शेतकरी नियोजन ः कुक्कुटपालन

गेल्या २० वर्षांपासून कुक्कटपालनाच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या मनोज कापसे यांच्याकडे स्वतःकडील पक्षिगृहात २० व बाहेर १० हजार पक्षी संगोपन केले जाते.
Poultry
PoultryAgrowon

शेतकरी नियोजन ः कुक्कुटपालन

नाव : मनोज आनंदा कापसे

गाव : पिंपळगाव वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक

एकूण ः ३० हजार पक्षिक्षमता

गेल्या २० वर्षांपासून कुक्कटपालनाच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या मनोज कापसे यांच्याकडे स्वतःकडील पक्षिगृहात २० व बाहेर १० हजार पक्षी संगोपन केले जाते. पक्षिगृहांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, खाद्य व्यवस्थापन आणि वातावरणीय बदलानुसार उपाययोजना या बाबी या व्यवसायात महत्त्वाच्या ठरतात. त्यावरच पक्ष्यांच्या मरतुकीचे प्रमाण किमान पातळीवर राखतानाच अपेक्षित वजन वाढ मिळवता येते. हेच या व्यवसायाचे इंगित आहे.

Poultry
कसा साफ करावा पोल्ट्री शेड ?

पावसाळ्यात शहरांतील मागणी घटते. तसेच जुलै महिन्यापासून पुढे श्रावण महिना असल्याने चिकनला मागणी कमी राहते. त्यामुळे आगामी प्लेसमेंट मर्यादित ठेवण्याचे नियोजन केले आहे. संभाव्य दर, बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन साधले तर फायदा हाती लागतो, या धोरणाने मनोज कार्यरत राहतात.

पक्षी संगोपनाचे पूर्वनियोजन :

व्यवसाय हा स्वःविक्री व करार अशा दोन पद्धतीने केला जातो. पक्ष्यांची प्लेसमेंट करण्यापूर्वी पक्षिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केले जाते. बेडवर चुना मारून भाताचे तूस पसरविण्यात येते. पिलांची बैठक तुसाच्या गादीवर असल्याने ते कोरडे राहील याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे नवीन पिलांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यानंतर पहिल्या दिवसाची कुक्कुट पिले (चिक्स) मागविली जातात. पिले येण्यापूर्वी चीक फिडर व ड्रिंकर स्वच्छ करण्यासह खाद्य व पाण्याने भरून ठेवली जातात. वाढीच्या अवस्थेत शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते.

Poultry
पोल्ट्री व्यवसाय झाला मुख्य आर्थिक कणा

गुणवत्तापूर्ण खाद्य पुरवठा :

ब्रॉयलर पक्ष्यांच्या वाढीसाठी संतुलित आहार हा महत्त्वाचा घटक आहे. योग्य मात्रेत पक्ष्यांच्या वाढीनुसार योग्य पोषकतेचा आहार दिला जातो. त्यासाठी आहाराचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. गुणवत्तापूर्ण खाद्यामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सोयाबीन, मका यांच्या संतुलित वापरातून पक्षिखाद्य निर्मितीही स्वतः करतात. त्यामुळे खर्चात मोठी बचत होते. त्यात आवश्‍यक औषधांचे मिश्रण केले जाते. पक्षी रोगाला कमी बळी पडतात. मरतूकही कमी राहत असल्याचा मनोज यांचा अनुभव आहे.

पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे :

पक्ष्यांसाठी शुद्ध पाण्याची सोय केली आहे. पाणी निर्जंतुक करण्यासोबतच त्यातील सामू व क्षार यांचे प्रमाण नियंत्रित ठेवले जातो. आवश्यकतेनुसार प्रतिजैविक भुकटीही पाण्यातून दिली जाते. शिफारशीनुसार औषधांचा वापर केला जातो. पिलांना सहाव्या दिवशी पहिले लसीकरण केले जाते. त्यानंतर पुढील लसीकरणाचे वेळापत्रक पाळले. लसीकरण हे थंड वातावरणात सायंकाळी करतात.

हंगामी उपाययोजना :

बदलत्या ऋतूनुसार पक्षिगृहांचे नियोजन करावे लागते. हवा खेळती न राहता मिथेन वायूचे प्रमाण अधिक राहिल्यास पक्षी बळी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी पक्षिगृहाचे सतत हवा खेळती राहण्यासाठी पडदे खालीवर करणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात ‘सी’ जीवनसत्त्व अधिक देतो. पावसाळ्यात प्रामुख्याने तापमान नियंत्रण गरजेचे असते. हिवाळ्यात ब्रूडिंग किंवा उन्हाळ्यात तापमान नियंत्रण केले जाते. पाऊस आल्यानंतर आर्द्रता वाढून तूस ओले होते. त्यामुळे पक्षी आजारी पडतात. याकडे काटेकोर लक्ष दिले जाते.

मागणीनुसार पक्षी पुरवठा :

४० ते ४५ दिवसांची बॅच पूर्ण झाल्यानंतर पक्ष्यांचे वजन तपासून बाजारपेठेच्या मागणीनुसार पाठवले जाते. बाजारपेठेमध्ये राज्यातील मुंबई शहरासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यापर्यंत पक्ष्यांचा पुरवठा करतात. मात्र शक्यतो वाहतुकीचे अंतर कमी राहील, याला प्राधान्य देतो.

संपर्क : मनोज कापसे, ८८८८७७२२११

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com