जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस : हवामान विभाग

यंदाच्या मॉन्सून हंगामातील पहिला महिना असलेल्या जून महिन्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
माॅन्सून स्थिती
माॅन्सून स्थिती

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची सुरुवातच यंदा दमदार झाली आहे. हंगामातील पहिला महिना असलेल्या जून महिन्यात राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर जवळपास आठवडाभरापेक्षा अधिक काळ पावसाने ओढ दिली असली तरी, पावसाने महिन्याची सरासरी ओलांडली आहे. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून ओळख असलेल्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मात्र दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, सरासरीपेक्षा (१११ टक्के) अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ११० टक्के अधिक, नगरमध्ये १०३ टक्के अधिक, बीडमध्ये ९१ टक्के, लातूरमध्ये ७९ टक्के, जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा ७२ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

याशिवाय जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांतही पावसाने सरासरी ओलांडली आहे. कोकणातील पालघर, अकोला, यवतमाळ, मुंबई उपनगरात यंदा जून महिन्यात पावसाची तूट दिसून आली आहे. पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी उणे ३६ टक्के, तर अकोला आणि यवतमाळमध्ये उणे ३१ तसेच मुंबई उपनगरात सरसरीच्या तुलनेत उणे २२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अडखळत वाटचाल; तरी वेळेआधी देश व्यापला मॉन्सून यंदा वेळेआधी (१७ मे) अंदमान निकोबार बेटावर पोचला खरा. मात्र, त्यानंतर वाटचाल अडखळतच सुरू झाली. मॉन्सून तब्बल दहा दिवस दक्षिण अंदमानात अडखळला. २७ जून रोजी वाटचाल पुन्हा सुरू केल्यानंतर अरबी समुद्रात आलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल झाला. पश्चिम किनारपट्टी वेगाने व्यापल्यानंतर पुन्हा मॉन्सूनचा प्रवास रोखला गेला. ४ जून रोजी गोव्यापर्यंत पोचलेला मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी ११ जूनचा दिवस उजाडला.

अवघ्या चार दिवसांत महाराष्ट्र व्यापल्यानंतर (१४ जून) उत्तरेकडील प्रवासाला पुन्हा ब्रेक लागला. तिसऱ्यांदा रेंगाळलेली वाटचाल २३ जून रोजी सुरू झाल्यानंतर चार दिवसांत (ता. २६) मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे जाहीर करण्यात आले. मॉन्सूनचे आगमन अडखळत झाले असले, तरी यंदा १२ दिवस आधीच मॉन्सून देशात सर्वदूर पोहोचला.

‘अम्फान’, ‘निसर्ग’ चक्रीवादळांचा प्रभाव मॉन्सूनचे आगमन होताना बंगालच्या उपसागरात ‘अम्फान’ चक्रीवादळ घोंघावत होते. यामुळे मॉन्सून वेळेआधी अंदमानात असला, तरी ‘अम्फान’ उत्तरेकडे गेल्यानंतर वाटचाल थांबली. हे महाचक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. पुन्हा अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र निर्माण झाल्याने मॉन्सूनला चालना मिळाली.

पाठोपाठ अरबी समुद्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा फेरा आला. जवळपास शतकभराहून अधिकच्या कालखंडानंतर महाराष्ट्राच्या किनाऱ्याला धडकणाऱ्या वादळाने महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्रात नुकसान केले. शेतपिके, घरे, इमारती, पॉलिहाउस, फळझाडे यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे वारे खेचले गेल्याने मॉन्सून गोव्यापर्यंत पोचला. ‘निसर्ग’ शांत होताच मॉन्सून पुन्हा थबकला. बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्राने पुन्हा गती देत मॉन्सूनची महाराष्ट्रापार वाटचाल झाली.

बारा वर्षांनंतर ‘जून’ ओलाचिंब जून महिनाअखेर देशभरात १९६.२ मिलिमीटर (१८ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात देशात सरासरी १६६.९ मिलिमीटर पाऊस पडतो. खरिपाच्या पेरणीसाठी महत्त्वपूर्ण असलेला जून महिना बारा वर्षांनंतर प्रथमच ‘ओलाचिंब’ करणारा ठरला आहे. २००८ च्या जून महिन्यामध्ये देशात २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा जून महिन्यात देशात सर्वदूर चांगला पाऊस पडला आहे. देशातील ३६ विभागांपैकी मणिपूर, मिझारम, दिल्ली, हिमाचल प्रदेश, लडाख, जम्मू-काश्मीर या सहा विभागांतच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केले आहे.  

हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत ः हवामान विभाग)
विभाग  सरासरी पाऊस  पडलेला पाऊस तफावत टक्क्यांत
कोकण  ६८९.७    ७०८.८
मध्य महाराष्ट्र  १५७.०  २३२.९  ४८
मराठवाडा १३८.०  २१७.३  ५७
विदर्भ   १७०.६ १६८.२ -१
जूनअखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती  (स्रोत ः हवामान विभाग) 
जिल्हा   सरासरी पाऊस  पडलेला पाऊस  सरासरीच्या तुलनेत तफावत (टक्क्यांत)
पालघर    ४११.९ २६५.२   (-३६)
रायगड   ६५५.८   ५३७.१  (-१८)
रत्नागिरी ८१३.५  ९०१.० ११
सिंधुदुर्ग  ८८०.१  १०९९.६ २५
ठाणे     ४६१.९  ३८२.९  (-२२)
नगर    १०८.२   २१९.४ १०३
धुळे   १२१.५   १८३.८  ५१
जळगाव   १२३.७  १८९.९ ५३
कोल्हापूर   ३६२.९  ४७३.८  १३१
नंदुरबार    १५५.९   १८१.५  १६
नाशिक १७४.४   २४६.८  ४२
पुणे    १७६.२ २६२.२  ४९
सांगली   १२९.०  १७६.९  ३७
सातारा   १९४.१   १९४.३  १००
सोलापूर १०२.५   २१६.७  १११
औरंगाबाद   १२५.२  २६२.७   ११०
बीड १२८.४   २४५.० ९१
हिंगोली  १६९.२ २१८.८ २९
जालना  १३२.६ २२७.७  ७२
लातूर  १३५.४  २४२.६  ७९
नांदेड १५५.४   १६१.९    ४
उस्मानाबाद    १२६.९   १७०.५    ३४
परभणी   १५४.३    १७०.५  ४०
अकोला  १३६.९   ९४.६   (-३१)
अमरावती  १४५.७   १६६.३  १४
भंडारा   १८९.३   २१५.५   १४
बुलडाणा    १३९.३     १८४.४    ३२
चंद्रपूर   १८३.५ १७३.२  (-६)
गडचिरोली   २१०.९ १८९.०   (-१०)
गोंदिया   १९२.८   १५९.९ (-१७)
नागपूर      १६६.३    १८७.१  १३
वर्धा   १७४.१ १५३.३ (-१२)
वाशीम  १६६.४   २४९.२  ५०
यवतमाळ   १६३.९  ११२.६   (-३१)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com