Cotton Area Estimated to Grow by 10 to 15 Percent
Cotton Area Estimated to Grow by 10 to 15 Percent

Cotton Cultivation : कापसाचा पेरा वाढण्याचा बियाणे उद्योगाचा अंदाज

देशांतर्गत बाजारात विक्रमी दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापडाची मागणी लक्षात घेता येत्या खरिपात कापूस बियाण्यांच्या मागणीत वाढ होऊ शकते.

पुणे : कापसाला यंदा विक्रमी दर मिळत असल्याने येत्या खरिपात कापूस बियाण्याची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कापूस बियाणे (cotton seed) कंपन्यांनी वाढीव बियाणे पुरवठ्यासाठी तयारी चालू केली आहे. येत्या खरिपात कापसाचा देशांतर्गत पेरा १० ते १५ टक्क्यांनी वाढेल, असा बियाणे उद्योगाचा कयास असल्याचे बिझनेस लाईनने म्हटले आहे.

गेल्या खरिपात अतिवृष्टी (heavy rainfall) आणि पूरासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे महाराष्ट्रासहित दक्षिण भारत आणि पंजाब, हरियाणासारख्या राज्यांमध्ये कापूस पिकाचे नुकसान झाले होते. असे असले तरी एकूण देशांतर्गत उत्पादकता चांगली राहिल्याने पीक वाचलेल्या कापूस उत्पादकांना चांगला परतावा मिळालाय.

चालू हंगामात कापसाचा पेरा (cotton sowing area) आधीच्या वर्षाच्या तुलनेत ७.७३ लाख हेक्टरनी घटला होता. गेल्या खरिपात कापसाची १२० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. तर त्याआधी हाच आकडा १२७.८७ लाख हेक्टरच्या घरात होता.

येत्या खरिपात कापूस बियाण्याच्या प्रत्येकी ४५० ग्राम वजनाच्या ४.५० ते ४.७५ कोटी पाकिटांची गरज भासेल, असा अंदाज नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाने (NSAI) व्यक्त केला आहे.

“पाऊसमान आणि हवामानाच्या परिस्थितीचा पेरणीवर परिणाम होत असतो. काही वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागते. त्यामुळे या अंदाजात बदल होऊ शकतो,”

- एम. प्रभाकर राव, अध्यक्ष, एनएसएआय (बिझनेस लाईनशी बोलताना)

काही हायब्रीड वाणांच्या बियाण्यांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी पडू शकतो. पण पावसामुळे पेरण्यांवर परिणाम झाला नाही, तर बियाणे पुरवठा गरजेपूरता होऊ शकतो, असाही अंदाज आहे.

“२०२१ मध्ये त्याआधीच्या हंगामाच्या तुलनेत पेरा १७ टक्क्यांनी घटला होता. त्यात यंदा किमान १२ ते १५ टक्क्यांची सुधारणा होण्याची शक्यता आहे,”

- एम. रामासामी, अध्यक्ष, रासी सीड्स प्रा. लि. (बिझनेस लाईनशी बोलताना)

सध्या बाजारात तणनाशक सहनशील व किड प्रतिकारक (HTBt Cotton) कापूस वाणांच्या अनधिकृत बियाण्यांची विक्री केली जात असल्याचा बियाणे उद्योगाचा आरोप आहे. हे मोठे आव्हान असून त्यामुळे उद्योगाचे नुकसान होऊ शकते. सरकारने पुढाकार घेऊन एचटीबीटी कापूस वाणाला मान्यता देऊन संशोधन करणाऱ्या कंपन्याच त्याची विक्री करू शकतील याची खात्री करावी लागणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

“देशात यंदाच्या हंगामात कापसाच्या लागवड क्षेत्रात सरासरी १५ टक्‍के वाढीचा अंदाज आहे. पुढील हंगामात कापसाला आजच्या इतके म्हणजे दहा हजारांवर दर मिळणार नसले तरी आठ हजार रुपये प्रतिक्‍विंटलच्या खाली सुद्धा ते येणार नाहीत हे निश्‍चित. सोयाबीन, तुरीखालील क्षेत्रातच कापसाची वाढीव लागवड होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे क्षेत्र १३८ ते १४० लाख हेक्‍टर राहण्याची शक्‍यता आहे,”

- गोविंद वैराळे, कापूस बाजार अभ्यासक

कापूस बियाणे उद्योगातील सुत्रांच्या मते या हंगामात १८ ते २० टक्के बियाणे हे एचटीबीटी कापूस वाणाचे होते. तर दुसरीकडे शेतकरी संघटनांच्या मते बेकायदेशीर कापूस लागवडीचे क्षेत्र ३० टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

यंदा दक्षिण भारतात गुलाबी बोंडअळीचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव कमी प्रमाणात झाला. त्यामुळे तेथील कापसाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे, मालाला चांगला भाव मिळणे क्रमप्राप्त होते. परिणामी, कापूस बाजारभाव किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) दिडपट जास्त असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com