प्रक्षेत्रावर शून्य परजीवी अभियानाची गरज

जनावरांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य, परजीविजन्य, आहारातील कमतरतेमुळे आजार होतात. या मध्ये परजीविजन्य आजार महत्त्वाचे आहेत. यासाठी शून्य परजीवी अभियान राबविण्याची गरज आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

डॉ. बाबासाहेब नरळदकर, डॉ. श्रीकांत काळवाघे

प्रक्षेत्रावर जनावरांचे संगोपन (Animal Rearing) करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गोठ्याच्या व्यवस्थापनापासून (Cowshed Management) ते रोगनियंत्रणापर्यंत (Animal Disease Control) प्रत्येक गोष्टीला विशिष्ट महत्त्व आहे. याशिवाय जनावरांचे आरोग्य (Animal Health) आणि दूध उत्पादन (Milk Production) वाढ शक्य होत नाही. जनावरांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य, परजीविजन्य, आहारातील कमतरतेमुळे आजार होतात. यामध्ये परजीविजन्य आजार महत्त्वाचे आहेत. त्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत.

Goat Farming
Animal Care : जनावरांतील विषबाधेची कारणे कोणती आहेत?

१) परजीवी अन्नरस शोषण करतात. पर्यायाने आहारातील विविध घटकांची कमतरता

निर्माण होऊन उत्पादन व पुनरुत्पादनावर परिणाम होतो.

२) परजीवी स्वत: अनेक आजार निर्माण करतात.

३) कीटकवर्गीय परजीवी, गोचिड हे जनावरांमध्ये अनेक प्रकारचे जिवाणूजन्य व विषाणूजन्य आजार प्रसारित करतात.

गोठ्यातील परजीवींची संख्या योग्य व्यवस्थापनाद्वारे शक्य तेवढी नगण्य करणे आवश्यक आहे. शून्य परजीवी अभियानातून प्रक्षेत्रावर असंख्य फायदे होतात. प्रमुख फायदा म्हणजे उत्पादन व पुनरुत्पादन यातील घट आणि आर्थिक नुकसान टाळता येते. जनावरांमध्ये काहीअंशी परजीवीमार्फत प्रसारित होणाऱ्या जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीविजन्य आजारापासून मुक्तता होते. यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने वर्षभर कार्यक्रम राबवणे अत्यंत फायद्याचे ठरते.

Goat Farming
Animal Care : जनावरांतील जंतनिर्मूलन कसे कराल?

शून्य परजीवी अभियान राबविण्याचे प्रकार :

१) साधारणपणे जनावरांना आंत्र व बाह्यपरजीवी यांचा प्रादुर्भाव होतो. आंत्र परजीवीमध्ये आतड्यामध्ये आढळणारे गोलकृमी, पट्टकृमी, निरनिराळ्या अवयवात आढळणारे पर्णकृमी तसेच रक्त पेशी व रक्तजलामध्ये आढळणारे आदिजीविजन्य आजारांचा समावेश होतो. बाह्य परजीवींमध्ये चावा घेणारे आणि चावा न घेणाऱ्या कीटकवर्गीय माश्या, उवा, पिसवा, ढेकूण, गोचीड, खरजेचे कीटाणू यांचा समावेश होतो.

२) सर्व प्रकारच्या आंत्र आणि बाह्यपरजीवीच्या नियंत्रणासाठी केवळ औषधोपचार म्हणजेच आंत्रपरजीवीसाठी जंतनाशक मात्रा देणे किंवा बाह्य परजीवींसाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी हे उपाय महत्त्वाचे समजले जातात. परंतु कालपरत्वे जंतनाशक आणि कीटकनाशकांचा प्रदीर्घ व असमतोल वापर यामुळे त्यांच्या प्रती प्रतिरोध वाढत गेला. यामुळे शास्त्रज्ञांना संशोधनाद्वारे या व्यतिरिक्त अनेक उपाय शोधणे क्रमप्राप्त झाले. याचाच परिणाम म्हणजे विविध पद्धती समरसतेने वापरून आंत्र व बाह्य परजीवींसाठी संयुक्तपणे एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरले. आजच्या परिस्थितीमध्ये आंत्र परजीवींसाठी एकात्मिक परजीवी नियंत्रण आणि बाह्य परजीवीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

शून्य परजीवी अभियान ः

१) शेळी, मेंढीस परजीवींचे संग्रहालय असे संबोधले जाते. कारण शेळी, मेंढीच्या सर्व वयोगटामध्ये सतत परजीवीचा प्रादुर्भाव होत असतो. हिमोंकस कॉनटुरट्‌स या गोलकृमीमुळे वर्षभरात प्रति मेंढी १,२२८ आणि शेळीमध्ये १,१६० रुपये नुकसान होते. याचबरोबरीने शेळी, मेंढीमध्ये आंत्रपरजीवी व बाह्य परजीवींचा प्रादुर्भाव होतो.

२) गाई, म्हशींच्या वासरामध्ये जन्मत:च टॉक्सोकारा व्हिटुलोरम या कृमीचा प्रादुर्भाव दिसतो. त्यांना लहान वयात कॉक्सिडिओसिस आणि पट्टकृमींचा प्रादुर्भाव होतो.

३) परजीवींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गोठा व्यवस्थापण, गवत व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

परजीवी नियंत्रणातील काही गैरसमजुती आणि त्यावरील उपाय ः

१) एकात्मिक परजीवी नियंत्रण आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन

यामध्ये रसायनांचा वापर करता येत नाही. हा एक गैरसमज आहे.

- एकात्मिक परजीवी नियंत्रणामध्ये जंतनाशक आणि कीड व्यवस्थापना मध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर योग्य तेव्हा सुलभ पद्धतीने करावयाचा आहे. आवश्यकता नसताना व परजीवी संख्या अत्यल्प अथवा मर्यादित असताना इतर व्यवस्थापनाच्या पद्धती वापरून रसायनांचा वापर मर्यादित ठेवणे, त्यांच्याप्रती प्रतिरोध तयार होणार नाही याची काळजी घेणे हा प्रमुख उद्देश एकात्मिक परजीवी नियंत्रणाचा आहे.

२) एकात्मिक परजीवी नियंत्रण व एकात्मिक कीड व्यवस्थापन हे अभियान प्रक्षेत्रावर राबवण्यासाठी क्लिष्ट असून, त्याची अंमलबजावणी करणे कठीण आहे. हा देखील गैरसमज आहे.

- संशोधनाअंती परजीवी नियंत्रणाच्या विकसित झालेल्या अनेक पद्धती, जसे की १) भौतिक, २) जैविक, ३) वनस्पतिजन्य, ४) रासायनिक, ५) व्यवस्थापन यांचा एकत्रित, पूरक पद्धतीने परजीवीच्या संख्येनुसार वापर करून प्रभावी पद्धतीने परजीवींसाठी शून्य परजीवी अभियान राबविणे सोपे आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक भौगोलिक परिस्थिती, तापमान व आर्द्रता निर्देशांक, पर्जन्यमान, त्या भागात आढळणाऱ्या परजीवींच्या प्रमुख प्रजाती यांचा एकत्रित अभ्यास करून परजीवी नियंत्रणाचा शिस्तबद्ध कार्यक्रम तयार करावा.

- आताच्या परिस्थितीमध्ये वातावरणातील घटक, पर्जन्यमान इत्यादीची सखोल माहिती मिळण्यासाठी अनेकविध साधने उपलब्ध आहेत. प्रत्येक भौगोलिक परिस्थितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता हे बदलत असते. म्हणून तेथील परिस्थितीमध्ये परजीवीच्या वेगवेगळ्या प्रजातींचा प्रादुर्भाव आढळून येतो. अशा परिस्थितीमध्ये परजीवींच्या प्रजातींचा एकत्रित अभ्यास करून प्रभावी ठरणारी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा.

----------------

संपर्क ः डॉ बाबासाहेब नरळदकर, ८९९९१३३३६३

(पशुविज्ञान आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com