‘बिग बास्केट’ करणार काजू बी खरेदी

आत्तापर्यंत सरसकट काजू बीची खरेदी करून स्थानिक व्यावसायिक विक्री करत होते. मात्र, ऑनलाइन मार्केटमधील ‘बिग बॉस्केट’ या कंपनीने गुणवत्तेनुसार जादा दर देऊन काजू बीची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्याचा निर्णय घेतला आहे.’’ -मिलिंद जोशी, सहायक सरव्यवस्थापक, पणन मंडळ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  ः रत्नागिरी, सिंधुदुर्गातून तीन कोटींचा हापूस खरेदी करून त्याची संपूर्ण देशभरात विक्री करणाऱ्या ‘बिग बास्केट’ ऑनलाइन कंपनीने कोकणातील काजू बी खरेदीसाठी पावले उचलली आहेत. प्रायोगिक तत्त्वावर लांजा, राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवादही साधला आहे. गुणवत्तेनुसार काजू बी खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्याची देशभरातील विक्री होणार आहे. त्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून बाजारापेक्षा अधिक दर देऊन काजू बीची खरेदी करण्यात येणार आहे.

कोकणातून लाखो टन काजू बी प्रक्रियेसाठी परराज्यात जातो. आठवडा बाजार, प्रक्रिया कंपन्या किंवा स्थानिक दुकानदार हीच खरेदीची केंद्रे आहेत. कोकणातील काजूगराला देशातच नव्हे; तर परदेशात मोठी मागणी आहे. हे लक्षात घेऊन बिग बास्केट कंपनी काजू उद्योगात उतरली आहे. गेली तीन वर्षे कोकणातील बागायतदारांकडून आंबा खरेदी करून तो ऑनलाइन पद्धतीने दिल्ली, बंगळूर; तसेच देशभरात विकला जात आहे. फळभाज्या आणि किराणा माल ऑनलाइन विक्रीत ओळख असलेल्या ‘बिग बास्केट’ कंपनीने आता काजू बीच्या खरेदीसाठी यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुणवत्ता तपासून म्हणजेच बीमधील आर्द्रता तपासून शेतकऱ्यांना दीड ते दोन टक्के जादा दर दिला जाणार आहे; तसेच सरसकट बी घेतानाही बाजारातील दरापेक्षा पाच ते सात रुपयांचा अधिक दर शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

दरम्यान, काजू बी खरेदीसाठी ‘बिग बास्केट’ कंपनी आणि पणन महामंडळाने लांजा येथील गवाणे आणि राजापूर येथे कार्यशाळा घेतली. त्या वेळी सुमारे पाचशेहून अधिक काजू बागायतदार उपस्थित होते. गुणवत्तापूर्ण काजू बी कशी असावी, याचे मार्गदर्शन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी केले. या वेळी पणनचे सहायक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कंपनीतर्फे केतन चौधरी, जयदीप सूर्यवंशी उपस्थित होते. 

‘बिग बास्केट’चे अधिकारी जयदीप सूर्यवंशी म्हणाले, की काजू बी खरेदीसाठी प्रथमच कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विक्री केंद्रे उभारली जातील. थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार बी खरेदी करून गुणवत्तापूर्ण काजूगर बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीचा प्रयत्न आहे. कोकणच्या हापूसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बिग बास्केट बागायतदारांसाठी हे करणार

  • काजू बीची प्रथमच ग्रेडिंग करून खरेदी
  • ऑनलाइन पेमेंट देणार
  • खरेदीची पावती देणार
  •  बाजारभावापेक्षा अधिक दर देणार
  •  वजन-काटे पारदर्शक असणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com