गावात कृषी अधिकारी, सहायक येतात का : कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सवाल

शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादा भुसे
शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सात फेब्रुवारीला नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी आठवडाभराच्या आतच कृषिमंत्र्यांनी केली आहे. गुरुवारी (ता. १४) मालेगाव तालुक्यातील वळवाडे, अजंग-वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या कृषिमंत्र्यांनी जाणून घेतल्या. गावात कृषी अधिकारी, कृषी सहायक येतात का, असा सवालही या वेळी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केला.

नागपूर येथे कार्यक्रमात घोषणा केल्याप्रमाणे कृषिमंत्री भुसे यांनी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली. मालेगाव तालुक्यातील वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक विमा योजना, कांदा उत्पादनाबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्याकरिता कृषी सहायक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणाही कृषिमंत्र्यांनी या वेळी केली. 

श्री. भुसे यांनी दिवसभरात अजंग-वडेल, झोडगे व माळमाथा भागातील गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन संवाद साधला. शेतकऱ्यांना कृषी उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता एक दिवस शेतावर हा उपक्रम कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सुरू केला असून, कृषी सचिव, आयुक्तांनी १५ दिवसांतून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना केल्या आहेत. या भेटीत पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत चर्चा करतानाच उपलब्ध बाजारपेठ आणि विविध कृषी योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असेही कृषिमंत्री भुसे यांनी विभागाला सूचित केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com