थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या उपाययोजना

थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या उपाययोजना
थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या उपाययोजना

सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत असलेल्या द्राक्षबागेमध्ये वेगवेगळे परिणाम दिसून येत आहेत. दरवर्षीच्या तुलनेमध्ये तापमान कमी झालेले दिसते. या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये तापमान २ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. सध्याही तापमान कमी असून, येत्या १०-१२ जानेवारीपर्यंत किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत घडाच्या विकासामध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती घेऊ.

पाने वाळणे व जळणे जर बागेत ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान ४ ते ५ तास सलग राहिल्यास पानांच्या कडा जळालेल्या दिसतील. थंडीच्या सान्निध्यात आलेल्या कॅनोपिच्या वरील बाजूच्या फुटींची पाने चुरगळल्याप्रमाणे दिसतील. ही पाने कार्य करू शकणार नाही. बागेत अशी अवस्था १५ ते २० टक्के पानांवर दिसून येईल. या वेळी कमी झालेल्या तापमानामुळे पानांच्या पेशींवर ताण येऊन त्या पेशी मरतील. म्हणजे पाने सुकतील. जर कमी मार बसल्यास पाने थोडेफार सुकल्यासारखी दिसतील. यावर उपाय म्हणून बागायतदार वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची फवारणी करताना दिसून येतात. मात्र, तापमान कमी असताना वेलींची शरीरशास्त्रीय प्रक्रिया एकदम मंदावलेल्या किंवा थांबलेल्या असतात. ही पाने कोणतेही कार्य करण्यासाठी सक्षम नसल्यामुळे अन्नद्रव्यांच्या फवारणीचा फारसा उपयोग होणार नाही. ज्या वेली मुळातच सशक्त असतील, त्यांच्यावर थंडीचा जास्त मार बसणार नाही. अन्नद्रव्यांची फवारणी थंडी वाढण्याआधीच करण्याची आवश्यकता होती. आताही फवारणी करावयाची असल्यास दुपारी १२ ते ३ या काळात उन्हाच्या वेळी नत्रयुक्त खतांची करावी. या काळात पानांची लवचिकता वाढलेली असल्याने उपयोग होईल. मात्र, द्राक्षघडांवर फवारणी टाळावी. बागेतील तापमान वाढण्यास सुरूवात झाल्यानंतर अन्य अन्नद्रव्यांचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य होईल.

मण्यांचा आकार कमी राहणे

 • द्राक्षघडाच्या विकासात तापमान व आर्द्रता महत्त्वाची भूमिका पार पडते. वेलीची शरीरशास्त्रीय हालचाल ही ठराविक तापमान व आर्द्रतेच्या काळात होते. सध्या बहुतांश ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअस असून, ते घडाच्या वाढीला पोषक नाही. या वेळी घडाच्या मण्यात असलेल्या पेशींची वाढ होत असते. किमान तापमानाचा कालावधी जास्त काळ टिकल्यास मण्याचा आकार कमी राहील.
 •  अशावेळी अनेक बागायतदार विविध संजीवकांची व टॉनिक घटकांची फवारणी करू पाहतात. या वेळी थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळे मण्यातील पेशींचा आकार वाढत नाही. संजीवके शोषून गेल्यास पेशींचा आकार वाढण्यास मदत झालेली नसल्यास मण्याची साल जाड होईल. पुढील काळात मण्यात गोडी यायला उशीर लागेल. म्हणजेच फळकाढणी उशिरा होईल. याचाच अर्थ वेलीस पुढील काळात ताण बसेल. अशा परिस्थितीमध्ये १४० ते १५० दिवसात तयार होणाऱ्या द्राक्षांना १६०-१७० दिवसापर्यंत जातात. या द्राक्षाची चव बदलेल. त्यामुळे या काळात संजीवकांचा अतिरेक टाळावा.
 •  त्यापेक्षा कमी तापमानात बागेत मोकळे पाणी देता येईल किंवा बोद पूर्णपणे भिजेल, इतके पाणी द्यावे. यामुळे बागेतील तापमान वाढेल. वेलीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
 •  बागेत शेकोट्या करूनही तापमान वाढवता येईल.
 •  बोदावर मल्चिंग केल्यास मुळाच्या परिसरातील तापमान वाढेल. बोदामध्ये पांढरी मुळ्यांचे कार्य वाढेल. या साऱ्या घटकांचा परिणाम मण्यांचा आकार वाढण्यासाठी होईल.
 • पिंक बेरीची समस्या सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेत १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेले तापमान मण्यांच्या वाढीसाठी हानिकारक आहे. तसेच मण्यांचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठीही पोषक नाही. या वेळी दिवसाचे तापमान ३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक व किमान तापमान ५ ते ६ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असेल. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानातील फरक अधिक राहिल्यास मण्यांतील ग्रीन पिगमेंट (हिरवी रंगद्रव्ये) ही गुलाबी रंगद्रव्यांमध्ये परावर्तित होतात. मण्यांचा रंग हिरव्यापासून गुलाबी होतो. यालाच पिंक बेरी असे म्हणतात. पिंक बेरी असलेल्या द्राक्षांना खाण्यासाठी कमी पसंती मिळते. निर्यातीसाठी अशी द्राक्षे निवडली जात नाहीत. सध्या यावर कोणत्याही उपाययोजना नाहीत. केवळ कागदाने द्राक्षघड झाकून घेणे उपयुक्त ठरू शकेल. यामुळे घडाच्या आतील आणि बाहेरील तापमानातील दरी कमी होते. हिरवा रंग टिकून राहतो. या करिता पेपरने द्राक्षघड झाकून घ्यावेत. ज्या बागेमध्ये मण्यात पाणी उतरण्याच्या २० ते २५ दिवस आधीची अवस्था असेल, तिथे पिंक बेरीची समस्या दिसून येईल. या बागेत मण्यात पाणी उतरण्याच्या १० ते १२ दिवसापूर्वीच पेपरने द्राक्षघड झाकून घ्यावेत. सध्या दुपारचे तापमान हे रोगांच्या प्रसारासाठी पोषक आहे. ८-१० मि.मी. आकारानंतर जुनी झालेली पाने, जुनी झालेली कॅनोपीतील गर्दी यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येईल. यासोबत कमी तापमानत घट होण्यापूर्वी जेव्हा कमाल तापमान जास्त होते, तेव्हा मिलीबगचा प्रादुर्भाव वाढू लागतो. सध्या असे वातावरण अनेक ठिकाणी दिसत आहे. तसेच तापमान कमी असताना द्राक्षघड पेपरने झाकलेले असल्यास, घडाचे तापमान वाढेल. अशा स्थितीत घडांमध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. पेपरने घड झाकल्यानंतर फवारणीद्वारे घडांचे संरक्षण करणे अडचणीचे होईल. म्हणूनच पेपरने घड झाकण्यापूर्वी भुरी आणि मिलीबग नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशक आणि कीडनाशकांची फवारणी करून घ्यावी. या फवारणीच्या दोन तीन दिवसांनंतर जैविक नियंत्रण घटक, उदा. ट्रायकोडर्मा, व्हर्टिसिलियम, स्युडोमोनास, अॅम्पिलोमायसेस इ. ची फवारणी करून घ्यावी. बागेमध्ये घडांच्या विकासासाठी फण मारणे व पाणी वाढवणे अशा क्रिया केलेल्या असतात. त्यामुळे बागेतील आर्द्रता वाढलेली असल्याने जैविक नियंत्रणाचे घटक चांगल्या प्रकारे काम करतील. संपर्क  ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी जि. पुणे.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com