नगरमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा हल्ला 

नगरजिल्ह्यात गतवर्षीप्रमाणेच यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला केला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा या अळीचा लवकर प्रादुर्भाव आढळून आला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणेच यंदाही मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला केला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा या अळीचा लवकर प्रादुर्भाव आढळून आला आहे. आतापर्यंत साधारण दहा ते पंधरा टक्के म्हणजे सहा ते सात हजार क्षेत्र यामुळे बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील आठवड्यात पाऊस होता त्या काळात प्रादुर्भाव कमी होता. मात्र, चार दिवसांपासून पाऊस थांबला असल्याने प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने गेल्यावर्षी शेतकरी हवालदिल झाले होते. तशीच परिस्थिती यंदाही उद्भवू लागली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात मका पिकाचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ५७१ हेक्टर आहे. मात्र, गेल्यावर्षी ७८ हजार ५४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा कृषी विभागाने खरिपात ७५,००० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त करत क्षेत्र प्रस्तावीत केले होते.

आतापर्यंत ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा भागांत मक्याचे क्षेत्र असते. कोवळ्या वयातील मका फस्त केली जाऊ लागल्याने यंदा लष्करी अळीमुळे जास्त नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोपरगाव तालुक्यात दहा ते पंधरा टक्के मका पिकावर लष्करी अळी दिसून येत आहे. प्रादुर्भाव कसा रोखायचा याबाबत शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात असल्याचे कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी सांगितले.  कर्जत तालुक्यातील अनेक भागांत यंदाही मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. वेळीच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी शेतकऱ्यांना उपाययोजनांबाबत माहिती देत आहे.  - दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, कर्जत, जि. नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com