सांगलीत तोलणारांचे आंदोलन पेटले

बाजारसमितीत आंदोलन करताना तोलणार
बाजारसमितीत आंदोलन करताना तोलणार

सांगली : येथील बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले तोलणारांचे आंदोलन शुक्रवारी (ता. ३१) चांगलेच पेटले. व्यापारी आणि तोलणार यांच्यात वादावादी झाली. यामध्ये हमाल प्रतिनिधींनी व्यापारी चोर असल्याचा आरोप केल्याने व्यापारी बेमुदत संपावर गेले; तर तोलणारांनीही संप मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. 

शुक्रवारी सर्व तोलणार आणि हमालांनी बाजार समितीसमोर जोरदार घोषणा देत निदर्शने केली. चेंबर ऑफ कॉमर्ससमोर काही तोलणारांनी घोषणाबाजी केली; तर व्यापाऱ्यांनी बैठक बोलावून बेमुदत संपाची घोषणा केली.  न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या कामाची तोलाई द्यावी या मागणीसाठी तोलणारांचे आंदोलन गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी व्यापारी, तोलणार, हमाल प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. मात्र बैठकीत व्यापाऱ्यांनी आम्ही तोलाई काय चोऱ्या करून द्यायची काय? असा सवाल केल्यावर, तुम्ही चोऱ्या करत असल्याचा आरोप हमाल प्रतिनिधी बंडगर यांनी केला.

शुक्रवारी व्यापाऱ्यांनी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये बैठकीचे आयोजन केले. बैठकीत बंडगर यांनी व्यापाऱ्यांची माफी मागावी, तसेच त्यांनी राजीनामा द्यावा, तोपर्यंत आम्ही बेमुदत संप पुकारत असल्याचे चेंबरचे अध्यक्ष शरद शहा यांनी सांगितले.  तोलणारांचा विषय २०१६ पासून सुरू आहे. याबाबतची बाब न्यायप्रविष्ट आहे. जोपर्यंत याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्ही यापुढे तोलाईबाबत कोणतीही चर्चा करणार नाही. आमच्यावर नेहमी दादागिरी केली जाते. व्यापारी पेठ ही व्यापाऱ्यांनी अनेक संकटे येऊनदेखील टिकवली आहे. सेस, तोलाई, हमाली व्यापारी देतात. पण त्यांनाच नेहमी अपमानस्पद वागणूक दिली जाते. कोणालाही सेस बुडविता येत नाही, हवं तर गेटवरच सेस घ्यावा, तसे केले तर कोणीही संचालक होणार नाही. बंडगर यांनी माफी मागून राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी व्यापाऱ्यांनी केली.

विकास मगदूम म्हणाले, की आम्ही कोणताही चुकीचा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न नाही. उलट चेंबरचे अध्यक्ष शहा यांनीच दिशाभूल करून संप पुकारला आहे. संपाला विविध कारणे आहेत, केवळ आमचं निमित्त लावलं आहे. त्यांनी त्यांचा संप सुरू ठेवावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार नियमित केलेल्या कामांची तोलाई मागत आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com