पोल्ट्री उद्योगाला उन्हाच्या झळा

पोल्ट्री उद्योगाला उन्हाच्या झळा खानदेशातील शंभराहून अधिक पोल्ट्री व्यवसाय बंद
पोल्ट्री उद्योगाला उन्हाच्या झळा
poultry industryAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
मेहुणबारे, जि. जळगाव ः वातावरणात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेचा फटका कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला बसला आहे. वाढते तापमान कोंबड्या व त्यांच्या पिलांसाठी असह्य ठरत आहे. हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने खानदेशात सुमारे शंभरांहून अधिक पोल्ट्री व्यावसायिकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसायिकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी व्यावसायिकांमधून होत आहे.

खानदेशात सुमारे आठशेच्यावर पोल्ट्री फार्म आहेत. यातील बहुतांश फार्म हे सुशिक्षित बेरोजगारांचे आहेत. त्यामुळे या व्यवसायासाठी अनेकांनी बॅंकांचे कर्ज काढले आहे. सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. वाढत्या उष्णतेचा विपरीत परिणाम कोंबड्यांवर होत आहे. उष्णतेमुळे कोंबड्या मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सुमारे २५ टक्के कोंबड्या व पिलांचा वाढत्या उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

अल्प दरात विक्री
एकीकडे कोंबड्यांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे बाजारात चिकनला पाहिजे तशी मागणी नाही. सध्या एक किलो चिकन १८० ते १९० रुपये दराने विकले जात आहे. सर्वसाधारणपणे पाच हजार कोंबड्यांना ४५ दिवसांत दोन लाख लिटर पाणी केवळ पिण्यासाठी लागते. ज्या पोल्ट्री व्यावसायिकांकडे पाण्याची उपलब्धता नाही, अशांना टँकरचे पाणी विकत आणावे लागत आहे. अशातच तापमानाचा पारा ४० अंशांच्यावर जात असल्याने अनेकांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. कोंबड्यांच्या खाद्यासह औषधी व त्यांच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च आणि कोंबड्यांना सध्या बाजारात मिळणारा भाव पाहता, हा व्यवसाय तोट्यात असल्याचे बहुतांश पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

पतपुरवठ्याबाबत बँकांची उदासीनता
पोल्ट्री व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर २५ टक्के ‘सबसिडी’ दिली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायासाठी बँकेकडून एक रुपया देखील कर्ज दिले जात नाही. एकीकडे पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश असताना दुसरीकडे बॅंका मात्र काही ना काही कारणे दाखवून कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. परिणामी, कर्जाच्या सबसिडीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पोल्ट्री उद्योजकांना वाऱ्यावर न सोडता, बॅंकांसह शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.

उष्णतेपासून पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी शेडमध्ये ‘फॉगर’ची सुविधा करणे गरजेचे आहे. सोबतच शेडवर चुन्याचा लेप लावावा, पोल्ट्रीच्या छतावर तुराठ्या किंवा कडब्याचे (कोरडा चारा) आच्छादन टाकावे. कोंबड्यांना मुबलक प्रमाणात पिण्यासाठी थंड पाणी द्यावे.
- ज्योती माळी,
पशुधनविकास अधिकारी, मेहुणबारे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com