द्राक्षबागेमध्ये खतांचे व्यवस्थापन

द्राक्ष विभागामध्ये सध्या दिवसाचे तापमान वाढत असून, रात्रीचे तापमान कमी होत आहे. या वातावरणाचा द्राक्षबागेमध्ये असलेल्या वाढीच्या विविध अवस्थांवर होणारा नेमका परिणाम आणि विपरीत परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांची माहिती घेऊ.
द्राक्षबागेमध्ये खतांचे व्यवस्थापन
द्राक्षबागेमध्ये खतांचे व्यवस्थापन

जुनी बाग ः जुन्या बागांमध्ये झालेल्या सतता आणि जास्त पावसामुळे होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासोबत बोदामधील मुळांच्या कक्षेमध्ये असलेल्या अन्नद्रव्यांचे वहन झाले. याला इंग्रजीमध्ये लिचिंग असे म्हटले जाते. संपूर्ण हंगामासाठी असलेल्या शिफारशीप्रमाणे किंवा आपल्या अनुभवानुसार बागेमध्ये अन्नद्रव्यांचा वापर केला असला, तरी तो त्याच हंगामामध्ये संपूर्णपणे वापरला जाईल, असे नाही. त्याला अनेक कारणे जबाबदार असतात. उदा. वेलीची मुळे किती सक्षम आहेत. बोदामध्ये पाणी किती उपलब्ध झाले, बागेतील तापमान किती आहे, अशा अनेक घटकांचा वापर अन्नद्रव्यांच्या वापरावर परिणाम होत असतो. मात्र, या वर्षीच्या अतिपावसाच्या स्थितीमुळे अन्नद्रव्ये मुलाच्या कक्षेबाहेर निघून गेल्याचे दिसते. परिणामी, अनेक बागांमध्ये द्राक्षवेलीवर अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत आहेत. त्यामध्ये वेलीची पाने पिवळी पडणे, पाने पातळ होणे, पानांच्या शिरा हिरव्या राहून मध्य भाग पिवळा पडणे, पानांचा आकार कमी राहणे, शेंडावाढ थांबणे इ. समस्या दिसून येत आहे. अशक्त असलेली वेल ही रोगास व किडीच्या प्रादुर्भावास लवकर बळी पडताना दिसत आहे. उपाययोजना ः

 • पानांमध्ये मुख्यतः मॅग्नेशिअम, फेरस व झिंक यांची कमरता दिसून येतात. ज्या बागेमध्ये फुलोरा अवस्था आहे, अशा बागेतील घडाच्या विरुद्ध पान काढून देठ गोळा करावेत. एक एकर क्षेत्रातून सुमारे १०० ते १२० देठ गोळा करून देठ परीक्षणासाठी पाठवावेत.
 • ज्या बागा फुलोरा अवस्थेच्या पुढील अवस्थेमध्ये आहेत किंवा १० ते १५ दिवस होऊन गेले आहेत, अशा बागेमध्ये घडाच्या पुढील पान निवडावे. त्याची तपासणी करून घ्यावी. यामुळे बागेत नेमक्या कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, हे स्पष्ट होईल.
 • साधारण परिस्थितीमध्ये बागेत फेरस सल्फेट २.५ ते ३ ग्रॅम, मॅग्नेशिअम सल्फेट ३ ते ३.५ ग्रॅम व झिंक सल्फेट १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे एक ते दोन फवारण्या महत्त्वाच्या असतील. ज्या बागेत पाने फक्त पिवळी दिसतात व शेंडा थांबला आहे, अशा बागेत नत्राची कमतरता असू शकते. अशा बागेमध्ये नत्राची पूर्तता जमिनीद्वारे करावी.
 • मुळांचा विकास महत्त्वाचा ः वेलीस जमिनीतून केलेल्या अन्नद्रव्याची पूर्तता होण्यासाठी मुळे पूर्णपणे कार्यक्षम असणे गरजेचे आहे. ज्या बागेमध्ये बोदात पाणी जास्त काळ टिकून राहिल्यामुळे मुळांनी काम करणे बंद केले आहे किंवा मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी झाली आहे, तिथे अन्नद्रव्ये जमिनीतून उपलब्ध करूनही फायदा होणार नाही. बोदामध्ये मुळे योग्य रीतीने कार्यरत होण्यासाठी बागेमध्ये वाफसा येणे आवश्यक आहे. त्यासाठी बोद थोडेफार मोकळे करावेत. त्यासाठी बोदाच्या बाजूने नांगर किंवा अन्य अवजाराने लहान चारीही घेता येईल. यामुळे सुमारे २ ते ३ टक्के मुळे तुटतील. परंतु, त्यानंतर १० ते १२ टक्के नवी पांढरी मुळे पुन्हा तयार होतील. अन्नद्रव्याचा पुरवठा वेलीला वाढण्यास मदत होईल. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com