचे यश जास्त मिळते. कोंबड्यांनी घातलेली अंडी एका ट्रेमध्ये त्वरित गोळा करावीत. अंड्याची निवड करताना टिचकी अंडी, विकृत आकाराची अंडी आणि जास्त प्रमाणात विष्टा किंवा रक्त चिकटलेली अंडी काढून टाकावीत.

२) अंड्याचा आकार खूप मोठा किंवा छोटा नसावा. अंडी मध्यम आकाराची ५० ते ५५ ग्रॅम वजनाची असावीत. अंडी काही प्रमाणात विष्ठा किंवा इतर कारणाने खराब झाल्यास ती शक्यतो पाण्याने स्वच्छ करू नयेत. अशा अंड्यांची स्वच्छता सुती कापड किंवा खरबरीत पेपरने घासून पुसावीत.

३) अंडी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिन द्रावणांमध्ये बुडविलेल्या कापसाने अलगद पुसून ती पुन्हा ट्रेमध्ये ठेवावीत. अंड्याची दिवा तपासणी करून चिरा पडलेली अंडी किंवा अतिछिद्र असलेली अंडी बाजूला काढावीत. अंडी पाण्याने साफ करण्याची वेळ आल्यास, पाण्याचे तापमान अंड्याच्या तापमानापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. अंड्याची निवड, स्वच्छता झाल्यावर त्यांची ठरावीक तापमानास साठवण करावी.

फलित अंड्यांची साठवणूकः

१) ठरावीक अंड्यांचा साठा होईपर्यंत फलित अंड्याची साठवणूक करणे महत्त्वाचे असते. फलित अंडी थंड ठिकाणी साठवून ठेवावीत. त्यासाठी मडक्याचा वापर करू शकतो.

२) खेड्यात फलित अंडी साठवायची असल्यास, सावलीच्या जागी मडके गळ्यापर्यंत जमिनीत पुरून ठेवावे. मडक्याभोवती मातीचा वापर न करता गळ्यापर्यंत वाळूचा वापर करावा. मडक्याभोवतीची वाळू पाणी शिंपडून ओलसर ठेवावी, परंतु पाणी साचू देऊ नये.

३) मडक्यामध्ये कोरडी वाळू भरावी. त्या कोरड्या वाळूवर अंडी साठवून ठेवावीत. मडक्याच्या तोंडावर कापड बांधावे. बाहेरच्या तापमानापेक्षा मडक्यातील तापमान थंड राहते. फलित अंड्याची साठवण पाच ते सात दिवसांपेक्षा जास्त करू नये. बारा ते पंधरा अंडी साठवण झाल्यानंतर घरट्याची तयारी करून अशी अंडी उबवणीसाठी वापरावीत.

घरटे निवडः

१) घरटे निवडताना ते बांबूचे बनविलेले व कोंबडीसाठी सुखकर असावे. उदाहरणार्थ, खोलगट टोपलीचा वापर उत्तमरीत्या करता येतो. टोपलीच्या खालच्या भागावर पूर्णपणे वाळलेले बारीक केलेले काड, गवत, झाडांचा पालापाचोळा किंवा भाताच्या तुसाचा अंथरूण म्हणून वापर करावा. टोपलीवरती ठेवण्यासाठी बांबूपासून बनविलेल्या झाकणाचा वापर करावा. अशा पद्धतीने तयार केलेली टोपली सुरक्षित ठिकाणी अंधाऱ्या जागी ठेवावी.

२) फलित अंडी ठेवण्याअगोदर टोपलीमध्ये साधी तीन ते चार अंडी ठेवून त्यावर खुडूक कोंबडी बसवून द्यावी. दोन दिवसांनी ही अंडी काढून टाकावीत. पिलेनिर्मितीसाठी वापरण्यात येणारी फलित अंडी उबवणीसाठी ठेवावीत. मडक्यामध्ये साठवून ठेवलेली अंडी काही काळ बाहेर ठेवावीत. नंतरच टोपलीमध्ये मोठे टोक वरच्या बाजूस करून सर्व फलित अंडी (१२ ते १५) अलगद ठेवावीत.

३) खुडूक कोंबडी अंड्यावर बसवताना नेहमी रात्रीच्या वेळी बसवावी, जेणेकरून एकविसाव्या दिवशी रात्रीच्या वेळी पिले अंड्यातून बाहेर येतील. रोज १० ते १५ मिनिटांसाठी कोंबडीला खाद्य व पाणी सेवन तसेच विष्ठा टाकण्यासाठी टोपलीतून बाहेर काढावे आणि पुन्हा आत ठेवावे. ही वेळ चुकवू नये, अन्यथा कोंबडी अंड्यावरती विष्ठा टाकते.

४) सातव्या दिवशी अंड्याची दिवा तपासणी करून अफलित अंडी बाजूला काढावीत. अफलित अंडी बाजूला केल्याने फलित अंडी खराब होत नाहीत.

अशाप्रकारे आपण एकाच वेळेस एक खुडूक कोंबडी वापरून फक्त १० पिले तयार करण्याऐवजी ५ ते ६ खुडूक कोंबड्यांचा वापर करून प्रत्येकी १० पिले निर्मिती केल्यास आपल्याला एकाच वेळेस ५० ते ६० पिले उपलब्ध होतात. पिले खरेदीचा खर्च वाचतो. भविष्यात अंडी उत्पादनात वाढ होते. पिले जन्मल्यानंतर कोंबडीपासून विलगीकरण करून कृत्रिमरीत्या बंदिस्त पद्धतीने त्यांची वाढ शास्त्रीय पद्धतीने करावी, जेणेकरून पिलांची मरतूक कमी होते.

संपर्कः डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२

(सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग,

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com