`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी `उज्ज्वला' योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे ताशेरे महालेखापालांनी (कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल-कॅग) यांनी ओढले आहेत. मोदींनी मोठा गाजावाजा करत, `उज्ज्वला' योजनेची घोषणा केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही या योजनेचा प्रचारात वापर करण्यात आला. पण या योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. गरीब महिलांसाठी सिलिंडर म्हणून, ही योजना सुरू झाली. गरीब कुटुंबांना देण्यात येणारे सिलिंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुळात `कॅग'नेच ताशेरे ओढल्यामुळे आता मोदी सरकारची अडचण झाली आहे. 

काय म्हणतो अहवाल?  योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या गैरव्यवहारावर `कॅग'च्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालानुसार देशात तीन लाख ४४ हजार अशी उदाहरणे आहेत, ज्यात एका लाभधारक ग्राहकाला एका दिवसात दोन ते २० घरगुती सिलिंडर देण्यात आले आहेत. `उज्ज्वला' योजना मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. यात दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्‍शन देण्यात आले. चुलीच्या धुरातून महिलांची सुटका करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मोदी सरकारने ही योजना प्रचंड यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. तसेच मार्च २०२० हे योजनेचे लक्ष्य होते. त्याधीच सात महिने आठ कोटी महिलांना मोफत घरगुती गॅस सिलिंडर पोचवण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. दरम्यान, मोठ्या कुटुंबांमध्ये महिन्याला तीन ते नऊ सिलिंडर देण्यात आल्याची माहितीही `कॅग'च्या अहवालात देण्यात आली आहे. 

काय आहे कंपन्यांचे म्हणणे? कोणत्याही गरीब किंवा सर्वसामान्य कुटुंबात घरगुती गॅस इतक्‍या मोठ्या प्रमाणावर वापरला जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे हे सिलिंडर व्यवसायिक कारणांसाठी वापरले गेल्याची शक्‍यता व्यक्त केली गेली आहे. व्यवसायिक कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरवर जास्त कर असल्यामुळे ते घरगुती सिलिंडरपेक्षा महाग असतात. त्यामुळेच `उज्ज्वला' योजनेतील सिलिंडर हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरले गेल्याची शंका आहे. दरम्यान, रोज एकापेक्षा जास्त एलपीजी सिलिंडरचे बुकिंग आणि वितरण करण्याला कोणत्याही प्रकारच्या नियमांचा अडथळा नव्हता, असा खुलासा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com