अंडी वजनावर घ्यावीत का?
EggsAgrowon

अंडी वजनावर घ्यावीत का?

आज बाजारात वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये ही अंडी विकली जातात ती देखील नगावर असतात तेव्हा ती जर वजनावर विकली तर नेमका फायदा सर्वांचा होईल कमीत कमी नुकसान तर होणार नाही, याचा विचार सर्वांनी करायला हवा.

डॉ. व्यंकटराव घोरपडे

कोविडच्या पार्श्वभूमीवर कुकूटपालन व्यवसाय आणि कुक्कुट उत्पादने यांचे महत्त्व आज वाढताना दिसत आहे. अनेक अडथळे पार करीत हा व्यवसाय वाटचाल करतोय. कच्च्या मालाचे भाव, अधूनमधून येणारे आजार, संबंधित अफवा, सणवार या सगळ्यांवर मात करीत पुढे जातोय. एकूणच आज मितीला अंडे शाकाहारी का मांसाहारी यामध्ये न पडता आपल्याकडे अंडी व कुक्‍कुट मांस खाण्याकडे लोकांचा कल वाढतोय, त्यामध्ये वाढ होताना दिसते.

मागील वर्षी देशात साधारणपणे ८५ हजार कोटीचे पाच दशलक्ष मेट्रिक टन कुक्कुट मांसाचे उत्पादन झाले पण दरडोई वापर मात्र ३.४ किलो इतकाच राहिला. त्याचप्रमाणे ४५ हजार कोटी रुपयांची १०९ अब्ज (बिलियन) अंडी उत्पादित झाली आणि उपलब्धता मात्र प्रतिमानशी प्रतिवर्षी फक्त ८० अंडी इतकीच आहे, जी तुलनेने कमी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WTO)शिफारशीनुसार १८० अंडी प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष असायला हवी. एका अंड्यामध्ये १२ टक्के प्रथिने असतात, म्हणजे ६ ग्रॅम प्रथिने प्रतिअंडी उपलब्ध होतात. स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा असा हा प्रथिनांचा स्त्रोत आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये भेसळ करता येत नाही ही देखील विशेष बाब आहे. ही प्रथिने ९७ टक्‍क्‍यापर्यंत माणसाच्या शरीरात सहज शोषली जातात. त्यामुळे शरीराची झीज तात्काळ भरून निघते. त्यामुळे अंड्याचा समावेश शालेय पोषण आहारात व्हायला हवा ही मागणी जोर धरताना दिसत आहे.

महाराष्ट्रात साधारणपणे ५९ ते ६० लाख लोक कुकूटपालन व्यवसाय करतात आणि दररोज दीड कोटी अंडी उत्पादित होतात पण दैनंदिन गरज आहे की तीन कोटी अंड्याची, त्यामुळे शेजारील आंध्र, तेलंगाना, कर्नाटक, तामिळनाडू मधून राज्यात अंडी विक्रीसाठी येतात. या सर्वांचा विचार केला तर राज्यात एकूणच कुक्कुटपालन व्यवसायाला फार मोठा वाव आहे.

साधारणपणे कोंबडी १८ ते १९ व्या आठवड्यात अंडी घालायला सुरुवात करते. शरीरात एक पूर्ण अंडे तयार व्हायला २३ ते २६ तासाचा कालावधी लागतो. रोज अंडे देणे ही नैसर्गिक बाब आहे. मुळातच अंडी देण्यासाठी नर कोंबड्यांची आवश्यकता नसते त्यांच्या शिवाय या कोंबड्या अंडी देत असल्याने ती अंडी फलित नसतात.

त्यामध्ये जीव नसतो, त्यामुळे ती शाकाहारी म्हणून गणली जातात. अंड्याच्या आकारमान व वजनानुसार एका अंड्यापासून सुमारे ७० ते १०० किलो कॅलरी उष्मांक मिळतो. त्यासाठी कोंबडीच्या शरीरातील सुमारे १०० ते १२० किलो कॅलरी उष्मांक खर्ची पडत असतात. त्यासाठी कोंबडीस दररोज तीनशे ते तीनशे दहा किलो कॅलरी उष्मांक खाद्यातून मिळणे आवश्यक आहे.

तर असे हे अंडे कमी उष्ण उष्मांक, उत्तम व उच्च प्रतीच्या व आरोग्यदायी संपृक्त मेदाम्ले मिळण्याचा नैसर्गिक स्त्रोत आहे. स्नायूंची वाढ व ताकद वाढवण्यासाठी अंडे मदत करतात. एकाग्रता वाढणे, मेंदूची कार्यक्षमता वाढणे, दृष्टी व डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत व शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी अंडी मदत करतात.

रोज सकाळी अंड्यांचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. रोज दोन अंडी खाल्ल्यास दिवसभर पोट भरल्यासारखे वाटून भूक लागण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे अतिरिक्त खाणे कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. एकूणच अंडे हे सर्व जीवनसत्त्व परिपूर्ण असल्याने व सोबत त्यातील ट्रिप्टोफॅन मुळे मन आनंदी राहते, अशी ही सर्वगुणसंपन्न अंडी आज मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात.

आज बाजारात, मोठमोठ्या शहरात जी अंडी मिळतात, जी आपण विकत घेतो त्याचे योग्य पैसे, मूल्य आपण देतो का? त्यांचा आकार, गुणवत्ता पडताळून पाहतो का? जो दर सांगितला जातो तो दर देऊन आपण आणली खरेदी करतो. आपल्याकडे अंड्याच्या वजनावर त्यांची ग्रेड ठरते.

साधारणपणे ६५ ग्रॅम ते ४५ ग्रॅम पर्यंतच्या अंड्यांना ग्राहकांची पसंती असते. तथापि ५० ते ६० ग्रॅम वजनाच्या अंड्यांना मोठी मागणी असते. व्यापारी उत्पादकाकडून खरेदी करताना ‘एनएसीसी’ने (नॅशनल एग कोऑरडीनेशन कमिटी) ठरवलेल्या दरात खरेदी करतातच असे नाही. सोबत कमी वजनाची अंडी, सुरुवातीच्या काळातील कमी वजनाची लहान आकाराची अंडीही कमी दरात खरेदी केली जातात व बेमालूमपणे ती वरच्या ग्रेडच्या अंड्यामध्ये मिसळली जातात.

उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे होऊ शकते. आणि सरतेशेवटी ग्राहकांना अंडी घेताना वाढीव दराने खरेदी करावी लागतात. ती निवडून खरेदी करता येत नाहीत. मग कमी जास्त वजनाच्या आकाराची अंडी घेतल्याने ग्राहकाचे नुकसान होते आणि उत्पादकांना देखील योग्य भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेच अंड्याच्या आकारमान आणि वजनानुसार प्रथिनांची उपलब्धता देखील बदलते.

अंड्यामध्ये १२५ मिलीग्रॅम प्रथिने प्रतिग्रॅम असतात, म्हणून ६३ ग्रॅम वजनाच्या अंड्यात ७.९ ग्रॅम प्रथिने, ५६ ग्रॅम वजनाच्या अंड्यात ७ ग्रॅम, आणि ५० ग्रॅम वजनाच्या अंड्यात ६.३ ग्रॅम प्रथिने उपलब्ध होतात. उत्पादक ते ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची गरज ही राहणार आहेच पण त्यासाठी त्यांच्या नफ्याचे प्रमाण निश्चित करावे, या दरावर नियंत्रण ठेवावे.

ज्याप्रकारे आता बाजारात आंबे, कलिंगडे टरबूज ही नगावर न विकता वजनावर विकली जातात त्याप्रमाणे ग्राहकाने मागणी केल्यास अंडी वजनावर विकायला सुरुवात झाली तर आश्चर्य वाटायला नको. आज बाजारात वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये ही अंडी विकली जातात ती देखील नगावर असतात तेव्हा ती जर वजनावर विकली तर नेमका फायदा सर्वांचा होईल कमीत कमी नुकसान तर होणार नाही, याचा विचार सर्वांनी करायला हवा.

अंड्याचा ताजेपणा समजण्यासाठी अंडे पाण्यात टाकून पहावे. तळाशी बुडालेले अंडे हे ताजे असते. पाण्यात उभे राहिलेले अंडे अजूनही ताजे आहे असे आपल्याला म्हणता येईल. पाण्यावर तरंगणारे अंडे हे ताजे नसते. त्याचबरोबर उकडलेल्या ताज्या अंड्याचे कवच लवकर व सहजपणे निघत नाही. तसेच अंडे फेटताना ताज्या अंड्याचा पांढरा बलक शिळ्या अंड्यापेक्षा लवकर फेटला जातो.

(लेखक पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com