कांदा दरप्रश्नी लासलगाव येथे आंदोलन

कांद्याची आवक कमी असताना दर कोसळत असल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सर्वच ठिकाणच्या कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, परदेशांतून कांदा आयात करू नये, कांदा साठवणुकीचे निर्बंध उठवावेत व किमान निर्यातमूल्य कायमस्वरूपी रद्द करून निर्यात सुरू करून कांदा शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
आंदोलन करताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.
आंदोलन करताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते.

नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, कांद्याची आयात थांबवावी, यासह इतर मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १३) लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आंदोलन करीत अर्धा तास लिलाव बंद पाडले. 

गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा देणारा दर मिळू लागला. मात्र, कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप सुरू केला आहे. मागील काही दिवसांपासून देशातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी कांदा भाववाढीविरोधात आंदोलने करून कांद्याचे दर पाडण्याचे काम सुरू केले आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने शुक्रवारी आंदोलन करून अर्धा तास कांदा लिलाव बंद पाडले. कांदा दर वाढीला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय पक्ष व संघटनांविरोधात, तसेच शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदवीत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी वसंत गांगुर्डे, कैलास पगारे, बाळासाहेब थोरे, गणेश निंबाळकर, जयराम गामणे, भाऊसाहेब केदार, संदीप मगर, बाळासाहेब आव्हाड यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. 

या वेळी कांदा उत्पादक शेतकरी शैलेंद्र पाटील म्हणाले, की सरकारने कांदा दर कमी करण्याचा हट्ट चालवला आहे. एकहाती सत्तेमुळे केंद्र सरकार अति करण्याचा प्रयत्न करत आहे. कांदा दर पाडण्याचा हस्तक्षेप सरकारने वेळीच थांबवावा. सध्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. जर असे शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने मागे घेतले नाही, तर कांदा उत्पादक राज्यस्तरीय आंदोलन करतील.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com