कर्जमाफीच्या वेळेत पूर्ततेसाठी ११०० लेखापरीक्षक नियुक्‍त

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तत्काळ मिळावा, यासाठी अकराशे लेखापरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. सहकारी संस्था व बॅंकांमधील शेतकरी कर्जदारांच्या खात्याची पडताळणी त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. १५ जानेवारीपर्यंत अहवाल द्यावा, असे पत्र त्यांना देण्यात आले आहे. - डॉ. अनिल जोगदंड, अप्पर आयुक्‍त, सहकार, पुणे
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : ‘मार्चएण्ड’च्या ताळेबंद पत्रकातील बॅंकांचा ‘एनपीए’ कमी व्हावा, शेतकऱ्यांना नवे कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा व्हावा, यादृष्टीने कर्जमाफीची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शेतकरी खातेदारांच्या कर्ज खात्याची पडताळणी करण्यासाठी सहकार विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी ५५ तर राज्यभरासाठी एक हजार १३७ लेखापरीक्षकांची नियुक्‍ती केली आहे. १५ जानेवारीपर्यंत पडताळणी अहवाल देण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील बळिराजाला दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली. गतवर्षीचा दुष्काळ अन्‌ यंदाचा महापूर, अतिवृष्टी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे बॅंकांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यातील २३ जिल्हा बॅंकांची शेती कर्जाची थकबाकी सुमारे २३ हजार कोटींवर पोचली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांचीही स्थिती अशीच आहे. 

दुसरीकडे मागच्या कर्जमाफीचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्‍कमही वाढत असल्याने बॅंकांचा एनपीए सरासरी ५ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्चएण्डपूर्वी कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे बॅंकांची थकबाकी वसूल होणार असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नव्याने कर्ज घेता येणार आहे. तर दोन लाखांवरील कर्जदारांची माहितीही लेखापरीक्षणातून समजणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘’बिनव्याजी ओटीएस’’ योजना सुरू करण्याचे नियोजनही करण्यात आल्याची माहिती आहे.  

दीड लाखाचे लाभार्थी वगळले? युती सरकारने श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली. त्यानुसार सुमारे ४० लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यापैकी बहूतांश शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने कर्ज घेतले असून, आता या शेतकऱ्यांना दीड लाखाचा लाभ मिळणार का, पूरग्रस्तांच्याही कर्जमाफीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बहुतेक या शेतकऱ्यांना दोन लाखांच्या कर्जमाफीतून वगळले जाण्याची शक्‍यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.   राज्याची स्थिती

  • एकूण शेतकरी    १.५३ कोटी
  • नव्या कर्जमाफीचे लाभार्थी    ४०.१३ लाख
  • कर्जमाफीची अंदाजित रक्‍कम    १८,७०० कोटी
  • लेखापरीक्षक नियुक्‍ती    १,१३७
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com