उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड भाजले !

अकोला ः जिल्ह्यात वाढलेल्या तापमानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. प्रामुख्याने फळबागांसह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान होत असून सततच्या उष्ण वाऱ्यांमुळेकेळीचे घड काही ठिकाणी भाजल्यासारखे झाले आहेत.
उष्म्यामुळे पणज येथील केळी पिकाचे घड असे भाजल्यासारखे दिसत आहेत.
उष्म्यामुळे पणज येथील केळी पिकाचे घड असे भाजल्यासारखे दिसत आहेत.

अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या तापमानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. प्रामुख्याने फळबागांसह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान होत असून केळीचे घड काही ठिकाणी भाजल्यासारखे झाले आहेत. जिल्ह्याचे तापमान सातत्याने ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहत आहे. 

जिल्ह्याच्‍या तापमानात या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. सोमवारी (ता.२५) अकोल्याचे तापमान उच्चांकी ४७.४ सेल्सिअस नोंदवले गेले. तापमानामुळे नागरिकांसह आता पिकांचीही काहिली होऊ लागली आहे. प्रामुख्याने केळी पिकाला अधिक फटका बसत आहे. केळीची कटाई सुरु असून यादरम्यान काही घडांवरील केळी अक्षरशः भाजल्यासारखी झालेली असल्याचे समोर आले आहे. 

या भागात सध्या तापमान सरासरी ४५ अंशांवर राहत आहे. यामुळे बाष्पीभवन वाढले. पिके होरपळून निघू लागली आहेत. केळी, संत्रा, भाजीपालावर्गीय पिकांना याची सर्वाधिक झळ बसत आहे. दिवसभर उष्ण वाऱ्याच्या झळा बसत असल्याने पीक सुकलेले दिसून येते. पाण्याची मागणी वाढली असल्याने शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी सातत्याने धडपड करावी लागत आहे. 

‘कोरोना’मुळे केळी उत्पादक शेतकरी यंदा हवालदिल झाले आहेत. व्यापाऱ्यांनी लॉकडाउनच्या काळात २०० रुपये दराने केळीची कापणी केली. त्यातच १० मे रोजी पणज मंडळात जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. पालकमंत्री बच्चू कडू यांनी भेट देत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. सर्वेक्षणही करण्यात आले. परंतु एकाच वर्षात दोन वेळा मदत देता येत नाही, अशी बाब समोर आली. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांना ३० एप्रिल ही गारपीट निकषासाठी शेवटची तारीख होती असे सांगण्यात आले. त्यात भरीस भर म्‍हणजे २२ मे पासून या भागात सलग सहा दिवस ४५ अंशावर तापमान राहत आहे. हे तापमान केळीला असह्य होत आहे. आता पीकविम्यात तापमानाच्या निकषात केळी पिकाला बसवून मदत करावी, अशी मागणी केली उत्पादक शेतकरी करीत आहेत. 

केळी पिकाचे ४० अंश सेल्सिअस तापमानानंतर नुकसान होते. आपल्या भागात दरवर्षी मे महिन्यात शेवटचे १५ दिवस ही परिस्थिती उद्भवत असते. या काळात काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी प्रामुख्याने केळीचा घड पाने किंवा आच्छादन कव्हरने झाकल्यास फायदेशीर ठरते. तसेच पिकाला रात्रीच्या वेळी मोकळ्या पद्धतीने पाणी द्यावे, असे  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. शंशाक भराड यांनी सांगितले. अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी  गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. पारा दररोज ४७ अंश सेल्सिअसपर्यंत राहत आहे. यामुळे बुधवारी मोरगाव सादिजन येथे ४० वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी येथील सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. बाळापूर तालुक्यात असलेल्या मोरगाव (सादिजन) येथील किसनराव किनेकर (वय ४०) असे या रुग्णाचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र दुपारपर्यंत प्रशासनाकडून अधिकृतरीत्या उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर झाले नव्हते.  मी चार एकरांत केळी लागवड केली आहे. या भागात वाढलेली उष्णता केळीला सहन होत नसल्याची स्थिती आहे. बागेतील काही झाडे तुटून पडत आहेत. कटाई सुरु असताना काही घड भाजल्यासारखे दिसून आले. सध्या केळीला ६५० रुपये दर असला तरी गेल्यावर्षी याच काळात बोर्डाचा दर १२०० रुपये मिळत होता. उष्णतेमुळे बागेचे नुकसान सोबतच दर कमी असल्याची झळ सहन करावी लागत आहे.  - अमोल अकोटकार, केळी उत्पादक, पणज, ता. अकोट, जि. अकोला .

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com