
अलिबाग ः वाढत्या औद्योगिकरणासह (Industrialization) पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरीकरण झपाट्याने वाढले असून शहरांसह गावांचाही विस्तार होत आहे. परिणामी लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे, त्याचबरोबर शेतीला पूरक कुक्कुटपालन व्यवसायही (Poultry Industry) बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्या तुलनेत शेती, तसेच पोल्ट्री व्यवसायातील उत्पादन कमी झाले आहे. शिवाय बदलते हवामान, अवेळी पाऊस, बर्ड फ्ल्यूचा धोक्यामुळे अनेकांनी पोल्ट्री व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. भात शेतीसह पूरक व्यवसाय म्हणून अनेक वर्षांपासून तरुण मंडळी पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडूनही वेगवेगळ्या योजना राबवून पोल्ट्री व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातून बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये २,००० हून अधिक पोल्ट्री व्यावसायिक असून सुमारे ४० लाख पेक्षा अधिक कोंबड्यांचे संगोपन केले जाते. या व्यवसायातून सुमारे ६५ हजार पेक्षा अधिक जणांना रोजगार मिळाला आहे. पोल्ट्री व्यवसायाला गती देण्यासाठी पशुसंवर्धन विभागानेही वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यांत विकासाचे वारे जोमाने वाहत आहेत.
पनवेल, कर्जत, खालापूर, उरण या तालुक्यांमध्ये वेगवेगळे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे शहराजवळ पोल्ट्रीच्या जागी मोठ मोठे गोदामे उभी राहिली आहेत. त्यातून भाड्यापोटी चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने अनेकांनी पोल्ट्रीच्या जागी गोदामे थाटली आहेत. तर काहींनी पोल्ट्रीचे भूखंड बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी दिले आहेत. पोल्ट्री व्यवसायात खूप मेहनत आहे.
अतिवृष्टीमुळे कोंबड्या मरतात. शिवाय साथीचा संसर्ग झाल्यासही नुकसान सहन करावे लागते. त्या तुलनेत पेणमध्ये तयार केलेल्या गणेशमूर्तींना विशेष मागणी असल्याने काहींनी पोल्ट्री व्यवसाय बंद करून गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू केल्या आहेत. मात्र अलिबाग, खालापूरमधील काही भाग, पाली, कर्जतमध्ये काही ठिकाणी आजही पोल्ट्री व्यवसाय तग धरून असल्याचे दिसते.
पोल्ट्री व्यावसायिकांनी पशुसंवर्धन विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी वारंवार आवाहनही केले जाते. मात्र काही व्यावसायिक नोंदणी करीत नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. तीन हजार पेक्षा जास्त पक्षी असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी तालुका पंचायत समिती कार्यालयातील पशुसंवर्धन विभागातील विस्तार अधिकारी यांच्या संपर्क साधून नोंदणी करावी.
- डॉ. रत्नाकर काळे, उपायुक्त,
जिल्हा पशुसंवर्धन विभाग, रायगड
जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
जिल्ह्यामध्ये काही पोल्ट्री व्यावसायिक अधिक नफा मिळविण्यासाठी दीड किलोपेक्षा अधिक वजनाचे पक्षी विकतात. मात्र या वजनाच्या पक्ष्यांमध्ये तंतू वाढतात. शिजण्यास अडचण निर्माण होते. तसेच खाण्यासही बेचव लागतात. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी एक ते दीड किलो वजनाचे पक्षी विकावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.