कडधान्याचा पेरा चांगला, पण अतिपावसाने हानी 

पुणे : राज्यात कडधान्याचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असला तरी सततच्या पावसाने उभ्या पिकाचे भवितव्य मात्र अस्थिर झाले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : राज्यात कडधान्याचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असला तरी सततच्या पावसाने उभ्या पिकाचे भवितव्य मात्र अस्थिर झाले आहे.  मूग, उडीद उत्पादनात काही जिल्ह्यांत मोठी घसरण होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात सरासरी २२ लाख १७ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेरा केला जातो. शेतकऱ्यांना यंदा हा पेरा २४ ऑगस्टपर्यंत २१ लाख १७ हजार हेक्टरपर्यंत नेला होता. गेल्या वर्षी हाच पेरा १९ लाख हेक्टरच्या आसपास होता. 

खरीप कडधान्याचा विचार करता राज्यात तूर हेच मुख्य पीक आहे. सरासरी १२ लाख ७४ हजार हेक्टरवर तूर लावली जाते. यंदा ही लागवड १२ लाख ३२ हजार हेक्टरपर्यंत गेली आहे. साधारणपणे गेल्या हंगामाच्या तुलनेत तुरीचा पेरा सध्या तरी स्थिर दिसतो आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडयाच्या काही भागात पावसामुळे मुगाचे ३० ते ८० टक्के पीक वाया गेले आहे. उडदाचे देखील काही भागात ५-१० टक्के नुकसान आहे. मात्र, उडदाचे निश्चित नुकसान पुढील दोन आठवड्यांंत स्पष्ट होईल, असे कडधान्य शास्त्रज्ञांकडून सांगितले जात आहे.

कडधान्याचा पेरा यंदा देशभर वाढलेला आहे. गेल्या हंगामात देशातील शेतकऱ्यांनी २८ ऑगस्टपर्यंत १२८ लाख ६५ हजार हेक्टरवर पेरा केला होता. यंदा याच तारखेला पेरा १३४ लाख ५७ हजार हेक्टर झालेला आहे. देशात तूर, मूग, उडीद या सर्वच प्रमुख कडधान्यांचा पेरा शेतकऱ्यांनी वाढलेला आहे. ही वाढ ऑगस्टअखेरच्या अंदाज अहवालात पाच लाख ९१ हजार हेक्टरने जादा दिसते आहे. काढणीपर्यंत यातील किती मालाचे नुकसान होते यावर कडधान्य बाजारपेठांचे भाव ठरतील, असा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या तुरीला कर्नाटकची तूर टक्कर देत असते. यंदा आतापर्यंत तरी दोन्ही राज्यांमध्ये सारखा म्हणजेच प्रत्येकी साडेबारा लाख हेक्टरच्या आसपास पेरा दिसतो आहे. कर्नाटकात गेल्या हंगामात ११ लाख हेक्टरवर तूर होती. म्हणजेच यंदा तेथे दीड लाख हेक्टरने क्षेत्र वाढल्याचे स्पष्ट होते आहे.

राज्यातील कडधान्याचे बाजार मुख्यत्वे राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेशातील पेऱ्यानुसार खालीवर होत असतात. यंदा राजस्थानात ३३ लाख हेक्टरवर, महाराष्ट्रात २१ लाख, मध्य प्रदेशात २२ लाख तर कर्नाटकात साडेअठरा लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा दिसतो आहे. प्रत्यक्षात काढणीनंतर किती उतारा बसतो आहे हे विचारात घेत व्यापारी वर्ग नव्या मालाचे बाजारभाव ठरवतात, अशी माहिती डाळ उद्योगातून देण्यात आली.

प्रतिक्रिया

राज्यातील शेतकऱ्यांनी यंदा तुरीचा पेरा किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढवलेला आहे. पीक जोमात आहे. अर्थात, डिसेंबरपर्यंत पावसाची वाटचाल कशी होते यावर उत्पादकता अवलंबून राहील. पावसामुळे मूग आणि उडदाचे उत्पादन मात्र घटू शकते. — डॉ. नंदकुमार कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राज्यात सर्वच कडधान्याचा पेरा वाढला आहे. मात्र, सतत पावसामुळे विदर्भात मुगाचे मोठे नुकसान दिसते आहे. उडीद आणि तुरीला देखील काही भागांमध्ये फटका बसला आहे. - प्रमोद खंडेलवाल, अध्यक्ष, अकोला दाल मिल्स् असोसिएशन

कडधान्याची खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर  नियोजन सुरू आहे. पावसामुळे मुगात अडचणी आहेत. तुरीचा पेरा आशादायक असून डिसेंबरनंतर खरेदी सुरू होईल. तूर आणि हरभऱ्यामुळे राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांनी तीन हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे. - योगेश थोरात, अध्यक्ष, महाएफपीसी  

देश/राज्य  पीक  सरासरी क्षेत्र  प्रत्यक्ष यंदा झालेला पेरा गेल्या वर्षीचा पेरा   वाढलेल्या पेऱ्याची टक्केवारी
देश   तूर    ४४.२९   ४७.१० ४४.५५  ५.७२
राज्य तूर. १२.७४ १२.३२ १२.०५  २.२१
देश उडीद  ३५.५३ ३७.५२  ३७.०९ १.७१
राज्य उडीद ३.५९  ३.८७  २.८७ २७.८८
देश.   मुग ३०.४९ ३४.८५   ३०.१९ १५.४३
राज्य मुग ४.८३ ३.८७ ३.२२  १८.३३
  • देशाचे आकडे २८ ऑगस्टपर्यंतची, तर राज्याचे आकडे २४ ऑगस्टपर्यंतची स्थिती दर्शवितात.
  • सर्व आकडे लाख हेक्टरमध्ये 
  • दिलेली टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेल्या पेऱ्याची वाढ दर्शविणारी आहे.
  •   असे बदलत गेले कडधान्याचे हमीभाव (एमएसपी) : * हमीभाव (प्रतिक्विंटल रुपये) 

    पीक हंगाम २०१२-१३ २०१३-१४  २०१४-१५ २०१५-१६ २०१६-१७  २०१७-१८  २०१८-१९ २०१९-२०  २०२०-२१
    तूर  ३८५०  ४३०० ४३५० ४६२५  ४६२५ ५४५० ५६७५ ५८०० ६०००
    मूग   ४४०० ४५०० ४६०० ४८५०  ४८००  ५५७५   ६९७५ ७०५० ७१९६
    उडीद   ४३००  ४३०० ४३५०  ४६२५  ४५७५ ५४००  ५६०० ५७०० ६००० रुपये.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com