| Agrowon

सोलापूर : द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन

स्थळ: होम मैदान, सोलापूर पासून: 15/09/2017 पर्यंत : 17/09/2017 वेळ : 10:00am - 04:00am संकेत स्थळ : --

"सकाळ-ऍग्रोवन'च्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता.15) सोलापुरात उदघाटन 
कृषि क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग , मान्यवर तज्ज्ञांच्या परिसंवादाची मेजवानी 

सोलापूर (प्रतिनिधी) ः "सकाळ-ऍग्रोवन'च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आयोजन करण्यात आले असून, उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता शहरातील मध्यवर्ती अशा होम मैदानावर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. शुक्रवार (ता.15) ते रविवार (ता.17) असे तीन दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. कृषि क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांचा सहभाग आणि द्राक्ष, डाळिंबावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर परिसंवाद हे या प्रदर्शनाचे वैशिष्टय आहे. 

गेल्यावर्षीही सोलापुरात हे प्रदर्शन भरले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यंदाही शुक्रवारपासून सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहता येईल. ट्रॅक्‍टर, ब्लोअर, ड्रीप इरिगेशन, टिश्‍युकल्चर, फर्टिलायझर्स, पेस्टिसाईडस्‌, बायोफर्टिलायझर, किडनाशके, वनस्पती वाढनियंत्रके, मोबाईल टेक्‍नॉलॉजी यासारख्या शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे नेणाऱ्या विविध तंत्रज्ञानाचा अविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळेल. त्याशिवाय शेतकरी आणि तज्ज्ञांची द्राक्ष-डाळिंबावर मार्गदर्शनपर परिसंवादही होतील. त्यात शुक्रवारी (ता.15) पहिल्यादिवशी उद्‌घाटनसत्रानंतर दुपारी दोन वाजता प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण यांचे "द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे नियोजन' या विषयावर तर दुपारी चार वाजता राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा या "डाळिंबावरील किड-रोग व्यवस्थापना'वर बोलतील. शनिवारी (ता.16) दुपारी बारा वाजता बारामती केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांचे "डाळिंबाचे सेंद्रिय व जैविक पद्धतीने व्यवस्थापन व उत्पादनवाढीसाठी मधमाशी महत्व' या विषयावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता प्रगतशील शेतकरी अतुल बाबर यांचे "निर्यातक्षम द्राक्ष व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन होईल. तर रविवारी (ता.17) डॉ. विनय सुपे (सहायक संचालक, रिसर्च एनएआरपी, पुणे) यांचे "दर्जेदार डाळिंब उत्पादन सुधारित तंत्र व तेलकट डाग रोगाचे नियंत्रण' याविषयावर मार्गदर्शन होईल.