
डॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे
उन्हाळ्यात नांगरणी (Plowing), कुळवणी (Hoe Cultivation) तसेच पावसाळ्याच्या सुरवातीस शेतीची मशागतीची बरीच कामे बैलांच्याकडून (Agriculture Bull) केली जातात. शेतीकामामध्ये बैलांच्याकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात काम करून घेतल्यास अनेक आजार (Bull Disease) होतात. अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा आजार म्हणजे ‘खांदेसूजी‘.
आजाराची कारणे
जनावरांतील खांदेसूजी ही प्रामुख्याने ‘जू‘ मानेस सतत घासण्यामुळे होते.
शेतीकाम करताना किंवा बैलगाडीस मानेची कातडी जू आणि जुवाला असणारी खीळ यामध्ये चेंगरते. यातून खांदेसूज होते.
काही वेळा जुवाचा मानेवर टेकणारा पृष्ठभाग हा अत्यंत खडबडीत असतो. हा भाग घासून मानेस सारखी इजा होते आणि खांदेसूजी होते.
आपल्याकडे असणारी बैलजोडी ही अनेकदा कमी जास्त उंचीची असते. यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहात नाहीत. परिणामी जू हे तिरकस ओढण्यात येते. त्यामुळे दोन्ही बैलांना खांदेसुजीचा आजार होतो.
तरुण वयातील बैल तसेच सतत कामाचा ताण असणाऱ्या बैलांमध्ये हा आजार जास्त होतो.
बैलांना अचानक जास्त प्रमाणात शेत कामास जुंपल्याने हा आजार होतो.
बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लावल्यास आजार होऊ शकतो.
कच्चे व खराब रस्त्स्यावर जास्त वजन असणारी बैलगाडी ओढायला लावल्यास हा आजार होऊ शकतो.
लक्षणे
खांद्यावरील भागावर भयंकर सूज येते.
सूज ही खांद्याची कातडी व त्याखालील त्वचेच्या भागावर येते.
जू ओढताना खांद्याची कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडी आणि कातडीखालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते.
खांद्यावरील सूज गरम असते. ती लाल दिसते व अत्यंत वेदनादायी असते.
सुजेचा आकार हा लिंबू ते फुटबॉल एवढा असतो.
काही वेळा सूज मऊ, पाणी असणारी ते कडक लागणारी असू शकते.
सुजेतून फुटून पाणी येऊ शकते .
खांद्यावर अशी सूज आल्यामुळे बैल काम करू शकत नाही.त्यामुळे शेतकामाचा खोळंबा होतो.
खांदेसुजी झालेल्या बैलास आराम दिल्यास सूज कमी होते. कामास जुंपल्यास पुन्हा वाढते.
खांदेसूज झालेले जनावर विनाउपचार कामास जुंपल्यास कातडीवर लहान जखम होऊन गळू येतात.
खांद्यावर मोठी जखम झाल्यास त्यात रोगजंतूंचा शिरकाव होऊन आसडी पडते.
अनेकदा प्रथम खांद्यावर लहान आकाराच्या गाठी येतात. उपचार न केल्यास त्या वाढून खांद्याचा कर्करोगसुद्धा होतो.
मानेवर कातडी गुंडाळली जाते.
जनावरास कामास जुंपल्यास प्रचंड वेदना होतात.
उपचार
खांदेसुजीची लक्षणे बैलांमध्ये दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकाकडून उपचार करावा.
नुकत्याच झालेल्या खांदेसुजीत सुजलेल्या भागावर ४ ते ५ दिवस सूज कमी करणारे मलम लावावे.
ताज्या सुजेत रोज ५ ते १० मिनिटे प्रमाणे बर्फाने ३ ते ४ दिवस शेकावे.
ग्लिसरीनमध्ये मॅग्नेशिअम सल्फेट मिसळून पेस्ट खांद्यावर लावल्याससुद्धा नुकतीच आलेली सूज कमी होते.
जुन्या सुजेत गरम वाळू कपड्यात गुंडाळून खांद्यास ४ ते ५ दिवस शेक द्यावा. गरम पाण्याने शेक दिला तरी चालतो.
शेक देताना जनावरास भाजणार नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा त्वचा भाजण्याची शक्यता असते. गरम पाणी किंवा भुसा याचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा थोडे जास्त असावे. यासाठी गरम पाणी, वाळू किंवा भुशास प्रथम आपण स्पर्श करून पाहावे, म्हणजे त्याचे तापमान कमी आहे याची खात्री होईल.
खांद्यावर आलेल्या गाठी पू असणाऱ्या असतील तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घ्यावी. त्यातील पू काढून टाकावा. त्याचे रोज ड्रेसिंग करावे.
उपचार करत असणाऱ्या बैलास अजिबात कामास जुंपू नये. पूर्णपणे आराम द्यावा.
औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात. त्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याप्रमाणे योग्य औषधोपचार आणि काळजी घ्यावी.
आजार टाळण्यासाठी उपाय
खडबडीत पृष्ठभाग असणारे जू बदलावे.
समान उंचीची बैलजोडी कामास जुंपावी. दोन्ही बैलांच्या खांद्यावर पडणारे वजन हे समान असावे.
बैलांना भरपूर काम न देता थोड्या थोड्या विश्रांतीने काम द्यावे.
बैलांना सतत कामाचा ताण देवू नये .जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेती कामास जुंपू नये.
बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लावू नये.
कच्चे व खराब रस्त्या जास्त वजन असणारी गाडी ओढायला लावू नये.
- डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६, (मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई )
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.