कालवडीची प्रजनन संस्था अन माजाचे चक्र

कालवडी योग्य वयात नियमित माजावर येणे, गाभण राहणे आणि विणे ही यशस्वी दुग्धव्यवसायाची गुरुकिल्ली आहे.
Heirfer Reproductive Institution
Heirfer Reproductive InstitutionAgrowon

कालवडी (Heirfer) योग्य वयात नियमित माजावर येणे, गाभण राहणे आणि विणे ही यशस्वी दुग्धव्यवसायाची गुरुकिल्ली आहे. नियमित माजावर येणारी कालवड गाभण राहण्यासाठी पशुपालकांना कालवडीची प्रजनन संस्था, (Reproductive Institution) माजाचे चक्र, माजाची लक्षणे, कृत्रिम रेतन करताना घ्यावयाची काळजी इत्यादी गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

कालवडीच्या प्रजनन संस्थेत स्त्रीबीज कोष (Ovary), स्त्रीबीज वाहक नलिका (Fallopian Tubes / Oviduct),गर्भाशय व गर्भाशयाची शिंगे (Uterus and horns of Uterus), कमलमुख- गर्भाशयाचे मुख (Cervix), योनी (Vagina), योनी मुख (Vulva) / योनी ओट (Valval Lips) इत्यादी अवयवांचा समावेश असतो. त्यांची रचना व कार्य पुढील प्रमाणे आहेत.


स्त्रीबीजकोष : (Ovary),
१) प्रजनन संस्थेमध्ये स्त्रीबीजकोष हा सर्वात महत्वाचा अवयव आहे. गाईमध्ये साधारणतः १ ते १.५ इंच एवढ्या आकारमानाचे दोन्ही बाजूस दोन स्त्रीबीजकोष पोटातील पोकळीमध्ये लोंबत असतात. स्त्रीबीजकोषची स्त्रीबीज निर्माण करणे आणि संप्रेरकाची निर्मिती करणे हे प्रमुख कार्य आहेत.
२) स्त्रीबीजकोषातून निर्माण होणाऱ्या संप्रेरकामधील इस्ट्रोजनमुळे विशिष्ट कालावधीत कालवड माजावर येते. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भधारणा झाल्यास गर्भाशयाची हालचाल थांबून गर्भ स्थिर ठेवण्यात मदत करते आणि रिलॅक्सीनमुळे गाई विण्यावेळी योनीमार्ग आणि त्याच्या आजूबाजूचे स्नायू शिथील होऊन प्रसुती सुकर होते.

Heirfer Reproductive Institution
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापर

स्त्रीबीजवाहक नलिका : ((Fallopian Tubes / Oviduct)
१) गर्भाशय शिंग व स्त्रीबीजकोष यांना जोडणारी बारीक नलिका असते. याची लांबी २० ते २५ सेंमी असते. स्त्रीबीजवाहक नलिकेचा आकार स्त्रीबीजकोषाजवळ नरसाळ्यासारखा असतो. या पसरट भागामुळे स्त्रीबीजकोषात सुटलेले स्त्रीबीज स्त्रीबीजवाहक नलिकेत येते.
२) स्त्रीबीजाचा शुक्रजंतूशी या भागात संयोग होवून फलधारणा होते आणि स्त्रीबीजवाहक नलिकेतून गर्भ गर्भाशयाकडे जातो.

गर्भाशय : (Uterus and horns of Uterus),
गर्भाशयाची प्रामुख्याने गर्भाची व्यवस्थित वाढ घडविणे व त्याचे पालनपोषण करणे आणि वितेवेळी गर्भाशय आकुंचन प्रसरण पावणे हे कार्य आहेत. गर्भाशयाचे मुख्यतः गर्भाशायाचे अंग आणि गर्भाशयाचे शिंगे असे दोन भाग असतात.
गर्भाशयाचे अंग
१) गर्भाशयाच्या मुखापासून ते गर्भाशयाच्या शिंगापर्यंत असणाऱ्या भागाला गर्भाशयाचे अंग म्हणतात. कृत्रिम रेतन करताना वीर्य कमळमुखातुन गर्भाशयाचे अंग येथे सोडले जाते.
२) गर्भाशयाचे अंगाच्या आतील भागावर बटनाप्रमाणे उंचवटे असतात, त्यांना कॉटिलिडॉन्स म्हणतात. गर्भाशय हे स्नायुंनी बनलेले असते. यामध्ये गर्भाची वाढ होते, त्यावेळी याचा आकार वाढतो आणि विल्यानंतर याचा आकार सामान्य होतो.
३) गर्भावस्थेमध्ये या भागातच गर्भावरील आवरणे (वार) व नाळ असते. नाळेद्वारे गर्भाला शुद्ध हवा, अन्नाचा पुरवठा होतो.
गर्भाशयाची शिंगे
१) गर्भाशयाला उजवे व डावे अशी दोन शिंगे असतात. गर्भाशयाचे व स्त्रीबीजवाहनलिका या दोन अवयवांना गर्भाशयचे शिंगे यामार्फत जोडले जाते. याची लांबी सुमारे ६ ते ८ इंच असते. गर्भाच्या वाढी प्रमाणे याचा आकार कमी जास्त होतो.

Heirfer Reproductive Institution
म्हशी माजावर कधी येतात?

कमलमुख / गर्भाशयाचे मुख : (Uterus and horns of Uterus),
१) गर्भाशयात प्रवेश करण्यासाठीचा एकमेव मार्ग आणि योनीमार्ग व गर्भाशय यांना जोडणारा भाग म्हणजे कमलमुख होय. या भागाभोवती स्नायूंचे भक्कम वलय असते. याची रचना कमळाच्या पाकळ्याप्रमाणे असते म्हणूनच त्याला कमलमुख असे म्हणतात.
२) गाभण नसताना याची लांबी २ ते ३ इंच व व्यास १ ते २ इतका असातो. कालवड माजावर येते त्यावेळी कमलमुखातून चिकट पारदर्शक द्रव पदार्थ योनीमार्गे बाहेर येतो. त्यावेळी हा भाग उघडा असतो. तसेच स्त्रावणारा चिकट पदार्थ शुक्राणूजंतूना गर्भाशयात पोहोचण्यास मदत करतो व बाह्य जंतूना आत प्रवेश करण्यास प्रतिबंध करतो.
३) माज संपल्यानंतर गर्भाशयाचे मुख आपोआप बंद होते. गर्भधारणा झाल्यास चिकट पदार्थाचे एक प्रकारचे घट्ट सिल तयार होवून तो मार्ग बंद होतो. यामुळे गाभणकाळात कोणताही जीवजंतू गर्भाशयात प्रवेश करु शकत नाहीत. गर्भ सुस्थितीत राहतो. विण्याच्या वेळेस हे मुख जास्त शिथिल विस्तृत होवून वासरु बाहेर येते.

योनी : (Vagina)
१) योनीमुखापासून गर्भाशयाच्या मुखापर्यंत पसरलेला ८ ते १० इंच लांबीचा व ४ ते ५ इंच परिघाचा हा भाग असतो. योनी हा अतिशय प्रसरण व आकुंचन पावणारा अवयव आहे.
२) नैसर्गिक संयोगाच्या वेळी नराच्या जननेंद्रिये व विताना वासरू बाहेर पडण्यासाठी विस्तृत जागा देणे हे योनीचे कार्य आहे.

योनीमुख: (Vulva)
१) कालवडीच्या प्रजनन संस्थेतील सर्वात बाहेरचा दिसणारा भाग म्हणजे योनीमुख होय. त्याच्या दोन्ही बाजूला मांसल भाग असतात त्याला योनीचे ओठ म्हणतात. गाय माजावर आल्यानंतर हा भाग लालसर सुजल्यासारखा दिसतो. त्यामधून चिकटद्रव स्त्रवतो.
२) वासराला जन्म देताना योनीचे प्रसरण होऊन वासरु बाहेर येते. योनीमुळे योनीमार्गाच्या व गर्भाशयाच्या आतील आवरणाचे रोगजंतूपासून संरक्षण होते.

माजाचे चक्र : (Heat cycle:)
कालवडीमध्ये वयात आल्यानंतर प्रजनन चक्र सुरु होऊन माजावर येणे हा तिच्या आयुष्यातील नैसर्गिक स्थित्यंतरचा काळ असतो. या काळात शारिरीक क्रियेचा वेग, उद्देश बदलतो व शरीर प्रजोत्पादनासाठी सक्षम बनते. वयात आल्यानंतर प्रजनन संस्थेतील अवयव, स्त्राव ग्रंथी इत्यादिची वाढ जलद होवून कार्यरत होते. प्रजनन चक्रात २१ दिवसांत विविध संप्रेरकाची निर्मिती होत असल्यामुळे शारीरीक बदल होत असतात त्यानुसार त्याच्या खालील अवस्था असतात.
१) माजाची पूर्व अवस्था (प्रोईस्ट्रस):
- या काळामध्ये FSH संप्रेरकाच्या बदलामुळे स्त्रीबीज कोषातील बीजांडाची (फॉलिकलची) वाढ झपाट्याने होते. फॉलिकल मधून इस्ट्रोजन या संप्रेरकाचे स्रवण होवून रक्तामधील याचे प्रमाण वाढते. हा काळ २ ते ३ दिवसांचा असतो. कालवड ह्या कालावधीच्या शेवटी माजाची लक्षणे दाखवण्यास सुरवात करते.
२) माजाची अवस्था (ईस्ट्रस):
- कालवडी या काळात इस्ट्रोजेन संप्रेरकामुळे विशिष्ट माजाची लक्षणे दाखवतात. माजाचा हा काळ १८ ते २४ तासाचा असतो. कालवड या काळात वळू बरोबर नैसर्गिक संयोग करण्यास अतिउत्सुक असते, वळू किंवा इतर गाय अशा कालवडीवर उडल्यास शांत उभी राहून प्रतिसाद देते, योनी मार्ग फुगीर होऊन सूज आलेली असते, कमल मुख उघडे असते, योनीमार्गे सोट / बळस स्त्राव गळू लागतो. माजाच मध्य ते शेवटचा काळ कृत्रिम रेतन करण्यास योग्य असतो.
३) माज संपल्यानंतरची अवस्था (मेटईस्ट्रस):
- माज संपल्यानंतरचा ३ ते ४ दिवसाच्या काळाला मेटईस्ट्रस काळ असे म्हणतात. माज संपल्यानंतर १० ते १२ तासात स्त्रीबीज फलितासाठी बाहेर पडते. काही कालवडी या काळात रक्त मिश्रीत लालसर स्त्राव मार्गातून बाहेर टाकतात. अशा अवस्थेत माजाचा कालावधी संपलेला असतो.
- माजाचा शेवटच्या काळात कालवडीच्या अंगावर इतर गाई उडत नाही किंवा कालवडी स्वतःच्या अंगावर दुसऱ्या गायी / वळूला उडू देत नाही. गाय शांत व समाधानी राहते. या काळात गर्भधारणा झाली असल्यास फलीत गर्भाची पूर्वतयारी सुरु होते.
- प्रोजेस्ट्रॉरॉन संप्रेरकाची निर्मिती करण्यासाठी बीजांडकोषावर पितपिंड / कॉर्पस ल्युटियम (C.L.) तयार होते. यातून स्त्रवणाऱ्या प्रोजेस्टेरॉन संप्रेरकामुळे गर्भाशय, गाभण काळात आंकुचन न पावता गर्भाचे रक्षण करते.

४) दीर्घ मुदतीची शेवटची अवस्था (डाईस्ट्रस):
- माजाच्या चक्रातील ही दीर्घ मुदतीची १७ दिवसांची शेवटची अवस्था आहे. गर्भधारणा झाली नाही तर पुढील माज येईपर्यंत टिकून राहते. ह्या काळात गर्भाशय पुढील चक्राकरिता स्वतःला तयार करते.

संपर्क :
डॉ सचिन रहाणे,९९७५१७५२०५
डॉ. राजू शेलार, ८४५१०११३२२

( डॉ.रहाणे,डिंगोरे (ता.जुन्नर, जि.पुणे) येथे पशुधन विकास अधिकारी आहेत. डॉ. शेलार हे क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com