शेती बदलते आहे कूस!

वाशीम जिल्ह्यात बहुतांश गावात हळदीखालील क्षेत्र १०० ते १५० एकरापर्यंत झाले आहे. वाशीम व रिसोड बाजार समिती एक दिवस खास हळद खरेदीकरिता राखून ठेवते. हळदीमुळे उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. - डॉ. गजानन ढवळे,हळद उत्पादक, शिरपूर, जि. वाशीम.
कारल्याची काढणी करताना महिला शेतकरी.
कारल्याची काढणी करताना महिला शेतकरी.

पुणे  ः गेल्या आठ ते दहा वर्षांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्य, परराज्यातील बाजारपेठेचा अंदाज घेत पीक बदलाला सुरवात केली आहे. पारंपरिक पिकांचे लागवड क्षेत्र मर्यादित ठेऊन मागणीनुसार हंगामी भाजीपाला, फुलशेती, फळपिके, मसाला पिके शेतशिवारात दिसू लागली आहेत. त्यातून पीक निहाय समूह (क्लस्टर) विकसित झाले असून एकमेकांच्या साथीने शेती अर्थकारणाला वेगळी दिशा मिळू लागली आहे. कृषी दिनानिमित्त ‘ॲग्रोवन’ने राज्यभर केलेल्या पाहणीतून वेगळे आणि सकारात्मक असे शेतीतील बदलाचे चित्र पुढे आले. 

सध्या राज्यात एक लाखांहून अधिक शेतकरी गट आणि सुमारे ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांनी विविध शहरांत थेट विक्री व्यवस्था उभी केली. काही गट शेतमाल निर्यातीमध्ये देखील उतरले आहेत. या संघटित प्रयत्नांचा फायदा गाव आणि शेतशिवारांच्या विकासाला होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून नव्याने विकसित होत असलेल्या विभागनिहाय पीक बदलाला कृषी विभाग आणि शासनाने धोरणात्मक दिशा देण्याची गरज आहे.

शेतकरी बदलतो आहे पाररंपरिक पिक लागवडीतील घटत चाललेले नफ्याचे प्रमाण, बाजारपेठेचे बदलते स्वरूप, दराबाबतची अनिश्चितता, आॅनलाईन प्लॅटफॉर्ममुळे निर्माण झालेल्या नव्या संधी, गटशेतीमुळे प्रयत्नांना मिळालेली बळकटी, निर्यातीच्या उपलब्ध झालेल्या संधी, प्रक्रिया उद्योगांचे वाढते जाळे, ज्ञान-तंत्रज्ञानाची उपलब्धता, स्मार्ट फोनमुळे खुला झालेला माहितीचा स्रोत अशा अनेक कारणांमुळे शेतकरी पारंपरिक पीक पध्दतीत बदल करीत नव्या युगाला सामोरा जात असल्याचे सकारात्मक चित्र राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहे.  

असे आहेत बदल ः 

  • पुणे जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका टोमॅटो हब. नारायणगाव उपबाजारातून विविध राज्यांमध्ये टोमॅटो विक्री. आखाती देशांमध्येही निर्यात. नारायणगांव बाजारात दरवर्षी अब्जावधी रुपयांची उलाढाल. 
  •  नाशिक जिल्ह्यात सुमारे चार हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर शेवगा लागवड. कसमादे पट्ट्यात शेवगा क्लस्टर. गुणवत्तेमुळे परराज्य, आखाती देश, मलेशिया, सिंगापूर येथे निर्यात. 
  •  कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाला, केळी लागवडीत वाढ. शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला उत्पादन, विक्री. हातकणंगले तालुक्‍यात केळी क्‍लस्टरला चालना.
  • नगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने ‘आत्मा’अंतर्गत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी. १५० शेतकरी गटांच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री.  
  • सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्यात मोगरा, निशिगंध, झेंडू लागवडीला चालना.  जिल्ह्यात सुमारे ५५० हेक्टरवर फूलशेती. 
  • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ पट्टा बेदाणा क्लस्टर. विशिष्ट चव, रंग आणि आकारामुळे सोलापुरी बेदाण्याची वेगळी ओळख. 
  • परभणी जिल्ह्यातील राधेधामणगाव (ता.सेलू) तसेच परिसरात लिंबू क्लस्टर विकसित. अर्थकारणाला बळकटी.
  • विदर्भातील शेतकऱ्यांचा हळद, आले, मका, केळी, सीताफळ, लिंबू तसेच भाजीपाला बीजोत्पादनाकडे कल. वर्धा, अकोला, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात केळी लागवडीला गती. बुलडाणा, वाशीममधील शेतकऱ्यांची दर्जेदार बीजोत्पादनामध्ये ओळख. 
  • रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, चिपळूण, दापोली आणि रत्नागिरी तालुक्यात  मिरी, जायफळ, लवंग, हळद लागवडीला शेतकऱ्यांची पसंती. शेतकरी तसेच महिला बचत गटांच्या प्रयत्नातून भातशेतीनंतर भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ.
  • वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील अकरा गावांचा काजू कल्स्टर. लागवडीच्या बरोबरीने रोपवाटिका, निविष्ठा पुरवठा, प्रक्रिया उद्योगांना गती. राज्य, परराज्यातील बाजारपेठेत काजूला चांगली मागणी.
  • सातारा जिल्ह्यात करार पद्धतीने ५० एकरांवर जिरॅनियम लागवड. प्रक्रिया केंद्राची उभारणी. 
  • जळगाव जिल्ह्यातील लाडली तसेच परिसरातील गावांमध्ये भेंडी उत्पादनाचा हब. हंगामात दररोज १० ते ११ टन भेंडी बाजारपेठेत. निर्यातीला चालना.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील युवा माऊली शेतकरी गटातर्फे सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याच्या थेट विक्रीचे नियोजन. गटशेतीतून पीक बदलाला चालना.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com