वावर रंगवणे म्हणजे काय?

मेंढ्यांचे खत पडले की त्याचा शेतीला भरपूर फायदा होतो. या भागात मेंढ्या बसवण्याला ‘वावर रंगवणे’ असा शब्द आहे ज्याचा अर्थ ‘शेतात मेंढ्याचे खत गोळा करणे’ असा होतो.
वावर रंगवणे म्हणजे काय?
sheep manureAgrowon

अजिंक्य शहाणे, मनोज कुयटे

बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी जळगावाहून धनगर मेंढ्या-शेळ्या घेऊन येतात आणि कधी पैसे घेऊन तर कधी चाऱ्यासाठी मेंढ्या शेतात बसवतात. मेंढ्यांचे खत पडले की त्याचा शेतीला भरपूर फायदा होतो. या भागात मेंढ्या बसवण्याला ‘वावर रंगवणे’ असा शब्द आहे ज्याचा अर्थ ‘शेतात मेंढ्याचे खत गोळा करणे’ असा होतो. धनगर समाजाप्रमाणे विदर्भात अनेक भटके पशुपालक समाज शेतात खत गोळा करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या जनावरांचा वापर करतात.

महाराष्ट्रात धनगर समाज सर्वदूर पसरलेला आहे. शेतात मेंढ्या-शेळ्या बसवून त्यांचे खत शेतात पाडणे आणि मेंढ्या-शेळ्या विकणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय. शेतात मेंढ्यांचे खत पडले की त्याचा शेतीला भरपूर फायदा होतो. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी जळगावाहून धनगर मेंढ्या-शेळ्या घेऊन येतात आणि कधी पैसे घेऊन तर कधी चाऱ्यासाठी मेंढ्या शेतात बसवतात. या भागात मेंढ्या बसवण्याला ‘वावर रंगवणे’ असा शब्द आहे ज्याचा अर्थ ‘शेतात मेंढ्याचे खत गोळा करणे’ असा होतो.

या भागात कापूस वेचून झाला की म्हणजेच डिसेंबर महिन्यात धनगर त्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन येतात आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सातपुड्यात त्यांच्या गावी परत जातात. सोयाबीन व कापूस ही खरिपातील प्रमुख पिके. त्यानंतर लगेच रब्बी पिकांसाठी जमीन तयार करायला शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. त्यामुळे शेतातले उरलेले पीक आणि कचरा लवकरात लवकर कसा काढता येईल याची शेतकऱ्याला घाई असते. यावर त्यांच्याकडे दोन उपाय असतात. एक मेंढ्या शेतात चारून नंतर ट्रॅक्टर चालवून सगळं पीक जमीनदोस्त करणं किंवा सरळ ट्रॅक्टर चालवणं. पण बहुतांश शेतकरी मेंढ्या बसवतात कारण त्यामुळे शेतात लेंडीखत पडतं. शेतीसाठी ते खूपच फायद्याचं असतं.

शेतात बसवण्यासाठी मेंढी व गाय असे दोन पर्याय शेतकऱ्याकडे असतात; पण बहुतांश शेतकऱ्याची पसंती मेंढ्या बसवण्यासाठी असते. कारण मेंढ्यांचं खत शेतात लवकर कुजतं आणि त्याचा फायदा जास्त होतो. या भागात गुजरातमधून आलेला भरवाड समाज बऱ्याच वर्षापासून राहत आहे. ते गिर गायी पाळतात. ते सुद्धा कधी कधी शेतात गायी बसवण्यासाठी विचारायला येतात. पण गायीचे खत जमिनीत कुजायला वेळ घेतं आणि ते सहज कुठंही मिळत असल्याने शेतकरी त्याला पसंती देत नाहीत. कधी कधी रब्बी पिकासाठी शेत लवकर तयार करायचं असेल तर मेंढ्या व गायी सोबतच कापसाच्या शेतात सोडतात. मेंढ्या खालचं गवत खाऊन टाकतात आणि गायी कापसाची वरची पानं खातात. त्यामुळे भरपूर खत शेतात पडतं. त्यामुळे पुढील पिकासाठी शेत तयार करायला वेळ मिळतो.

या भागात शेतात कुणाच्या मेंढ्या बसवायच्या हा निर्णय शेतकऱ्याचा असतो. त्यात फार काही भावना किंवा जुन्या संबंधाचा प्रश्न येत नाही. पण काही शेतकऱ्यांचे आणि धनगरांचे संबंध हे अनेक वर्षांपासून अजूनही टिकलेले आहेत. शुभप्रसंगी एकमेकांना आमंत्रण देणं किंवा कुठल्या वस्तुंची देवाणघेवाण करणं अशा काही गोष्टी अजूनही चालत आहेत. दिवाळीनंतरच्या काळात अनेक धनगर येत असल्याने शेतकऱ्यांकडून त्यांना फराळ देण्यात येतो. काही शेतकऱ्यांकडे दर वर्षी वेगवेगळे धनगर मेंढपाळ येतात आणि काही शेतकरी पुन्हा पुन्हा त्याच मेंढपाळांकडल्या मेंढ्या शेतात बसवतात. पण ते अगदी मोजकेच आहेत. मेंढपाळ त्यांच्या गावापासून लांब आल्याने त्यांना येथे सरकारी रेशन दुकानाचे फायदे मिळत नाहीत. परंतु येथील शेतकरी त्यांना कधी फुकट तर कधी अगदी अल्पदरात धान्य पुरवतात.

मेंढपाळ लोकांकडे एक दुचाकी आणि बैलगाडी नेहमीच सोबत असते. बैलगाडी स्त्रिया चालवतात तर दुचाकी पुरुष. बैलगाडीचा वापर सामान वाहून नेणे, शेळ्या-मेंढ्यांचे कोकरे व लहान मूलबाळ घेऊन जाण्यासाठी केला जातो तर दुचाकीचा वापर कुठल्या ठिकाणी चारा आहे आणि कुठली जागा मोकळी आहे हे बघण्यासाठी केला जातो. पूर्वी मोबाईल फोन नसल्याने मेंढपाळाला शेत शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागायचे; पण आता मोबाईल फोन आल्याने काम सोपं झालं आहे.

धनगर शेतात येतात आणि मेंढ्या बसवायच्या आहेत का याची विचारपूस करतात. शेतकरी पण त्यांना किती मेंढ्या आहेत? किती रात्री शेतात बसवाल? असे प्रश्न विचारतो. मग शेतात जितका चारा असेल त्यानुसार रात्री ठरतात. शेतात बसविण्यासाठी मेंढपाळाला काहीही पैसे मिळत नाहीत उलट त्यांना कधी कधी शेतकऱ्याला पैसे द्यावे लागतात. पैसे किती द्यायचे यावर फारसा भाव होत नाही कारण दोन्ही बाजूच्या लोकांना शेतातील चारा किती आहे याबद्दल चांगला अंदाज असतो.

फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शेतातील चारा संपून जातो आणि त्यानंतर मेंढपाळाला शेतात मेंढ्या बसवण्यासाठी एका रात्रीला एका मेंढीमागे एक ते दीड रुपया मिळतो. म्हणजे जर मेंढपाळाकडे तीनशे मेंढ्या असतील तर त्याला एका रात्रीचे तीनशे ते पाचशे रुपये मिळतात. शेतातील कापूस काढून झाल्यानंतर त्यात जेंव्हा जनावरं सोडतात त्याला ‘उलंगवाडी’ म्हणतात आणि चारा संपल्यानंतर त्याला ‘शेत उलंगलं’ असं म्हणतात.

येथील शेतकरी सांगतात की धनगर लोक खूपच साध्या स्वभावाचे आणि अत्यंत विश्वासू असतात. त्यांच्या भरवशावर शेत सोडून शेतकरी आपली कामं करायला बिनधास्त जातात. अनेकदा धनगर लोकांकडून चुका होतात. जसे चुकीने पिकात मेंढ्या जाणे. पण आजपर्यंत त्यांना आम्ही कधीच इजा पोहचवली नाही, असं शेतकरी सांगतात. दरवर्षी बाहेरून येऊन धनगर शेतकऱ्यांच्या शेतांत मेंढ्या बसवतात आणि खत पूर्ण शेतात पसरल्यावर जणू रंग भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे कदाचित त्याला ‘वावर रंगवणे’ म्हणतात.

धनगर समाजाप्रमाणे विदर्भात अनेक भटके पशुपालक समाज शेतात खत गोळा करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या जनावरांचा वापर करतात.

पशुपालक समाज---जनावरे---भाग

नंदगवळी---गायी, म्हशी---वर्धा, मेळघाट

मथुरा लभाण, बंजारा---गायी---यवतमाळ (उमरखेड)

गोवारी---गायी---भंडारा, गोंदिया, नागपूर

भरवाड---गायी---संपूर्ण विदर्भ

कुरमार---मेंढ्या, शेळ्या---चंद्रपूर, गडचिरोली

गोलकर---मेंढ्या, शेळ्या, म्हशी---चंद्रपूर, गडचिरोली

रबारी---मेंढ्या, शेळ्या---संपूर्ण विदर्भ

रायका---मेंढ्या, शेळ्या---अमरावती, अकोला

या सगळ्या पशुपालकांचा शेतातील उत्पन्न वाढवण्यात खूप मोठा वाटा आहे. शेतकरी व पशुपालक एकमेकांवर अवलंबून आहेत. पण पशुपालकांना शेतकऱ्यांइतका मान सन्मान नाही आणि त्यांची दखलसुद्धा कुणी घेत नाही. सरकार आज देशात शेतीसाठी किती रासायनिक खत विकल्या गेलं, त्यासाठी किती अनुदान दिलं, त्यामुळे किती उत्पादन वाढलं, त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला इत्यादीचा गाजावाजा करतं, पण भटके पशुपालक करत असलेल्या कामामुळे शेतीचा किती फायदा होतो यावर कुठलंही सरकार बोलत नाही. कदाचित त्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि आकडेही नाहीत. त्यामुळे पशुपालकाला खत कंपनीसारखं सरकारी अनुदानपण मिळत नाही. जर लेंडीखत किंवा शेणखतासाठी अनुदान किंवा अन्य कुठली सवलत दिली तर सेंद्रिय शेतीसाठी ते फायद्याचं ठरेल.

संपर्क- अजिंक्य शहाणे, ९४०४०१४९१४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com