Goat Disease : शेळ्यांतील रक्ती हगवण, चक्री आजारावर उपचार

एकपेशीय जंतूंची वाढ ओलसर जागी होत असल्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांना रक्ती हगवण, चक्री रोग, लाल लघवी या आजारांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.
Goat Disease
Goat DiseaseAgrowon

डॉ.बी.सी.घुमरे,डॉ.व्ही.व्ही.कारंडे

एकपेशीय जंतूंची वाढ ओलसर जागी होत असल्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांना रक्ती हगवण (Hemorrhagic Disease), चक्री रोग, लाल लघवी या आजारांचा प्रादुर्भाव (Goat Disease) जास्त प्रमाणात आढळतो. शेळ्यांच्या बाह्यलक्षणांवरून किंवा प्रयोगशाळेत तपासणी करून या आजारांचे निदान करून घ्यावे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

एकपेशीय परोपजीवींपासून होणारे आजार ः

रक्ती हगवण ः

- आयमेरिया प्रवर्गातील जंतूंमुळे होतो.

- प्रामुख्याने लहान करडे बळी पडतात.

- आजारात तीव्र स्वरूपाची रक्ती हगवण होते.

- मरतुकीचे प्रमाण जास्त असते. हा आजार इतर जनावरांमध्येसुद्धा आढळतो.

प्रसार :

- एकपेशीय जंतूंची वाढ ओलसर जागी होते, त्यामुळे पावसाळ्यात प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.

- संसर्ग झालेल्या शेळ्यांच्या विष्ठेतून या रोगाचे जंतू जमिनीवर पसरतात. हे जंतू अनेक दिवस जमिनीवर टिकून राहतात. त्यांचा पाणी, खाद्य, लोकर इत्यादींशी संपर्क येऊन शरीरात प्रवेश करतात.

- बंदिस्त गोठ्यात हा आजार जास्त आढळतो.

- आजार झालेल्या शेळ्या आजारवाहक म्हणून काम करतात.

- शेळ्या नवीन जन्मलेले करडू गर्दीच्या ठिकाणी राहिल्यास या आजाराचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्‍यता असते.

- या आजारात विष्ठेचा वास येतो. आव पडते.

Goat Disease
Goat Diseases : शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर आजाराची लक्षणे ओळखा

लक्षणे :

- जंतू पचनसंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे आतड्यातील रक्तवाहिन्या फुटून रक्ती हगवण होते.

- शरीरात रक्त कमी पडल्याने रक्तक्षय होतो.

- हगवणीमुळे वजन कमी होऊन शेळ्या दगावतात.

- वाढीवर परिणाम होऊन वाढ खुंटते.

- गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो.

- काही वेळेस जास्त कळा दिल्यास मायांग बाहेर येते.

निदान :

- शेळीच्या बाह्य लक्षणांवरून आजाराचे निदान होऊ शकते.

- विष्ठेची प्रयोगशाळेत तपासणी करून आजाराचे निदान होते.

- शवविच्छेदनात मृत आतड्याचा दाह झालेला दिसतो.

उपचार ः

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित योग्य उपचार करून घ्यावा.

प्रतिबंध :

- करडांना जास्त गर्दीत ठेवू नये. पिण्यास स्वच्छ पाणी द्यावे.

- गोठ्याच्या आजूबाजूचे व गोठ्यातील वातावरण स्वच्छ, दुर्गंधीरहित व कोरडे ठेवावे.

- गोठ्यातील जमिनीत नियमितपणे चुन्याची भुकटी टाकावी.

- नवजात करडांच्या गोठ्याची विशेष काळजी घ्यावी.

- करडांना एकाच ठिकाणी चरण्यास नेऊ नये.

Goat Disease
Sanen goat Import : सानेन शेळीच्या भारतातील आयातीचा मार्ग मोकळा

२) चक्री रोग (ट्रायपॅनोसोमायसिस) -

- आजार प्रामुख्याने ट्रिपॅनासोमा इवानसाय या एकपेशीय परोपजीवीमुळे होतो.

- हा आजार शेळ्यांत कमी प्रमाणात आढळतो. गाय, म्हैस व बैलामध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

- पावसाळ्यात माश्‍यांचे पुनरुत्पादन जास्त प्रमाणात होते आणि संख्या जास्त असते. त्यामुळे प्रसार लवकर होतो.

- आजारात जनावर गोल-गोल फिरते. त्यामुळे यास चक्री आजार किंवा सर्रा म्हणतात.

प्रसार:

- चावणाऱ्या माश्‍या, डास किंवा गोचिडांमार्फत या एकपेशीय जंतूंचा प्रसार होतो.

- जंतू वटवाघळांच्या लाळेमध्ये असतात. त्यामुळे असे वटवाघूळ निरोगी शेळीस चावल्यास प्रसार होतो.

- गाय, म्हैस, बैल, घोडा आजार पसरवण्याचे कार्य करतात.

लक्षणे:

- जनावर चक्कर येऊन गोल-गोल फिरते. उच्च ताप असतो.

- शेळ्या जोरात डोके आपटतात, अंधत्व येऊन दगावतात.

- शेळी गाभडते किंवा मृत करडास जन्म देते.

- ताप हा कमी-जास्त होत असतो, तसेच अशक्तपणा येऊन रक्तक्षय होतो.

Goat Disease
Goat Farming : शेतकरी नियोजन : शेळीपालन

निदान :

- बाह्य लक्षणांवरून निदान होऊ शकते.

- शेळीच्या रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी करावी.

- शवविच्छेदनात रक्तक्षय झाल्याने अवयव पांढरे दिसतात किंवा कावीळ झालेली दिसते.

उपचार ः

पशुवैद्यकाच्या सल्ल्याने त्वरित योग्य उपचार करून घ्यावा.

प्रतिबंध :

१) संसर्ग झालेल्या शेळ्या, मेंढ्या कळपातून बाहेर काढाव्यात.

२) गोठा आणि गोठ्याच्या आजूबाजूला नियमितपणे जंतुनाशकाची फवारणी करावी, कारण या आजारावर लस उपलब्ध नाही.

३) लाल लघवीचा आजार (बबेसिओसिस)

- आजार बबेसिआ मोटासी व बबेसिआ ओवीस या जंतूंमुळे होतो.

- आजार संकरित गाय, म्हैस, बैल यांच्यात जास्त प्रमाणात होतो.

- आजारात लाल लघवी होते, त्यामुळे यास लाल लघवीचा किंवा लाल पाण्याचा आजार म्हणतात.

प्रसार ः

१) चावणाऱ्या गोचिडांमार्फत या एकपेशीय जंतूचा प्रसार होतो.

२) जास्त वय झालेल्या जनावरांत हा आजार झाल्यास ते आजारवाहक म्हणून कार्य करतात.

लक्षणे :

- खूप जास्त ताप येतो.

- लाल किंवा कॉफीच्या रंगाची लघवी होते. रक्तक्षय व पातळ संडास झालेली दिसते.

- भूक मंदावते, रवंथ करणे बंद होते.

- श्‍वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके वाढतात.

- गाभण शेळ्या गाभडतात.

- बरे झालेल्या शेळ्यांत अशक्तपणा व रक्तक्षय आढळतो.

निदान :

- पशुवैद्यकाकडून बाह्य लक्षणांवरून निदान होऊ शकते.

- आजारग्रस्त शेळीच्या रक्ताची पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रयोगशाळेत तपासणी करावी.

- शवविच्छेदनात रक्तक्षय झाल्याने अवयव पांढरे दिसतात किंवा कावीळ झालेली दिसते.

उपचार :

- पशुवैद्यकाकडून त्वरित योग्य उपचार करून घ्यावेत

प्रतिबंध :

१) गोठ्यात व गोठ्याच्या आजूबाजूला नियमित जंतुनाशकाची फवारणी करावी. गोचिडांचा नायनाट करावा, कारण या आजारावर लस उपलब्ध नाही.

२) आजारी शेळ्या कळपातून बाहेर काढाव्यात.

संपर्क-

डॉ.बी.सी.घुमरे, ९४२१९८४६८१

डॉ.व्ही.व्ही.कारंडे,९४२००८०३२३

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ, जि.सातारा)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com