कापसाचे उत्पादन आणखी 5 लाख गाठींनी घटणार!

देशांतर्गत कापूस उत्पादनात अजून घट होण्याचा अंदाज असून, त्याने कापूस बाजारभाव कसा प्रभावीत होईल, वाचा सविस्तर.
cotton crop
cotton crop

पुणे : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (CAI) 2021-22 मध्ये देशांतर्गत कापूस उत्पादनात पुन्हा एकदा घटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वीच्या अंदाजात पाच लाख कापूस गाठींची कपात करत भारतात यंदा 343 लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल, असे संघटनेने म्हटले आहे. याआधी देशात 348 लाख कापूस गाठींच्या (cotton bales) उत्पादनाचा अंदाज होता. एक कापूस गाठ 170 किलो रुईपासून बनलेली असते.

“गुजरातमध्ये दोन लाख, तेलंगाणा-कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक लाख, तर आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये 50,000 गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता आहे,”

- अतुल गणात्रा, अध्यक्ष, सीएआय

खरीप 2021 दरम्यान राज्यात आणि देशात कापूस फुटण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला. यात राज्यातील कापसाचे नुकसान झाले. तर पंजाब आणि हरियाणाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात गुलाबी बोंडअळीचा (pink bollworm) मोठा प्रादुर्भावही झाला होता. त्याचाही परिणाम देशांतर्गत कापूस उत्पादनावर (cotton production) झाला आहे. तर महाराष्ट्रासहीत गुजरात, तेलंगाणा, आणि कर्नाटकमध्ये कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे एकूण उत्पादन अंदाज घटवण्यात आला आहे.

उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने चालू हंगामात 5 लाख कापूस गाठींची आयात (cotton import) होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे निर्यातीत (cotton export) मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होऊ शकते. गेल्या वर्षी देशातून 78 लाख कापूस गाठींची निर्यात झाली होती. तर चालू बाजार वर्षात हाच आकडा 45 लाख गाठींपर्यंत खाली येऊ शकतो. हंगामातल्या पहिल्या चार महिन्यांदरम्यान (ऑक्टोबर ते जानेवारी) बाजारात 272 लाख कापूस गाठींची आवक झाली होती. संघटनेच्या माहितीनुसार 192 लाख ताज्या मालाच्या गाठी, 5 लाख आयात गाठी, आणि 75 लाख गाठींचा शिल्लक साठ्याचा (carryover stocks) समावेश होता.

दरम्यान, याच कालावधीत 114 लाख गाठींचा वापर देशात झाला होता. तर 25 लाख गाठी निर्यात झाल्या होत्या. जानेवारीच्या शेवटी बाजारात 133 लाख कापूस गाठी शिल्लक होत्या. सप्टेंबर 2022 मध्ये हंगाम संपुष्टात येईपर्यंत देशात 433 लाख कापूस गाठींचा पुरवठा होण्याचा होरा आहे. यात या हंगामाच्या सुरुवातीला असलेला 75 लाख गाठींचा शिल्लक साठा, 343 लाख गाठींचे उत्पादन, आणि एकूण 14 लाख गाठींच्या आयात मालाचा समावेश असेल.

हा व्हिडिओ पाहिलात का? :

पण या हंगामात कापूस वापर 5 लाख गाठींनी घटून 340 लाख गाठींवर येण्याची शक्यता आहे. असे असले तरी हंगाम संपताना 48 लाख कापूस गाठी शिल्लक राहतील. गेल्या हंगामात हाच आकडा 75 लाख इतका होता. एकूण कापूस बाजाराची स्थिती पाहता कापूस दरांची घोडदौड कायम राहण्याची शक्यता जास्त असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com