रिकट नंतरच्या द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

सध्या द्राक्ष विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येते. या वेळी रात्रीचे तापमानसुद्धा वाढत असून, आर्द्रता कमी होत आहे. या वेळी आपण रिकट नंतरच्या बागेतील व्यवस्थापन कसे असावे, हे पाहू.
रिकट नंतरच्या द्राक्ष बागेतील व्यवस्थापन
रिकट नंतरच्या द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

द्राक्ष बागेमध्ये रिकट घेतल्यानंतर नवीन फूट निघायला सुरुवात होईल. वाढत्या तापमानात पाणी उपलब्ध असल्यास फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. काही ठिकाणी ही वाढ पाण्याची उपलब्धता किंवा जमिनीचा प्रकार (हलकी जमीन) यामुळे कमी राहील. खोड तयार होण्याकरिता फुटीची वाढ जितकी जोमात होईल, तितके फायद्याचे. यासाठी बागेत पाणी वाफसा स्थितीत राहील, असे नियोजन करावे. तापमान वाढत असलेल्या परिस्थितीत साधारण १ मि.मी. बाष्पीभवनाकरिता सुमारे ४२०० लिटर प्रति हेक्टर प्रति दिवस या प्रमाणात पाणी देण्याची शिफारस असते. बाष्पीभवनाच्या प्रमाणात योग्य तितके पाणी दिल्यास जमीन वाफसा स्थितीत राहील. मुळांची वाढही चांगली होईल. जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असल्यास दुपारी (जास्त तापमानात) पाणी देण्याचे टाळावे. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी दिल्यास मुळांच्या कक्षेत चांगले पसरेल. वेलीस व्यवस्थित उपलब्ध होईल. आपण सामान्यतः ठिबक नळ्या जमिनीपासून काही उंचीवर बांधलेल्या असतात. मात्र डोंगराळ भागात किंवा उंचावर बाग असल्यास जास्त वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ठिबकचे पाणी एका ठिकाणी पडत नाही. अनेक वेळा मुळांच्या कक्षेपर्यंतही पाणी पोहोचत नाही. अशा वेळी फुटीची वाढ जोमात होणार नाही. त्यासाठी ठिबक नळ्या जमिनीवर ठेवून घ्याव्यात. यासोबत मल्चिंगचा वापर करावा. यामुळे पाण्याची बचत होऊन, मुळांच्या कक्षेत ओलावा राहील. पुरेशा पाणी व्यवस्थापनाप्रमाणेच अन्नद्रव्याचा वापरही तितकाच महत्त्वाचा असेल. अन्नद्रव्यांपैकी नत्राचा वापर या वेळी महत्त्वाचा असतो. नत्रयुक्त खतांमध्ये युरिया, अमोनिअम सल्फेट, १२-६१-०, १८-४६-० इ. वापरता येईल. या वेळी शक्यतो पालाशयुक्त ग्रेड किंवा फक्त पालाश असलेल्या खतांचा वापर टाळावा. वाढ जोमात झाल्यास ओलांडा तयार करण्यासाठी ज्या ठिकाणी शेंडा खुडला जातो, तिथपर्यंत पेऱ्यातील अंतर वाढलेले असावे. ओलांडा तयार करण्यासाठी काप घेतल्यानंतर किंवा शेंडा खुडल्यानंतर त्यापासून निघालेली फूट काही काळ हळूवार चालताना आढळते. बगलफूट निघत असताना पाणी व नत्र दोन्हींची आवश्यकता असेल. ओलांड्याकरिता वळविलेल्या फुटीची वाढ जोमात असणे गरजेचे आहे. खोड तयार होते वेळी वाढीचा जितका जोम होता, त्यापेक्षा जास्त जोम या वेळी आवश्यक आहे. दोन पेऱ्यांतील अंतर साधारणतः २.५ ते ३ इंच असावे. आता तयार झालेला ओलांडा वेलीच्या संपूर्ण आयुष्यभर (१२ ते १४ वर्षे) पुरणार आहे. पुढील काळात प्रत्येक हंगामात रोगनियंत्रण आणि कॅनॉपी व्यवस्थापन यांचा संबंध लक्षात घेता या वेळी ही वाढ जोमात करून घेणे गरजेचे आहे. ओलांडा दोन टप्प्यांत तयार करण्याचा प्रयत्न असावा. १) पहिला टप्पा हा ८ ते ९ डोळ्यांच्या अवस्थेत म्हणजेच सहा ते सात पानांवर खुडावा. या वेळी मागे बगलफुटी निघण्यास सुरुवात होईल. निघालेल्या बगलफुटींची वाढ नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी बगलफुटी दोन ते तीन पानांच्या होताच नत्राचा वापर कमी करावा. या फुटी तीन ते चार पानांवर खुडून घ्याव्यात. यालाच आखूड सबकेन असेही म्हटले जाते. शेवटची फूट न खुडता तिला ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार करण्यासाठी वापरावे. पहिल्या टप्प्यात तयार होत असलेल्या काड्या म्हणजेच मालकाड्या होत. यामध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी संजीवकांचा वापर व स्फुरदयुक्त खतांचा वापर गरजेचा असेल. या वेळी ६ बीए १० पीपीएम आणि युरासील २५ पीपीएम या प्रमाणात वापरावे. स्फुरदयुक्त खतांपैकी फॉस्फोरिक अॅसिडचा वापर करता येईल. फुटीचा जोम जर जास्त असल्याचे अनुभवात येत असल्यास स्फुरद व पालाशयुक्त ग्रेडचा (उदा. ०-९-४६, ०-४०-३७, ०-५२-३४ इ.) वापर करावा. यातून सूक्ष्म घडनिर्मितीची खात्री मिळू शकेल. २) या फुटींचे एक ते दोन डोळे दुधाळ रंगाचे झाल्यास पुन्हा ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार करण्याची तयारी करावी. या वेळी नत्र व पाणी यावर अधिक जोर द्यावा. दुसऱ्या टप्प्यातील निघालेल्या फुटींवर पुन्हा सूक्ष्म घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने संजीवकांचा वापर (पहिल्या टप्प्याप्रमाणेच) करावा. या काळात जाणवणाऱ्या समस्या व उपाययोजना  १) बागेत पाण्याचा जास्त वापर होत असताना बागेत आर्द्रतेचे प्रमाणही तितकेच वाढेल. नवीन वाढ जितकी जोमाने चालेल. तितक्याच समस्याही आढळून येतील. त्यात पानांच्या वाट्या होणे, पाने पिवळे पडणे यांचा प्रमुख समावेश असेल. पानाची लवचिकता वाढलेल्या स्थितीमध्ये वाढत्या तापमानामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव होईल. त्यामुळे पानांच्या वाट्या होतील. पानांच्या वाट्या प्रामुख्याने शेंड्याकडील भागात दिसून येतील. या वेळी पानांची पूर्ण वाटी न होता पानाच्या कडा चुरगाळल्याप्रमाणे दिसतील. फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे होते. किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फुटींची वाढ थांबल्यासारखी दिसेल. पानांचा आकार कमी राहील. पेऱ्यातील अंतरही कमी राहिल्याचे दिसेल. एकदा वाढ थांबल्यास पुढे वाढ करून घेणे शक्य होत नाही. घडाच्या विकासासाठी पानांची पूर्तता होणार नाही. पुढील हंगामात घडाच्या विकासात अन्नद्रव्याचा साठा तयार होणार नाही. तेव्हा आवश्यक त्या कीडनाशकाची फवारणी करून कीड नियंत्रणात ठेवावी. २) दुसऱ्या परिस्थितीत पानांची पूर्णपणे वाटी झालेली दिसेल. ही स्थिती जुन्या पानावर दिसेल. नवीन पानावर ही लक्षणे दिसणार नाही. पानाची वाटी आतील बाजूस खोलगट असेल. ही लक्षणे पालाशच्या कमतरतेमुळे दिसतील. या वेळी दीड ते दोन ग्रॅम ०-०-५० किंवा ०-९-४६ दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. ३) शेंडा पिंचिग केल्यानंतर निघालेल्या बगलफुटी चार पाच पानांच्या होताना पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येते. या वेळी पानाच्या शिरा हिरव्या राहून इतर भाग पिवळा झाल्याचे दिसेल. फुटींची वाढ खुंटल्याप्रमाणे दिसेल. पाने पिवळी पडल्यामुळे पानामध्ये हरितद्रव्याचे प्रमाण कमी होईल. अन्नद्रव्याचा साठा वेलीस करणे कठीण होईल. पानाची ही लक्षणे लोहाच्या (फेरस) कमतरतेमुळे असतील. यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीला अडथळा होईल. ते टाळण्यासाठी बागेत सबकेनच्या पुढे निघालेल्या दोन ते तीन पानांच्या अवस्थेपासून २ ते २.५ ग्रॅम फेरस सल्फेट प्रति लिटर पाणी या प्रमाणे ६ ते ७ दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या करून घ्याव्यात. सोबतच जमिनीतून १० ते १२ किलो फेरस सल्फेटसुद्धा द्यावे. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com