बाजरीचे गुण काय वर्णावेत ?

बाजरी हे विकसनशील देशांमध्ये अन्न, चारा पुरविणारे प्रमुख पीक आहे. लहान मुले, गर्भवती महिलांसाठी बाजरीचा आहारात समावेश आवश्यक आहे. आरोग्यदायी घटकांचा विचार करता प्रक्रिया उद्योगातून बाजरी उत्पादकांना चांगली संधी आहे.
Millet
MilletAgrowon

जागतिक बाजरी उत्पादनात भारताचा मोठा वाटा (४२ टक्के) आहे. भारताची दर हेक्टरी उत्पादकता १,२३७ किलो आणि महाराष्ट्राची उत्पादकता ९०५ किलो आहे. यामध्ये वाढीला चांगली संधी आहे.

महत्त्व

  • प्रति १०० ग्रॅम धान्यापासून ३६० किलो कॅलरी ऊर्जा.

  • प्रथिने १०.६० टक्के, पिष्टमय पदार्थ ७१.६ टक्के, स्निग्ध पदार्थ ५ टक्के, तंतुमय पदार्थ १.३ टक्का.

  • खनिज पदार्थ ः कॅल्शिअम ३८.० मिलिग्रॅम, पोटॅशिअम ३७० मिलिग्रॅम, मॅग्नेशिअम १०६ मिलिग्रॅम, लोह ८ मिलिग्रॅम व जस्त ५ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम.

  • सल्फरयुक्त अमायनो अ‍ॅसिडची उपलब्धता.

आहारातील फायदे

  • मॅग्नेशिअम हा घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होत नाहीत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत.

  • पोटॅशिअम उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी रक्तवाहिन्याच्या तंत्रावर नियंत्रण ठेवतो.

  • तंतुमय प्रदार्थाचे प्रमाण अधिक असल्यामुळे घातक कोलेस्टॉल (चरबी) कमी करण्यास मदत होते.

  • मधुमेह टाइप २ या प्रकारच्या रुग्णांसाठी बाजरीतील मॅग्नेशिअम हा घटक इन्शुलीन व ग्लुकोज रिसेप्टरची क्षमता वाढवून मधुमेह नियंत्रित ठेवतो.

  • तंतुमय पदार्थ जठरातील चयापचय क्रिया नियंत्रीत करुन वात दोष दुरुस्त करुन कोठा साफ होण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्थेचे काम सुरळीत होऊन पोषकतत्वांचे शोषण सुधारते.

  • नियमीत पचन होऊन विषारी पदार्थ शरीराबाहेर निघाल्यामुळे हदय, फुफ्फुस आणि शरीरातील प्रतीरक्षा रचनेत फायदेशीर सुधारणा होते.

  • महिलांमधील स्तनांचा कॅन्सर रोगांवर अतिशय लाभदायक कारण बाजरीतील तंतुमय पदार्थमुळे हा आजार नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

  • बाजरीतील उपयुक्त अ‍ॅण्टिऑक्सिडंट ,कर्करोगास कारणीभूत असलेल्या विषयुक्त मुक्तकणांना नष्ट करतात. मूत्रपिंड व यकृत ग्रंथींना या विषारी मुक्तकणांपासून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. बाजरीत क्वेरसेटीन, करक्युमिन, अ‍ॅन्झामिक आम्ल, कैटिस या प्रकारचे अ‍ॅण्टिऑक्सिडंट असतात.

  • बालवयातील दमा आजारग्रस्त लहान मुलांच्या आहारात गव्हाऐवजी बाजरीचा समावेश फायदेशीर ठरतो.

  • बाजरीतील ट्रिप्टोफेन हे उपयुक्त अ‍ॅमायनो अ‍ॅसिड भुकेला कमी करण्यास मदत करते. वजन कमी होते. बाजरीमुळे घेतलेला आहार मंदगतीने पचविला जातो. जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते. भुकेची इच्छा कमी होते. तंतूमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कमी आहारातही भूक शमविण्याचे समाधान लाभते, अति आहार टाळला जातो.

  • ट्रिप्टोफेन या उपयुक्त अ‍ॅमायनो अ‍ॅसिडमुळे शरीरातील सेरोटोनिन या घटकाचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात बाजरीचा घाटा /दलिया सेवन केल्यास शांत झोप लागते.

  • अ‍ॅमायनो अ‍ॅसिड, क व इ जीवनसत्त्व असल्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होते. त्वचा शुष्क होत नाही, सुरकुत्या पडत नाहीत.

  • भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे केसांची वाढ, मजबूतपणा आणण्यास मदत. केस गळत नाहीत.

सुधारित आणि संकरित जाती

  • हलक्या जमिनीत, कमी आणि अनियमित पावसाच्या क्षेत्रामध्ये सुधारित जातींची लागवड करावी.

  • मध्यम जमिनीत आणि समाधानकारक पर्जन्यमान विभागात संकरित जातींची लागवड करावी.

  • खासगी कंपन्यांदेखील संकरीत जाती विकसित केल्या आहेत. या जातीदेखील चांगले उत्पादन

  • (धान्य आणि चारा) देणाऱ्या असून, केवडा रोगास प्रतिकारक्षम आहेत.

प्रक्रियेला संधी

  • भाकरी, खिचडी, नूडल्स, आंबील, लाह्या, इडली निर्मितीसाठी करता येतो. ५० टक्के गव्हाचे पीठ मिसळून बिस्किट बनवता येतात.

  • पशुखाद्य निर्मितीसाठी वापरता येते. बाजरीच्या चाऱ्या विषारी पदार्थ नसल्यामुळे हिरवा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त ठरतो. चाऱ्यात ८.७ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

प्रक्रिया

  • बाजरी दळल्यानंतर लायपेज नावाच्या घटकामुळे पीठ कडू होते, त्यामुळे दीर्घकाळ वापरण्याच्या अवस्थेत राहू शकत नाही. त्यामुळे व्यापारी तत्वावर ग्राहकांना पीठपुरवठा करण्यास अडचणी येतात. त्यासाठी धान्य दळण्यापूर्वी ८० अंश सेल्सिअस तापमानाला ८० सेकंद कालावधीसाठी उकळत्या पाण्यातून काढून वाळविल्यानंतर दळल्यास पीठ वापरण्याचा कालावधी वाढविता येतो.

  • अलीकडच्या काळात बेकरी पदार्थांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केल्यामुळे लहान मुलांमध्ये बद्धकोष्टता, पोट साफ न होणे, यांसारखे आजार दिसतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, आहारात गव्हाचा सातत्याने वापर केल्यास उद्‌भवणाऱ्या ग्लुटेन अ‍ॅलर्जिक परिस्थितीला टाळण्यासाठी आहारात बाजरीचा वापर फायदेशीर ठरतो.

■ डॉ. के. के. बऱ्हाटे ७५८८५९२११० (बाजरी संशोधन योजना, कृषी महाविद्यालय, धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com