
साधारणपणे गायीचा गाभण काळ (gestation period) ९ महिने ९ दिवसाचा तर म्हशींचा गाभण काळ १० महिने १० दिवसांचा असतो. या काळात जनावरांचे योग्य व्यवस्थापन केल्यास, दूध उत्पादन टिकवून वाढविण्यास मदत होते. गाभण काळात गर्भाशयातील वासराच्या वाढीबरोबर पुढील वेतातील दूध उत्पादनासाठी (milk production) दुग्ध पेशींचा विकास, गर्भाशयाचे आरोग्य या सर्व गोष्टी प्रसूतीपूर्व व्यवस्थापनावर अवलंबून असतात.
आपल्या पशुधनाकडून जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळविण्यासाठी त्यांच्याकडून जास्तीत जास्त वेत मिळाले पाहिजेत. यासाठी जनावरांची यशस्वी गर्भधारणा झाली पाहिजे. या गर्भार काळात जनावरांची योग्य देखभाल देखील, पुढील उत्पादनक्षम आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते.
गाभण जनावरांच सातव्या ते आठव्या महिन्यात स्वतंत्र व्यवस्थापन केले पाहिजे. यासाठी गाभण गायी सातव्या महिन्यात तर गाभण म्हशी आठव्या महिन्यापासून स्वतंत्र बांधायला सुरुवात करावी. गाभण जनावरांचे व्यवस्थापन ज्या ठिकाणी केलं जाईल, ते ठिकाण, हवेशीर आणि मोकळे असावे. जनावरे बसण्याची जागा कोरडी राहील याची दक्षता घ्यावी.
गाभण जनावरांची शेवटच्या अडीच ते तीन महिन्यात पशु खाद्याची गरज झपाट्याने वाढत असते. कारण याच दिवसांत गर्भाशयातील वासराची वाढ झपाट्याने होत असते. शेवटच्या अडीच ते तीन महिन्यात वासराची ६० ते ७० टक्के वाढ होत असते. या दिवसांतील आहारातील कमतरता, जनावरांच्या पुनरुत्पादनात अडचण निर्माण करू शकतात.
गाभण गायीची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. या काळात शरीराच्या योग्य वाढीसाठी १.५ किलो खुराक आणि गर्भवाढीसाठी १ किलो खुराक सात महिऩ्यांपर्यंत देत राहावा. सातव्या महिन्यापासून पुढे गाभण खुराकाचे प्रमाण वाढवून दोन किलोपर्यंत न्यावे.
गाभण जनावरांच्या आहारात दररोज ५० ग्रॅम खनिज मिश्रणाचा समावेश करावा. सातव्या महिन्यानंतर ५० ग्रॅम बायपास फॅट देण्यास सुरुवात करावी. पशु तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गाभण जनावरांचे विशिष्ट रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे.
वर्षाला एका वासराचे उत्पन्न हवे असल्यास गायी, म्हशी व्यायल्यानंतर ६० ते ९० दिवसांत माजावर आल्या पाहिजे. या काळात गायी-म्हशींचे नैसर्गिक किंवा कृत्रिम पद्धतीने रेतन करून यशस्वी गर्भधारणा होणंही तितकच गरजेचं आहे. गाभण गायी-म्हशींचे विणे ही जरी एक नैसर्गिक क्रिया असली, तरी प्रसूतीपूर्व आणि प्रसुतीपश्चत व्यवस्थापन व्यावसायिक दृष्ट्या फार महत्त्वाचे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.